मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रामाणिकपणे काम हेच सर्वोत्तम काम… ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ प्रामाणिकपणे काम हेच सर्वोत्तम काम…  ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

निवृत्त होईपर्यंत प्रामाणिकपणे काम करणे, हेच सर्वोत्तम….

एक सुतार काम करणारा ६० वर्षांचा माणूस होता. तो आत्ता ज्या मालकाकडे काम करत होता तिथे त्याला ४० वर्षे झाले होते. ह्या ४० वर्षाच्या काळात त्याने हजारो घरे बनवली होती. पण आता त्याला संसाराला वेळ द्यायचा होता.

तो त्याच्या मालकाकडे जाऊन म्हणतो, मालक ४० वर्षे मी तुमच्याकडे इमाने इतबारे काम केले. पण आता मला माझ्या संसाराला वेळ द्यायचा आहे. माझ्या मुलांबरोबर, माझ्या मुलांच्या मुलांबरोबर वेळ घालवायचा आहे. मला निवृत्त व्हायचे आहे—- आता मालक तर मालक असतात, जाताजातासुद्धा आपल्या कामगारांकडून अजून थोडं काम कसं करून घ्यायचं हे त्यांना चांगलेच माहिती असते…

तेव्हा मालक त्या सुताराला म्हणतो, “ ठीक आहे. तुला निवृत्त व्हायचंय तर तू होऊ शकतोस. पण एक शेवटचे तीन महिन्यांचे काम आले आहे ते फक्त करून जा. ते काम झाल्यानंतर तुझा छानपैकी निरोप समारंभ करू आणि एकदम उत्साहात तुला निरोप देऊ.”  एवढे वर्ष मालकाने आपल्याला सांभाळून घेतलं, आपल्याला आधार दिला, हा विचार करून त्या सुताराने ते काम करायला होकार दिला.

पण आता त्याच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आला होता. त्याने विचार केला होता की मस्त घरी बसून आराम करेन, पण अजून ३ महिने काम करावे लागणार होते. आतापर्यंत प्रत्येक काम मन लावून केले होते, पण आता कसेतरी करायचे म्हणून तो काम करत होता. ज्या सुताराने आपल्या पूर्ण आयुष्यात सगळ्यात सर्वोत्तम घरे बनवली, पण आता शेवटचे घर बनवताना त्याचे अजिबात मन लागत नव्हते. कसेतरी लाकडे कापायची, कसेतरी खिळे ठोकायचे, कसेतरी पॉलिशिंग करायचे असे करत करत तो घर बनवत होता. कसंबसं त्याने ते अर्धवट मनाने का होईना पण ३ महिन्यात घर पूर्ण केले. घर पूर्ण झाल्यानंतर तो सुटकेचा निश्वास सोडतो. झालं बाबा कसंतरी असा तो विचार करतो. तो मालकाला जाऊन सांगतो, मालक घर पूर्ण झालं आहे. तेव्हा मालक त्याच्याबरोबर घर बघायला निघतो. 

घर एकदम जवळ आलेले असताना तो मालक थांबतो, त्या सुताराचा हात पकडतो आणि त्याच्या हातात त्या घराच्या चाव्या देत म्हणतो, “ हे जे घर तू बनवलं आहेस ते तुला मी माझ्यातर्फे भेट म्हणून देत आहे. गेली ४० वर्षे तू माझ्याकडे जी मेहनत केलीस त्याचे फळ म्हणून हे घर मी तुला देत आहे. हे तुझे स्वतःचे घर होते जे तू बनवत होता.”

मित्रांनो विचार करा काय वाटले असेल त्या सुताराला…?? काय चालले असेल त्याच्या मनात…??—-

‘मला कोणी सांगितले असते की हे माझे घर आहे तर माझ्या आयुष्यातले सगळ्यात वाईट घर बनवण्याऐवजी मी सर्वोत्तम घर बनवले असते. अरे ! कोणी मला सांगितले का नाही की हे माझे घर आहे. सांगितले असते तर एक एक खिळा, एक एक लाकूड पॉलिश करताना मी हजार वेळा विचार केला असता आणि एक सर्वोत्तम घर बनवले असते. मी आता परत मागे सुद्धा जाऊ शकत नाही. का मी असे केले…?? ‘ 

“नोकरीचे असो नाहीतर इतर कुठलेही काम आपण स्वतःसाठीच करतोय असे समजून करा….. त्यामुळे 

आपल्यावर पश्चातापाची वेळ कधीच येणार नाही…आणि चांगले काम केल्याचा आनंद आपल्याला कायमचा मिळेल…!! “

सुंदर आहे ना कल्पना…!!  कुठेही काम करा प्रामाणिकपणे करा आणि चांगले काम करा. चांगले काम केल्याचे फळ नेहमीच चांगले मिळते.                  

लेखक …अज्ञात…

संग्राहक : श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈