मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ नात्यांचा श्वास …. विश्वास ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ नात्यांचा श्वास …. विश्वास ☆ डॉ अभिजीत सोनवणे

“विश्वास” हा शब्द वाचायला एक सेकंद, विचार करायला एक तास आणि समजायला एक वर्ष लागतं….मात्र तो सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य द्यावं लागतं…! 

नात्यांचा “श्वास” हा विश्वासावर चालतो…!!! 

जेव्हा विश्वास उडून जातो, तेव्हा हि नाती खळ्ळकन् फुटून जातात… फुटलेले तुकडे पुन्हा जोडायचं म्हटलं तरी ते पुन्हा नव्या सारखे होत नाहीत…. 

फाटलेल्या कपड्याला शिवण घातली तरी शिवण दिसायचीच….! 

असेच फुटलेले तुकडे आणि फाटलेल्या चिंध्या रस्त्यावर पडून आहेत वर्षानुवर्षे… ! 

असेच गोळा केलेले तुकडे एकत्र करून त्यांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे…. 

आणि फाटलेल्या चिंध्याना शिवण घालण्याचा प्रयत्न करत आहे…

आमच्या खेड्यात याला “वाकळ” म्हणतात…! 

मला ही वाकळ खूप आवडते, कारण या वाकळी मध्ये साडी पासून सफारी पर्यंत आणि सफारी पासून लेंग्यापर्यंत सर्व चिंध्या एकमेकांचे हात धरून सोबत राहतात…. मला रस्त्यावर भेटणाऱ्या भिक्षेकर्यांचही असंच आहे…  रावा पासून रंकापर्यंत आणि रंकापासून रावापर्यंत येथे सर्वजण सापडतात…. 

आयुष्यभर या चींध्यांनी अपमानाचे चटके सहन केलेले असतात…. कदाचित म्हणूनच वाकळ जास्त उबदार असते….!

अशा या दिसायला बेढब …चित्र विचित्र….  मळखाऊ…. चींध्यांनी बनलेल्या, तरीही उबदार वाकळीचा फेब्रुवारी महिन्यातील “शिवणप्रवास” आपणास सविनय सादर !!! 

*(आमच्या कामाचा मूळ गाभा फक्त वैद्यकीय सेवा देणे नसून, वैद्यकीय सेवा देता देता, त्यांचा विश्वास संपादन करणे, त्यांच्याशी चांगले नाते निर्माण करणे, भिक मागण्याची कारणे शोधणे, त्यांच्यामधील गुणदोष शोधून त्यांना व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांना झेपेल तो व्यवसाय टाकून देणे…. जेणेकरून ते भिक्षेकरी म्हणून नाही, तर कष्ट करायला लागून, गावकरी होऊन ते सन्मानाने जगतील… कुणीही कुणापुढे हात पसरून लाचार होऊ नये, जगात कोणीही भिकारी असू नये, हा आमच्या कामाचा मूळ गाभा आहे, वैद्यकीय सेवा देणे हा त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही फक्त मार्ग म्हणून निवडला आहे)*

भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी

  1. या महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणच्या तीन प्रौढ महिला भेटल्या. तिघींचीही मुलं मोठी आहेत. धुणं भांडी करून, कुणाचीही साथ नसताना; खस्ता खाऊन, मुलांना मोठं केलं, मुलांनी संसार मांडले. पुढे मुलांना आईचं ओझं झेपेना… मुलांनी तीनही आईंना घराच्या बाहेर काढले….

या आईंनी पोरांची हाता पाया पडून गयावया केली….

मुलं म्हणाली, ‘आई आजपर्यंत काय केलंस तू आमच्यासाठी… ?’  पण … या आईला ऐनवेळी काहीच आठवेना…

मुलं म्हणाली, ‘आजपर्यंत काय राखून ठेवलंस आई तू आमच्यासाठी… ? ‘.. यावर या आईला काहीच बोलवेना… 

मुलं म्हणाली, ‘तू आमच्या भविष्याची काय तजवीज करून ठेवलीस, म्हणून मी आता तुला सांभाळू ?  सांग ना … ? आताही या आईला काहीच सांगता येईना… 

आई नेहमीच स्वतःच्या दुःखाची “वजाबाकी” करून जन्माला घातलेल्या पोरांच्या सुखाची “बेरीज” करत जाते… 

स्वतःच्या ताटातल्या भाकरीचा “भागाकार” करून, पोराच्या ताटात चतकोर चतकोर भाकरीचा “गुणाकार” करत जाते…. 

उपाशी राहूनही आईच्या चेहऱ्यावर इतकं समाधान कसं ? याचं “गणित” पोराला शेवटपर्यंत सुटत नाही…! 

आणि इतकं सारं करूनही, आयुष्याच्या शेवटी आईच्या पदरात, “बाकी” म्हणुन एक भला मोठ्ठा “शून्य” येतो…

पोरांसाठी आयुष्यभर गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी करून जगातली ती सगळ्यात मोठी गणितज्ञ होते…

‘ आई, मग हे तुझ्या आयुष्याचं गणित असं का ?’

असं एखाद्या आईला विचारलं, तर तेव्हा सुद्धा आईकडे उत्तर नसतंच… 

कारण…. कारण…. आईला कुठं हिशोब येतो…??? 

जमा खर्चाची नोंद तिनं कधी केलेलीच नसते…. 

कारण आईला कुठे हिशोब येतो ??? 

यातील दोन आईंना स्थिर हातगाडी घेऊन दिली आहे. विक्री योग्य साहित्य घेऊन दिले आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी व्यवसाय सुरू केले आहेत. 

एका आईला वजन काटा घेऊन दिला आहे.  

पोरांना आईचा “भार” झेपला नाही म्हणून, स्वतःच्या म्हातारपणाचं “ओझं” स्वतःच्याच डोक्यावर घेऊन, या तिन्ही आई स्वतःचं “वजन” सावरत निघाल्या आहेत, आता पैलतीराच्या प्रवासाला…!!!

मी फक्त साक्षीदार….

  1. मराठीत”अंध पंगु न्याय” असा एक वाक्प्रचार आहे…

तो असा: अंध व्यक्तीने पंगू (अपंग /दिव्यांग) व्यक्तीला खांद्यावर घ्यावे…. अंध व्यक्ती चालत राहील आणि पंगू व्यक्ती, अंध व्यक्तीला खांद्यावर बसून दिशा दाखवत राहील… इथे एकमेकांना साथ देऊन दोघांचेही काम भागते…! 

याचाच उपयोग करून, अपंग महिला…. ज्यांना शिवणकाम येते; अशांना यापूर्वी आपण नवीन शिलाई मशीन घेऊन दिले आहे, त्यांना कापडी पिशव्या शिवण्यासाठी आपण कापड देत आहोत, यानंतर शिवलेल्या पिशव्या भीक मागणाऱ्या अंध व्यक्तींना विकायला देत आहोत… 

येणारा नफा दोघांमध्ये समसमान वाटत आहोत…

“अंध पंगु न्याय”… दुसरं काय… ? 

वैद्यकीय

  1.   रस्त्यावरच भिक्षेकर्‍यांना वैद्यकीय सेवा देऊन त्यांच्या विविध तपासण्या करत आहोत, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये गंभीर रुग्णांना ऍडमिट करून त्यांच्यावर उपचार करत आहोत. पूर्ण बरे झाल्यानंतर त्यांना व्यवसाय करण्यासंबंधी सुचवत आहोत आणि त्यांना व्यवसाय सुद्धा टाकून देत आहोत.
  2. अनेक आज्यांच्या कानाच्या तपासण्या केल्या आणि ऐकायचे मशीन त्यांना मांडके हियरिंग सर्व्हिसेस पुणे येथून घेऊन दिले आहे.
  1. अनेक भिक्षेकर्‍यांच्या डोळ्यांच्या तपासण्या करवून घेऊन डोळ्यांची ऑपरेशन्स केली तथा त्यांना चष्मे घेऊन दिले आहेत.

लहानपणी पोराला “नजर” लागू नये म्हणून “दृष्ट” काढणारी आई… 

तीच पोरं मोठी झाल्यावर आईला “दृष्टीआड” करतात… 

कालांतराने रस्त्यावर आलेली हि आई गुपचूप देवाघरी निघून जाते… 

तरीही पोरांचे “डोळे” उघडत नाहीत…! 

आई बाप जिवंत असताना त्यांना दोन घास जेऊ घालत नाहीत आणि मेल्यावर मात्र पिंडाला कावळा शिवावा म्हणून तासन् तास बसून राहतात… 

मला नेहमी असं वाटतं, माणसांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्याआधी, “दृष्टिकोनाची” शस्त्रक्रिया करायला हवी…!!! 

अन्नपूर्णा

जगात सगळ्यात जवळचं कोण ??? 

कोणाचं काहीही उत्तर असेल…. 

माझ्या मते, प्रत्येकाच्या आयुष्यात सगळ्यात जवळची असते ती भूक…

जगातला सर्वात सुंदर सुवास कोणता….? 

भूक लागलेली असताना, भाकरी किंवा चपाती भाजतानाचा घमघमाट, हा जगातला सर्वात सुंदर सुवास आहे …

प्रत्येकाच्या आयुष्यातले भूक आणि भाकरी हेच दोन मुख्य गुरुजी ….

आपण झोपल्यावर सुद्धा जी जागी असते…. ती भुक….

न मरताही आयुष्यभर चितेवर जळायला लावते…. ती भुक…

आयुष्यात काहीही करायला लावते…. ती भुक…

घुंगरू न घालताही अक्षरशः नाचायला लावते…. ती भुक…. 

या भुकेसाठी, अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक दुर्बल कुटुंबांकडून आपण डबे विकत घेऊन त्यांना उपजीविकेचे साधन देत आहोत.

हे डबे घेऊन आम्ही रस्त्यांवर नाईलाजाने जगत असलेल्या आई बाबा, भाऊ बहिण यांना किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या किमान २०० गरजु गोरगरीबांना, दररोज जेवणाचे डबे हातात देत आहोत. (रस्त्यात दिसेल त्याला सरसकट डबे आम्ही वाटत नाही)

It’s our win-win situation

इकडे एका कुटुंबाला उत्पन्न मिळाले, जगण्यासाठी सहाय्य मिळाले आणि तिकडे भुकेने तडफडणाऱ्या लोकांना अन्न मिळाले.

भाकरीचा सुगंध वाटण्याचे काम आम्हाला मिळालं…. निसर्गाचे आम्ही ऋणी आहोत….! 

खराटा पलटण

खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team ! 

अंगात व्यवसाय किंवा नोकरीचे कोणतेही कौशल्य नसणाऱ्या प्रौढ / वृध्द महिलांची एक मोळी बांधून, त्यांच्याकडून पुण्यातील अस्वच्छ भाग स्वच्छ करून घेत आहोत, त्या बदल्यात त्यांना पगार किंवा किराणा माल देत आहोत. 

या महिन्यातही खराटा पलटणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे आणि त्या बदल्यात टीममधील प्रत्येकाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे. 

मनातलं काही …. 

  1. माझ्या आयुष्याच्या चढउतारांवर आणि कामात आलेल्या अनुभवांवर एक पुस्तक छापलं आहे…. एकाच वर्षात या पुस्तकाच्या 3000 प्रती खपल्या. हे सुद्धा श्रेय समाजाचं….

या पुस्तकाच्या विक्रीतून भीक मागणाऱ्या ५२ मुलांचे आपण शिक्षण करत आहोत 

आता एप्रिल महिन्यामध्ये शिक्षणाचा हा अवाढव्य खर्च माझ्या अंगावर पडेल…. कोणाला जर माझं पुस्तक हवं असेल तर मला नक्की कळवावे …. पुस्तकाचे देणगी मूल्य पाचशे रुपये आहे…. ! 

हाच पैसा भीक मागणाऱ्या मुलांच्या शिक्षणाकरता वापरला जाईल. (आमचा एक मुलगा यावर्षी इन्स्पेक्टर होऊ इच्छितो, दुसरी मुलगी बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन करत आहे, तिसरा मुलगा कॉम्प्युटर्स सायन्स करत आहे आणि चौथी मुलगी कलेक्टर व्हायचे स्वप्न बघत आहे)

या सर्वांचे शिक्षण माझ्या पुस्तकावर अवलंबून आहे…

  1. येणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त, या वर्षात ज्या महिलांनी भीक मागणे सोडले आहे, अशा ताईंना आपण भावाच्या भूमिकेतून साडीचोळी करणार आहोत….

ज्या मुलींनी भिक मागणे सोडून शिक्षणाची वाट धरली आहे , अशा माझ्या मुलींना, बापाच्या भूमिकेतून ड्रेस घेऊन देणार आहोत. 

इथे ड्रेस आणि साडी महत्त्वाची नाही …. 

आई म्हणून, मुलगी म्हणून, बहीण म्हणून मिळणारा सन्मान महत्त्वाचा… 

जागतिक महिला दिनाच्या या, एकाच दिवशी, मी मुलगा होईन….बाप होईन आणि भाऊ सुद्धा… ! 

या परते अजून मोठे भाग्य कोणते…??? 

निसर्गाने मला पितृत्व आणि मातृत्व दोन्ही दिलं…! 

बघता बघता, दिवस न जाताही , “आई” झालो की राव मी….!!!! 

बस्स, जीने को और क्या चाहिये…. ??? 

प्रणाम  !!!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈