मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वाट… सुश्री वर्षा बालगोपाल ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ वाट… सुश्री वर्षा बालगोपाल ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

 ‘वाटेवर काटे वेचित चाललो

वाटले जसा फुलाफुलात चाललो’

रेडिओवर हे गाणे लागले होते. ऐकताना ती तल्लीन झाली होती आणि तिच्या डोळ्यापुढून तिची वादळवाट गेली. होय अगदी खडतर वाट, बिकट वाट अशी तिच्या आयुष्याची वाट.

हिला जन्म देताच तिची आई देवाघरी गेली आणि तेथूनच दु:ख वाटेत आडवे आले . तिची ही पाऊलवाट खाचखळग्याची वाट झाली.

जणू दु:ख तिच्या वाटेत पडले होते. ते वाटेत अडथळे निर्माण करत होते. शेवटी तिनेच दु:खाशी वाटाघाटी केल्या. त्या अनवट वाटेवरची वाटसरू होऊन वाट भरकटू नये म्हणून ती वाटाड्या शोधत होती.

आता कोणती वाट धरायची हे ठरवायला तिला चारी वाटा मोकळ्या होत्या. थोडा विचार करून तिने एक वाट निवडली.  पण हाय रे दुर्दैव! तेथेही दु:ख वाट वाकडी करून तिच्यापर्यंत आलेच. जणू त्या वाटेवर तिला वाटचकवा लागला होता. पुन्हा पुन्हा ती दु:खापाशी येत होती.

आता तिला वाटेत येणार्‍या दु:खाला वाटेला लावायचे होते. त्याचीच वाट लावून न परतीच्या वाटेवर त्याला सोडायचे होते. दु:खाच्या मागे आनंद सुखे वाटेवर पायघड्या घालून उभे आहेत हे तिला जाणवत होते.

पण आनंद सुखाच्या वाटेला जाणे वाटतं तितकं सोपं नव्हतं. त्यासाठी तिला वाट फुटेल तिकडे जाऊन उपयोगी नव्हत. जवळची वाट, लांबची वाट असा विचार न करता सुसाट वाट तरीही भन्नाट वाट तिला निवडायची होती.

एक दीर्घ श्वास घेताच आत्मविश्वास तिच्याच वाटेत उभा असलेला दिसला. तिला वाट दिसत नव्हती म्हणून तिची वाट तिनेच निर्माण करण्याचे ठरवले. दु:खांची वाट चुकवून त्यांची लागलेली वाट पाहून सुखाच्या वाटेकडे ती डोळे लावून बसली होती.

प्रयत्नांचा असलेला वाटेवरचा दगड तिला खुणावत होता. जिद्द, चिकाटी तिचे यशाचे वाटेकरी झाले होते. ही डोंगराची वाट, वाकडी तिकडी वाट, वळणावळणाची वाट असली तरी आता जणू नवी वाट फुटली होती. सगळ्या य़शस्वी लोकांची धोपट वाट त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीत असते हे तिला कळले होते. म्हणून हीच निसरडी वाट तिला तिच्या यश फुलांची वाट करायची होती.

म्हणूनच दुसर्‍या कोणाचेही न ऐकता मनाची साद ऐकून दुसरी वाट न स्विकारता दुर्मुखतेची वाट सोडून चोर वाटा , पळवाटा यांना काट देऊन रानवाटेलाच वहिवाट करून मेहनतीने तिने दगडी वाट तयार केली.

आता कोणी तिच्या यशाची, सुखाची वाटमारी करत नव्हते. उलट तिला आपला आदर्श मानून तिच्या वाट दाखवण्या कडे, तिची यशोगाथा तिच्याच मुखाने ऐकण्यासाठी डोळ्यात प्राण आणून तिची वाट बघू लागले.

ती सगळ्यांचा अभिमान बनून, एक चांगला आदर्श बनून, उजळमाथ्याने तिची यशोगाथा सगळ्यांना सांगत होती••••

“दु:खाने कितीही वाट अडवली ,आपली वाट मळलेली वाट झाली असली तरी वाईट विचारांच्या आडवाटेने न जाता आपल्या मेहनतीने जिद्द चिकाटीची वाट हीच सरळसोट वाट आहे मानून आत्मविश्वासाला सहवाटसरू करून आपलीच वाट आपल्या पायाखालची वाट केली तर यश किर्ती केवळ तुमची आणि तुमचीच आहे,” या वाक्याने संपलेल्या तिच्या स्फूर्तीकथेने टाळ्यांचा कडकडाट झाला आणि  आनंदाश्रूंना तिने वाट मोकळी करुन दिली . साश्रू भरल्या नयनाने ती म्हणाली, ” याच खर्‍या प्रकाशवाटा असतात.”

लेखिका : सुश्री वर्षा बालगोपाल

संग्राहिका: सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈