मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक२८ – भाग २ – राणी सातपुड्याची आणि राणी जंगलची ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २८ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ राणी सातपुड्याची आणि राणी जंगलची  ✈️

जबलपूरहून कान्हाला जाण्याआधी थोडी वाट वाकडी करून घुघुआ येथील जीवाश्म राष्ट्रीय उद्यान पाहिले. इथल्या म्युझियममध्ये वनस्पती व प्राणी यांचे जीवाश्म ठेवले आहेत. प्राणी अथवा वनस्पती मृत झाल्यानंतर सर्वसाधारण परिस्थितीमध्ये त्यांचे विघटन होते पण एखाद्या आकस्मिक घटनेमध्ये उदाहरणार्थ भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, अशा वेळी झाडे, प्राणी क्षणार्धात गाडली जातात. त्यावेळी ऑक्सिजन व जीवजंतूंच्या अभावी कुजण्याची क्रिया न होता त्या मृत अवशेषांमध्ये हळूहळू खनिज कण भरले जातात. कालांतराने तो जीव, वनस्पती यांचे दगडामध्ये परिवर्तन होते. यालाच जीवाश्म असे म्हणतात अशी माहिती तिथे लिहिली होती. येथील जीवाश्मांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यात आला आहे. म्युझियममध्ये अशी दगडी झाडे, डायनासोरचे अंडे, इतर शास्त्रीय माहिती, नकाशे आहेत. बाहेरील विस्तीर्ण वनामध्ये रुद्राक्ष, निलगिरी, फणस, आंबा, जांभूळ, आवळा, रानकेळी या वृक्षांचे जीवाश्म बनलेले बघायला मिळाले. संशोधनामध्ये या जीवाश्मांचे वय साडेसहा कोटी वर्षे आहे असा निष्कर्ष निघाला आहे. काही कोटी वर्षांपूर्वी आफ्रिका, भारतीय द्विपखंड, ऑस्ट्रेलिया हे सर्व एकमेकांना जोडलेले होते व हा भाग गोंडवन म्हणून ओळखला जात असे. कालांतराने हे भाग विलग झाले. बहुरत्ना वसुंधरा राणीचा हा अद्भुत खजिना पाहून कान्हाकडे निघालो.

प्रवासाच्या आधी जवळजवळ चार महिने आम्ही मुंबईहून बुकिंग केले होते. त्यामुळे प्रत्यक्ष कान्हाच्या अरण्यातील मध्यप्रदेश पर्यटन मंडळाचे किसली येथील गेस्ट हाऊस राहण्यासाठी मिळाले होते. दिवसभर प्रवास करून कान्हाला पोहोचलो तर जंगलातला निःशब्द अंधार दाट, गूढ झाला होता. गेस्ट हाऊस थोडे उंचावर होते. पुढ्यातल्या लांब- रुंद अंगणाला छोट्या उंचीचा कठडा होता. त्यापलीकडील मोकळ्या जंगलात जाण्यास प्रवाशांना मनाई होती कारण वन्य जीवांच्या जाण्या- येण्याचा तो मार्ग होता. जेवून अंगणात खुर्च्या टाकून बसलो. रात्रीच्या निरभ्र आकाशात तेजस्वी गुरू चमकत होता. थोड्याच वेळात झाडांच्या फांद्यांमागून चांदीच्या ताटलीसारखा चंद्रमा वर आला. उंच वृक्षांच्या काळोख्या शेंड्यांना चांदीची किनार लाभली.

दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता जंगल सफारीला निघालो तेव्हा पिवळसर चंद्र मावळत होता आणि शुक्राची चांदणी चमचमच होती. तिथल्या शांततेचा भंग न करता भोवतालचे घनदाट विशुद्ध जंगल बघंत जीपमधून चारी दिशा न्याहाळत होतो. साल, साग, करंजा, सिल्वर ओक, महानिंब, ओक, पाईन अशा प्रकारचे अनेक  वृक्ष होते.  ‘भुतांची झाडं'(ghost trees) होती. या झाडांचे बुंधे सरळसोट व पांढरे स्वच्छ असतात. काळोखात ते बुंधे चमकतात. म्हणून त्यांना ‘घोस्ट ट्रिज’ असे म्हणतात. तेंदू पत्ता, शिसम, महुआ, मोठमोठ्या बांबूंची दाट वने आणि उंच गवताळ सपाट प्रदेश, वेगवेगळे जलाशय यांनी हे जंगल समृद्ध आहे. कळपांनी फिरणाऱ्या, पांढऱ्या ठिपक्यांच्या  सोनेरी हरिणांचा मुक्त वावर होता. मोर भरपूर होते. लांडगा दिसला. गवा होता. झाडाच्या फांद्यांसारखी प्रत्येक बाजूला सहा सहा शिंगे असलेला बारशिंगा होता. निळकंठ, सुतार , पॅरकिट असे  पक्षी होते. एका झाडाच्या ढोलीत घुबडाची दोन छोटी गोजिरवाणी, वाटोळ्या डोळ्यांची पिल्ले स्तब्ध बसलेली दिसली. मुख्य प्रतीक्षा होती ती वाघोबांची! वनराजांचा माग काढत जीप जंगलातल्या खोलवर गेलेल्या वाटा धुंडाळत होती. अचानक सात- आठ जंगली कुत्रे दिसले. सभोवती चरत असलेला हरिणांचा कळप उंच कमानीसारख्या उड्या मारत विद्युत् वेगाने तिथून दूर निघून गेला. जीवाच्या आकांताने केकाटत मोरांनी उंच उड्या मारून झाडांचा आसरा घेतला. आणि एक बिचारे भेदरलेले हरिणाचे पिल्लू उंच गवतात आसरा घेऊ बघत होते तोपर्यंत त्या जंगली कुत्र्यांनी त्याला घेरले. आठ दहा मिनिटात त्या हरिण बाळाचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला. कावळे आणि गिधाडे वरती घिरट्या घालू लागले. कुत्र्यांची टोळी आणखी सावज शोधायला निघून गेली. सृष्टीचा ‘जीवो जीवस्य जीवनम्’ हा कायदा अनुभवून आम्ही तिथून निघालो.

मध्यप्रदेश– राणी जंगलची भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈