मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 45 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 45 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

८०.

आकाशात निरर्थकपणे भटकणाऱ्या

शिशिरातल्या ढगाच्या तुकड्याप्रमाणे

माझं अस्तित्व आहे.

 

हे माझ्या सदैव प्रकाशणाऱ्या सूर्या!

तुझ्यापासून विलग होऊन

किती महिने, किती वर्षे मी वाट पाहातो आहे.

तुझ्या प्रकाशमय हाताचा स्पर्श होईल,

माझी वाफ विरेल आणि तुझ्याशी एकरूप होईन.

 

जर तुझी तशी इच्छाच असेल आणि

तुझा तसा खेळ असेल तर

तरंगणारा हा माझा मोकळेपणा स्वीकार,

त्यात रंग भर, सोनेरी छटेनं त्याचा काठ रंगव,

उनाड वाऱ्यावर तो सोडून दे

आणि त्यात अनेक चमत्कार दाखव.

 

आणि रात्रीच्या वेळी हा खेळ संपवावा

अशी तुझी इच्छाच असेल तर मी वितळून जाईन,

अंधारात नष्ट होईन अगर

शुभ्र प्रभातीच्या शांत पारदर्शक शुद्धतेच्या

प्रसन्न हास्यात विलय पावेन.

 

८१.

अनेक दिवस आळसात घालवल्यावर

मी पस्तावलो आहे.

पण परमेश्वरा! तो दिवस वाया गेलेला नसतो.

तू माझा दिवस हातात घेतलेला असतोस.

 

चराचरात लपून तू बीजांतून रोपं फुलवतोस.

कळ्यांची फुलं आणि फुलांची माळ बनवतोस.

 

मी दमून आळसानं बिछान्यावर पडून राहिलो.

वाटलं सारी कामं थांबलीत.

 

सकाळी उठून पाहिलं तर. . .

माझी बाग टवटवीत फुलांनी बहरून गेली होती.

 

८२.

माझ्या धन्या, तुझ्याकडे समय अंतहीन आहे.

तुझी मिनिटं कोण मोजणार?

रात्रंदिवस जातात, युगं मुलांप्रमाणं कोमेजतात.

कसं थांबावं, तुला समजतं!

 

शतकं एखाद्या रानफुलाप्रमाणं

एकापाठोपाठ येतात -जातात.

 

गमवायला आम्हाला वेळ नाही आणि

वेळ नाही म्हणून येणारी संधी

आम्हाला अधाशीपणानं पकडावी लागते.

आम्ही उशीर करू शकत नाही.

आम्ही दरिद्री आहोत.

 

कुरबुर करणाऱ्या येणाऱ्या

प्रत्येक माणसाला मी वेळ देतो

आणि अशा रीतीनं माझा वेळ संपून जातो.

(वेळ नसल्यामुळे) तुझ्या वेदीवर समर्पण

करता येत नाही,ती वेदी रिकामीच राहते.

 

उशीर झाल्यामुळे मी घाईघाईनं येतो.

तुझी कवाडं बंद होतील अशी शंका मला येते,

पण वेळ अजून गेलेली नाही,हे मला समजतं.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈