मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “गीता आणि ज्ञानेश्वरी…” – ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “गीता आणि ज्ञानेश्वरी…”  ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

“गीता आणि ज्ञानेश्वरी यात काय फरक आहे?” सखीने प्रश्न विचारल्यावर मी तिच्याकडे बघतच बसले.

“विचार करून सावकाश उत्तर दिलेस तरी चालेल.” सखीने उदार मनाने मला सवलत दिली.

मी म्हणाले, “गीता आणि ज्ञानेश्वरी यात आई मुलीचे नाते असावे. निश्चित फरक मला सांगता येणार नाही; पण ज्ञानेश्वरी मराठी भाषेत असल्याने, तिची भाषा गीतेपेक्षा अलीकडची असल्याने, अधिक विस्तृत असल्याने संकल्पना अधिक स्पष्ट होतात आणि मनाला अधिक तृप्तता येते. ज्ञानेश्वरी वाचनाने वेगळा दृष्टिकोन गवसतो. “

सखी: “उदाहरण दे.”*

हिचं डोकं आहे की प्रश्नपत्रिका हा प्रश्न गिळून, मनात ठेवून मी म्हटले,”भुंगा आणि कमळ म्हटले की काय आठवते?”

सखी: “कमळातील मधाचा मोह झाल्याने भुंगा रात्रभर कमळात अडकून पडतो.”

मी: “बरोबर. आपल्याला आजवर हेच सांगितले गेले आहे. गीताही सांगते की अपेक्षा हे दुःखाचे, बंधनाचे मूळ कारण आहे. पण असे असेल तर भ्रमर वृत्ती चांगली मानली गेली नसती. हे उलगडताना माऊली म्हणतात, कोणत्याही गोष्टीचा अर्थ लावताना सर्व बाजूने विचार करायला हवा.

भ्रमराला लाकडातून बाहेर यायचा मार्ग सापडत नाही, म्हणून लाकूड पोखरून बाहेर येतो. लाकूड पोखरणाऱ्या भुंग्याला कमळ पोखरणे अशक्य नाही. परंतु लाकूड आणि कमळ यातील भेद तो जाणतो. रात्र सरेल, सकाळ झाली की पाकळ्या उमलतील आणि आपण मुक्त होऊ, हे त्याला माहीत असते.

जी गोष्ट आपोआप होणार आहे, त्यासाठी विनाकारण कष्ट घ्यायचे, अस्वस्थ व्हायचे कारण नाही. काही कर्म करावी लागतात, तर काही साध्य होण्यासाठी योग्य वेळ यावी लागते. काही वेळा कष्ट घ्यावे लागतात तर काही वेळा धीर धरावा लागतो.

कृती आणि संयम यापैकी कधी काय करायचे, ते कळणे म्हणजे ज्ञान. गीतेचा कृतीवर भर आहे, तर ज्ञानेश्वरीचा संयमावर, सदसद् विवेक बुद्धीवर आहे.ज्या कमळातील मकरंद खाल्ला, त्याला छेद देणे  अयोग्य आहे. कमळाच्या कोमल सहवासात राहणे, सकाळ झाली की निघून जाणे, जास्त संयुक्तिक आहे.

गुळाला मुंगळा चिकटून राहतो त्याप्रमाणे पाकळी उमलल्यावर भुंगा कमळाला चिकटून रहात नाही. पोखरत नाही ही कृतज्ञता आणि निघून जातो ही अलिप्तता, दोन्ही गोष्टी माणसात असतात, त्यासाठी फक्त आत्मचिंतन करण्याची गरज असते.

आत्मचिंतन का करावे? हे सांगताना माऊली म्हणतात की प्रत्येक माणसाचा उपजत कल ओळखण्यासाठी आत्मचिंतन करावे. त्यासाठी एका जागी डोळे मिटून काहीही न करता सातत्याने, नियमित शांत बसावे. काहीच न करणे म्हणजे बाह्य गोष्टीकडे आकर्षित न होता स्वतःच्याच मन म्हणजे भावना आणि बुद्धी म्हणजे विचारांकडे लक्ष केंद्रीत करावे. निसर्ग ही खूप मोठी शक्ती आहे, पुरेसा वेळ दिला तर आपल्याला वैश्विक शक्तीशी जोडते.

कमळ म्हणजे बुद्धी,

भ्रमर म्हणजे मन,

पाकळ्या म्हणजे चक्षु,

रात्र म्हणजे अज्ञान,

सकाळ म्हणजे मोक्ष  असाही अर्थ होतोच.

प्रत्येक गोष्टीच्या अनेक मिती असतात. सर्व मिती लक्षात येणे, माणसाला शक्य नाही.

पण माणूस जी प्रतिक्रिया देतो, त्यावरून त्याचा कल लक्षात येतो.

ध्यान करावे हे गीता सांगते, का करावे हे ज्ञानेश्वरी सांगते.

माणूस एखाद्या शब्दाचा काय अर्थ घेईल, हे त्याच्या धरणाशक्तीवर अवलंबून असते. म्हणून लोकांकडे, बाह्य जगाकडे लक्ष न देता स्वतःच्या प्रेरणेकडे लक्ष द्यावे, हे ज्ञानेश्वरी वाचून कळते.

गीता बुद्धीला खाद्य पुरवते आणि ज्ञानेश्वरी मनाला ताब्यात ठेवायला शिकवते.

पूर्ण टाळून मनाने त्याचा विचार करण्यापेक्षा थोडा अनुभव घेऊन मनाने अलिप्त व्हावे, हा भ्रमर वृत्तीचा अर्थ माऊली सांगतात.

कृतीपेक्षा कल्पना माणसाला जास्त अधोगतीला नेते.

 गीता भक्ती शिकवते.डोळ्यांना दिसते त्यावरून, एकच बाजू जाणून निष्कर्ष काढू नये, ही सबुरी ज्ञानेश्वरी वाचताना येते.

गीता वाचली की छान वाटते, अहंकार सुखावतो. ज्ञानेश्वरी वाचल्यावर आपल्याला काहीच माहीत नाही, ही जाणीव होते. शब्द वाचता येतात पण अर्थ कळण्यासाठी मनन करावे लागते, ही जाग ज्ञानेश्वरी वाचून येते.

गीता शास्त्र असेल तर ज्ञानेश्वरी त्याचा वापर कसा करायचा ते सांगते.

सकारात्मक विचार करायला गीता शिकवते. नम्र रहायला ज्ञानेश्वरी शिकवते.

“काय करावे” ते गीता सांगते. “कसे करावे” हे ज्ञानेश्वरी वाचून कळते.                     

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈