मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आई वडिलांचे आईवडील ” होता आले पाहिजे…. ! …जयंत जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ आई वडिलांचे आईवडील ” होता आले पाहिजे…! …जयंत जोशी  ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

“आई वडिलांचे आईवडील ” होता आले पाहिजे…. !

….एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो. जो जातो तो सुटतो , पण परीक्षा असते मागे राहणाऱ्याची…. कोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार ? हे तर भगवंतालाच माहीत… 

जो मागे रहातो त्याला आठवणी येणं, अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं !

आता प्रश्न असा असतो की ही आसवं, हे रडणं थांबवायचं कुणी…? मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं ? पाठीवरून हात कुणी फिरवायचा ?…. 

निश्चितपणे ही जबाबदारी असते मुलांची , मुलींची , सुनांची….

थोडक्यात काय तर….दोघांपैकी एकजण गेल्यानंतर मुलामुलींनाच आपल्या आई वडिलांचे आईवडील होता आलं पाहिजे…..!

लक्षात ठेवा, लहानपणी आई वडिलांनी नेहमी मुलांचे अश्रू पुसलेले असतात, आजारपणात अनेक रात्री जागून काढलेल्या असतात, स्वतः उपाशी राहून , काहीबाही खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात,

परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतात.

म्हणूनच आता ही आपली जबाबदारी असते… त्यांच्या सारखंच निस्वार्थ प्रेम करण्याची….

असं झालं तरच ते आणखी जास्त आयुष्य समाधानाने जगू शकतील.  नाहीतर ” तो माणूस म्हणजे वडील ” किंवा ” ती स्त्री म्हणजे आई ” तुटून जाऊ शकते , कोलमडून पडू शकते !

आणि ही जवाबदारी फक्त मुलं , मुली आणि सुना यांचीच असते असे नाही, 

तर ती जबाबदारी प्रत्येक नातेवाईकाची , परिचिताची , मित्र मैत्रिणींची …….सर्वांची असते !

फक्त छत , जेवणखाणं आणि सुविधा देऊन ही जबाबदारी संपत नाही तर अशा व्यक्तींना आपल्याला वेळ आणि प्रेम द्यावेच लागेल तरंच, ही माणसं जगू शकतील !

आयुष्याचा जोडीदार गमावणं म्हणजे नेमकं काय ? हे दुःख शब्दांच्या आणि अश्रूंच्या खूप खूप पलीकडचं असतं ……

म्हणून अशा व्यक्तींना समजून घ्या ! केवळ माया , प्रेम आणि आपुलकीचे दोन गोड शब्द एवढीच त्यांची अपेक्षा असते ती जरूर पूर्ण करा. त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करा आणि त्यांना वेळ द्या !

उद्या हा प्रसंग प्रत्येकावर येणार आहे याची जाणीव ठेवून नेहमी त्यांच्याशी प्रेमाने,मायेने आणि आपुलकीने वागा !

लक्षात असूद्या,आई वडील हेच आपले खरे दैवत, त्यांची जिवंतपणीच काळजी घ्या, ते गेल्यावर तुमचे चारिधाम अथवा लाखोंचे दान देखील तुमच्या कामी येणार नाही…..!!

लेखक : जयंत जोशी 

संग्राहिका : वीणा छापखाने 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈