मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कानाचे आत्मवृत्त… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ कानाचे आत्मवृत्त लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

मी आहे कान !

खरं म्हणजे ‘आम्ही आहोत ‘ कान !

कारण आम्ही दोन आहोत !

आम्ही जुळे भाऊ आहोत.

पण आमचं नशीबच असं आहे की आजपर्यंत आम्ही एकमेकांना पाहिलेलंही नाही.

कुठल्या शापामुळे आम्हांला असं विरुद्ध दिशांना चिकटवून पाठवून दिलंय काही समजत नाही.

दुःख एवढंच नाही,

आमच्यावर जबाबदारी ही फक्त ‘ऐकण्याची’ सोपविली गेल्ये.

शिव्या असोत की ओव्या,

चांगलं असो की वाईट,

सगळं आम्ही ऐकतच असतो.

हळूहळू आम्हांला ‘खुंटी’ सारखं वागविलं जाऊ लागलं.

चष्मा सांभाळायचं काम आम्हांला दिलं गेलं.

फ्रेमची काडी जोखडासारखी आम्हांवर ठेवली गेली.

(खरं म्हणजे चष्मा हा तर डोळ्यांशी संबंधित आहे.

आम्हाला मध्ये आणण्याचा प्रश्नच नव्हता.)

लहान मुले अभ्यास करीत नाहीत किंवा त्यांच्या डोक्यात काही शिरत नाही तेव्हा मास्तर पिरगळतात मात्र आम्हांला !

भिकबाळी, झुमके, डूल, कुडी हे सर्व आमच्यावरच लटकविलं जातं.

त्यासाठी छिद्र ‘आमच्यावर’ पाडावी लागतात, पण कौतुक होतं चेह-याचं!

आणि सौंदर्य प्रसाधने पहाल तर आमच्या वाट्याला काहीच नाही.

डोळ्यांसाठी काजळ, चेह-यासाठी क्रीम, ओठांसाठी लिपस्टिक!

पण आम्ही कधी काही मागीतलंय?

हे कवी लोक सुद्धा तारीफ करतात ती डोळ्यांची, ओठांची, गालांची!

पण कधी कुठल्या साहित्यिकाने प्रेयसीच्या कानांची तारीफ केलेली ऐकल्ये?

कधी काळी केश कर्तन करताना आम्हाला जखमही होते. त्यावेळी केवळ डेटॅालचे दोन थेंब टाकून आमच्या वेदना अजून तीव्र केल्या जातात.

किती गोष्टी सांगायच्या? पण दुःख कुणाला तरी सांगीतले तर कमी होते असे म्हणतात.

भटजींचे जानवे सांभाळणे, टेलरची पेन्सील सांभाळणे, मोबाईलचा ईअरफोन सांभाळणे ह्या मध्ये आता ‘मास्क’ नावाच्या एका नवीन गोष्टीची भर पडली आहे.

आणा, अजून काही नवीन असेल आणा टांगायला. आम्ही आहोतच खुंटीसारखे सर्व भार सांभाळायला !

पण तुम्ही हे आमचं आत्मवृत्त ऐकून हसलात ना? असेच हसत राहा. ते हास्य ऐकून आम्हांलाही बरं वाटलं.

हसते रहा, निरोगी  रहा ! …

टवकारलेत ना कान !

लेखक : अज्ञात

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈