मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 150 ☆ तीन सख्या ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 150 ?

☆ तीन सख्या ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

किती दिवसांनी सख्या भेटल्या…

सांजवेळी पाणवठ्यावर ,

व्यथा मनीच्या अशा  उमटल्या

आपोआपच ओठांवर….

तहानलेल्या नदीपरी त्या नांदती संसारी…

शल्य मनीचे असे जाहले

व्यक्त विहीरीच्या साक्षीने

कितिक मेल्या..बुडून गेल्या

या पाण्यात खोल…

सख्या बोलल्या निश्चयाने..

“बेला च्या पानापरी राहू…

ढळू न देऊ तोल…”

समजून घेऊ आपण आता

या जगण्याचे मोल..

मुक्त होऊनी जळात न्हाल्या,

डोण जाहली तृप्त…

रूपवती त्या बनल्या आता..

मासोळ्या स्वच्छंद…

अशा घागरी स्वच्छ घासल्या

सोन्यावाणी लख्ख…

डोईवर ते घडे घेऊनी निघाल्या

तिनही गरती झोकात…

 

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈