मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जिसका मन मस्त है, उसके पास समस्त है!…”– लेखक : डॉ. धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “जिसका मन मस्त है, उसके पास समस्त है!…” – लेखक : डॉ. धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील एका हार्ट स्पेशालिस्ट सर्जनची ही कथा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकते. आजच्या काळात तर ती फारच गरजेची…. म्हणून सांगतोय.

हे डॉक्टर अतिशय निष्णात. सगळीकडे त्यांच्या कौशल्याचा बोलबाला. मृत्यूच्या दाढेतून अनेकांना त्यांनी बाहेर काढून जणू नवीन जीवन दिलेलं.

मात्र ऑपरेशन करण्यापूर्वी जसा एक कन्सर्न फॉर्म (ऑपरेशनच्या परवानगीचा अर्ज) भरून घेतला जातो, त्याच फॉर्मसोबत हे डॉक्टर अजून एक फॉर्म भरून घ्यायचे.

त्यात त्यांनी विचारलेलं असायचं की, जर तुम्ही या ऑपरेशनमुळे वाचलात, तर बाकीचे आयुष्य तुम्ही कशा प्रकारे जगणार आहात, ते इथं लिहून द्यायचं आणि त्याचबरोबर आजवरच्या जीवनात “करायचं राहून गेलेलं” असं काही असेल तर तेही लिहायचं . की मला जीवदान मिळाले तर मी अमुक तमुक करेन !

ऑपरेशनला आलेले रुग्ण तो फॉर्म भरून डॉक्टरकडे देत.

त्यात कुणी लिहिलेलं असायचं की, आजवर कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही. तर आता यापुढे देईन.

– तर कुणी लिहायचं …. माझ्या लहान मुलासोबत मी भरपूर खेळेन. ते राहूनच गेलं आहे.

– कामधंद्याच्या नादात निसर्गात भटकायचं, टूरवर जायचं राहून गेलं आहे. ते नक्की आता करणार

– एकाने तर हेही लिहिलं की, माझ्याकडून आजवर कुणाला दुखावलं गेलं असेल, तर त्यांना शोधून त्यांच्याकडे स्वतः जाऊन माफी मागेन.

– एकीने लिहिलं…. संसार, पै पाहुण्याच्या नादात स्वतःसाठी जगायचं , हसायचंच विसरून गेलेय… यापुढं मनसोक्त हसत हसत जगणार

– निवृत्त वडिलांनी लिहिलेलं…. माझ्या शिस्तीच्या वागण्यामुळे अनेकांना माझ्याबद्दल तक्रारी होत्या. उर्वरित आयुष्यात अशी तक्रार कुणाचीच येऊ देणार नाही.

– एका सासूने लिहिलं होत…. लेक आणि सुनेत मी थोडं डावं-उजवं करत आले. आता लेकीसारखंच सुनेशी वागेन !

अशी अनेकांनी त्यांची- त्यांची उर्वरित जीवनाची संकल्पचित्रे त्या फॉर्ममध्ये शब्दात मांडली.

*

आणि मग डॉक्टर त्या रुग्णाला ऑपरेशन थियेटरमध्ये नेत आणि यशस्वीरीत्या ऑपरेशन करून जीवनदान मिळवून देत. नंतर काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवल्यावर डिस्चार्ज देताना त्या त्या रुग्णाने भरून दिलेला तो “उर्वरित आयुष्याबद्दलचा फॉर्म” त्याला परत देत. आणि त्याला सांगत की, तुम्ही घरी जाल, नव्याने जीवन जगाल, तेव्हा तुम्ही राहून गेलेल्या ज्या ज्या गोष्टी लिहिल्या आहेत, त्या प्रत्यक्षात आणल्यावर त्याच्या समोर “टिकमार्क” करत जा. आणि मग सहा महिन्यांनी तो फॉर्म घेऊन मला भेटायला या आणि सांगा की त्यातल्या कशासारखं जीवन तुम्ही जगला ?

*

आणि मग डॉक्टरांच्या लक्षात आलं की, सगळ्यांनी सगळं लिहिलं पण कुणाशीच भांडण / वैर झालं नाही असा एकही नसणार ! पण तरीही कुणीही असं लिहिलं नव्हतं की, “जर मी वाचलो तर मला अमुक व्यक्तीचा बदला घ्यायचा आहे. माझ्या त्या शत्रूला धडा शिकवायचा आहे. आणि जमलं तर त्याला पूर्ण बरबाद करायचं आहे.”

किंवा असेही कुणी लिहिले नव्हते की, मला अजून खूप पैसे कमवायचे आहेत. खूप श्रीमंत व्हायचं आहे. स्वतःला खूप बिझी ठेवायचं आहे.

*

आणि मग सहा महिन्यांनी भेटायला आलेल्या रुग्णांना डॉक्टर विचारत, “ऑपरेशनपूर्वी जेव्हा कधी तुम्ही स्वस्थ होता. तेव्हा असं आयुष्य का जगला नाहीत, जे गेल्या सहा महिन्यात जगलात. तुम्हाला तसे जगण्यासाठी कुणी अडवलं होतं?”

यावर रुग्ण निरुत्तर होत. मात्र निघताना डॉक्टरचे पाय धरून समाधानाने घरी जात.

डॉ. डीडी क्लास : मृत्यूची घंटा वाजल्यावरच आपण जागे होतो. हार्ट अटॅक आल्यावरच त्यातून वाचल्यावर निष्कारण होणारी धावपळ थांबवतो. जेवणाखाण्याची हेळसांड थांबवतो. शिस्तबद्ध आयुष्य जगतो. आज जरा हे सगळं वाचून झाल्यावर खुर्चीत स्वस्थ डोळे मिटून थोडं चिंतन करा. की हातात किती आयुष्य आहे, माहीत नाही. पण निदान जितके आहे ते कशा प्रकारे जगायचे, ते मनाशी नियोजन करा. आणि जमलंच तर ते सगळं एकाखाली एक असं वहीत लिहून काढा.

आणि मस्तपैकी हातपाय तोंड धुवून नव्याने आयुष्याकडे पाहायला सुरु करा. आणि स्वतःला आधी हेच सांगा की, “अजून कुठं उशीर झालाय? जब जागो तब सवेरा” यामुळे तुम्हाला अजून उत्साह येईल. आणि हे मी स्वानुभवातून सांगतोय.

*

पंधरा वर्षांपूर्वी मीही अशीच चूक केलेली आणि मी ती जाहीरपणे मान्य देखील करतोय.  जेवणाकडे हेळसांड करून धाव धाव धावत होतो. सगळं मनासारखं प्रत्यक्षात आणलं खरं, पण अचानक अटॅकपायी पूना हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल व्हावं लागलं. त्यातून बाहेर आलो खरा, पण आत जातानाचा मी अन बाहेर आल्यावरचा मी यात जमीन-अस्मानाचा फरक होता. जिथं चार पायऱ्या चढायला डॉक्टरांनी बंदी घातली होती आणि चौथ्या मजल्यावरचे (विना लिफ्ट)चे घर ताबडतोब सोडून ग्राउंड फ्लोअरला दुसरं घ्या, असं सांगितलं होतं,तिथं मी ते काहीही न करता मस्त ठणठणीत जगतोय. गडकिल्ले चढून जातोय.  योग्य आणि वेळेवर आहार, रोज स्वतःसाठी एक तास (morning walk)  आणि योगासने, रात्री झोपताना गार दूध, नो जागरण…. बास! याच उपायावर त्या आजारातून बाहेर आलो. एकही गोळी न खाता. म्हणून म्हणतो, मला जी अक्कल “घंटा” वाजवून आल्यावर आली ती वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून हा लेखप्रपंच !

*

आणि अजून एक म्हणजे…. फार वखवख करत जगणे सोडून द्यावे.

कारण… असं म्हणतात की

जो प्राप्त है-पर्याप्त है

जिसका मन मस्त हैtt

उसके पास समस्त है!

लेखक :डॉ. धनंजय देशपांडे

संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈