मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 208 ☆ वाट माझी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे


? कवितेच्या प्रदेशात # 208 ?

वाट माझी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

चांदण्याची वाट माझी

चालले आहे सुखाने

भोगले जे सौख्य येथे

तृप्ततेच्या जाणिवेने

एक छोटा गाव माझा

डोंगराच्या पायथ्याशी

जन्म माझा धन्य झाला

चंद्र घेता मी उशाशी

वाट माझी गंध ल्याली

रातराणी शुभ्र साधी

चार वाटा ज्या मिळाल्या

चौक झाला की सुगंधी

त्या सुगंधी वादळाला

काय आता नाव द्यावे

जन्म घेण्या या इथे मी

चांदणी, आकाश व्हावे

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈