मराठी साहित्य – रंगमंच ☆ नाट्यउतारा: आनंद – स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ 

श्रीमती उज्ज्वला केळकर

 ☆ रंगमंच ☆ नाट्यउतारा: आनंद – स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर’ ☆ 

आनंद

(आनंद नाटकातील आनंद आणि डॉ. उमेश म्हणजेच आनंदचा बाबूमोशाय, यांच्यातील एक संवाद)

आनंद: (रुद्ध स्वरात)  बाबूमोशाय, कितीदा कितीदा मला आठवण करून देशील- की तुझं आयुष्य आता संपलं आहे. – शेवटाची सुरुवात झाली आहे.  बाबूमोशाय, चांदयापासूंच नव्हे, तर माझ्या मरणापासूनही मी दूर आलो होतो. वाटलं होतं, तुम्हा लोकांच्या जीवनाच्या बहरलेल्या ताटव्यातून हिंडताना माझी आयुष्याची लहानशी कणिकाही डोंगरासारखी मोठी होईल. थेंबाला क्षणभर समुद्र झाल्यासारखा वाटेल. पण- नाही- बाबांनो- मरणाला मारता येत नाही. आपल्या मनातून काढलं तर समोरच्या डोळ्यात ते तरंगायला लागतं-तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात मी माझं मरण पाहतो आहे- पण बाबूमोशाय,  तू म्हणतोस, ते खरं आहे. मी क्षमा मागतो तुझी – तुम्हा सर्वांची- इथं येऊन तुमच्या आयुष्यात असा धुडगूस घालण्याचा मला काहीही अधिकार नव्हता. – मी चुकलो- मी- मी – उद्या चांदयाला परत जाईन बाबूमोशाय-

उमेश: (उठून त्याचे खांदे धरून ओरडतो ) तू जाऊ शकत नाहीस, आनंद – माझ्या लाडक्या- तू आता कुठंही जाऊ शकत नाहीस- तू मरणार असशील तर इथे – माझ्या घरात – माझ्या बाहुपाशात मरणार आहेस-

आनंद: (हसतो.) भाबी घरात आल्यावर तुझे बाहुपाश मोकळे सापडले पाहिजेत मात्र –

ओ.के. बाबूमोशाय, ती – कविता- मैं टेप शुरू करता हूं.

उमेश: कोणती कविता ?

आनंद: शर्त 

उमेश: एका अटीवर

आनंद: कोणत्या?

उमेश: नंतर तूही काही तरी म्हंटलं पाहिजेस. आपले दोघांचे आवाज एकत्र टेप करायचे.  कबूल?

आनंद: कबूल. कर सुरुवात (टेप चालू करतो.)

उमेश: (कविता म्हणतो.)

एकच शर्त की

तुटताना धागे

वळोनिया मागे

पाहायचे नाही

वेगळ्या वाटेची

लाभता पायकी

असते नसते

म्हणायचे नाही.

वांझोटया स्वप्नांचा

उबवीत दर्प

काळजात सर्प

पाळायचा नाही

दिवा हातातील

कोणासाठी कधी

काळोखाच्या डोही

फेकायचा नाही.

उमेश: आता तू-

आनंद: पण मी काय म्हणू?

उमेश: काहीही. चल, मी रेकॉर्ड करतो.

आनंद: पण- (हसतो) हं, आठवलं. पण असं नाही- थांब – हं-

(उमेश टेप चालू करतो. आनंद युवराजाचा पवित्रा घेऊन उभा राहतो. तेवढ्यात काही लक्षात येते. तसाच मागे जाऊन एक चादर काढतो, डोक्याला गुंडाळतो आणि फुलदाणीतील फूल हातात घेतो. टेप चालूच असते. नंतर:)

आनंद: (नाटकी स्वरात ) बाबूमोशाय, बाबूमोशाय, – उद्या मी नसेन, पण आज आहे आणि आज इतका आहे अब्बाहुजूर, की उद्या मी असेन की नसेन याची मला चिंता वाटत नाही. उद्या येणार्‍या पाहुण्याच्या फिकिरीत माझी जिंदगी आज मी जाळून टाकणार नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत जगेन जहापनाह आणि असा जगेन की माझं जगणं तुम्हाला क्षणाक्षणाला जाणवत राहील. आषाढातल्या मुसळधार पावसासारखं. मरणावर मात करण्याचा हाच रास्ता आहे, हुजूर, ते येईपर्यंत जगत राहणं. मी जीवंत आहे तोपर्यंत तुम्हीच काय, जगातली कोणतीही सत्ता मला मारू शकत नाही. हा: हा: हा:!

(आनंद उमेशला मिठी मारतो. दोघेही गळ्यात गळा घालून खळखळून हसतात.)

वि. वा.शिरवाडकर यांच्या आनंद नाटकातील  एक उतारा

– स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈