मराठी साहित्य – विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-1 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ☆ विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-1 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

अंदमान सहलीचे बुकिंग करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या ठिकाणी दहा वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भोगली तो सेल्युलर जेल बघणे हेच ध्येय मनाशी होते. सेल्यलर जेल म्हणजे भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र म्हटले पाहिजे. ब्रिटिशांनी सावरकरांना दोन जन्मठेपांची शिक्षा देऊन अंदमानला पाठवले होते. 1910 ते 1921 या कालखंडात स्वातंत्र्यवीर सावरकर देशासाठी कारावास भोगत अंदमानला होते. तीव्र बुद्धिमत्ता पण तितकेच कणखर मन आणि प्रतिभा त्यांच्या ठायी होती. आत्तापर्यंत ‘माझी जन्मठेप’चे पारायण झाले होते. त्यामुळे कोलू फिरवणे, काथ्या कूटणे यासारखे शारीरिक कष्ट, अंगावरची दंडा बेडी, बारी नावाच्या ब्रिटिशाच्या तुरुंग सुप्रिटेंडंटचा होणारा जाच,  स्वातंत्र्य सैनिकांना होणाऱ्या यातना ,काहींना फाशी या सर्व गोष्टी आठवून या परिसरात गेल्या बरोबरच मन खूप भारावून गेले. अंदमानच्या भिंती हा इतिहास बोलका करीत असल्या तरी प्रत्यक्ष तेव्हा त्यांचा छळ कसा झाला असेल याची कल्पनाच करवत नाही. सेल्युलर जेलमध्ये प्रवेश करताच उजव्या हाताला जो पिंपळाचा पार आहे तो आजही या सर्वांची साक्ष देत उभा आहे. या पाराखाली सावरकरांनी अनेकांना साक्षरतेचे, स्वातंत्र्याचे धडे दिले म्हणून हे जणू आपले  पहिले विद्यापीठच होते!

अंदमान सहलीच्या पहिल्याच दिवशी आम्ही सेल्युलर जेल पहायला गेलो. सात फूट रुंद, दहा फूट उंच आणि साडेतेरा फूट लांब कोठडी होती.तिथे फक्त एक खिडकी होती. इथेच सावरकरांनी भिंतीवर ‘कमला’ काव्य लिहिले.

आम्ही सावरकर कोठडीत काही वेळ थांबून सर्व परिसर बघितला. फाशी गेट तसेच सावरकरांना देण्यात येणाऱ्या शिक्षांची पुतळ्यांच्या रूपात दाखविलेली झलक पाहिली. तेथील साऊंड आणि लाईट शो बघून बाहेर आलो. मन खूप भारावून गेले होते. बाहेर सावरकर बागेतील इतर क्रांतिकारकांचे पुतळे पाहिले. संध्याकाळी हॉटेलवर परत आलो, पण मन अजूनही तिथेच होते.

दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आम्ही दुपारच्या वेळी सेल्युलर जेल ला गेलो तेव्हा शांतपणे सावरकर कोठडीत बसून ‘जयोस्तुते श्री महन्मंगले..’ हे गीत म्हंटले, तेव्हा मन आणि डोळे नकळत भरून आले.

                 क्रमशः…

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈