मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 28 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 28 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

४२.

फक्त तू आणि मी

असे दोघेच एका नावेत बसून

पर्यटनाला जायचे म्हणाला होतास.

 

ही आपली यात्रा कोणत्या देशाला जाणार,

केव्हा संपणार हे कोणालाच माहीत नाही.

 

किनारा नसलेल्या त्या महासागरात

तू शांतपणे स्मितहास्य करत असताना

लाटांसारखी माझी गीतं

 नि:शब्दपणे स्वरमय होतील.

 

ती निघायची वेळ अजून आली नाही का?

कामं अजून पूर्ण व्हायची आहेत का?

 

बघ! किनाऱ्यावर सांज उतरली आहे,

तिच्या संधिप्रकाशात समुद्रपक्षी

आपापल्या घरट्याकडं परत फिरताहेत.

 

साखळदंड केव्हा सुटतील आणि

सूर्याच्या सायंकालीन अखेरच्या किरणांप्रमाणं

रात्रीच्या काळोखात नाव अंधारात विरून जाईल?

 

४३.

त्या दिवशी तुझ्या आगमनासाठी मी तयार झालो नव्हतो.

तू न सांगताच ऱ्हदयप्रवेश केलास,

इतर साध्या माणसाप्रमाणं!

आणि हे राजेश्वरा, तू येऊन माझ्या आयुष्यातल्या

क्षणिकतेवर चिरंतनपणाची मुद्रा उमटविलीस!

 

आज सहजपणे माझी नजर त्या क्षणावर वळते

आणि तुझी मुद्रा मला दिसते तेव्हा

सुखदुःखाच्या क्षणिक दिवसांप्रमाणं

ती विस्मरणाच्या धुळीत गेल्याचं समजतं.

 

धुळीतल्या माझ्या पोरकट खेळाकडं तू तिरस्कारानं पाहिलं नाहीस.

तारका – तारकांच्या मधून वाजणारी

तुझी पावलं च् माझ्या भोवतालातून

मला ऐकू येत होती.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈