मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चिमणचारा… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

? मनमंजुषेतून ?

☆ चिमणचारा☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

मंदिराच्या कट्ट्यावर विद्वानांचा मेळावा भरला होता. प्रत्येक जण आपल्या ज्ञानाचे दिवे पाजळत होता.

“अहो आहात कुठे ? मी या मंदिराला 1000 देणगी दिली. शिवाय सहस्त्र भोजनही घातलं. सगळ्यांनी आडवं पडेपर्यंत भोजनावर आडवा हात मारला. नको नको म्हणेपर्यंत ब्राह्मणांना भरपूर भोजन दिलय मी. ” मला या ढोंगीपणाची, आत्मस्तुतीची  चीड आली. बढायावर बढाया मारणं चाललं होतं. इतक्यात माझं लक्ष झाडाखाली बसलेल्या साधू बाबांकडे गेलं. शांतपणे डोळे मिटून ते पक्षांचा किलबिलाट ऐकत होते.

तुंदील तनुवर हात फिरवत बसलेल्या पंडितजींकडे मी बघितलं. त्यांच्यासाठीच  मी शिधा आणला  होता. मनात आलं ह्या भरगच्च जेवणावर  ताव मारून ढेकर देणाऱ्या पंडितजींना हा शिधा देण्यात काय अर्थ आहे? अन्नावर अन्न आणि  आणि वस्त्रावर वस्त्र  असंच नाही का होणार ते ? त्यापेक्षा या गरीब साधूला हे सगळं द्यायला काय हरकत आहे? विचारासारखी मी ताडकन उठलो. साधूबाबाच्या जवळ जात म्हणालो,

” बाबा एक विनंती आहे, तुमची काही हरकत नसेल तर हा शिधा देऊ का मी तुम्हाला? घ्याल? नाही म्हणू नका. ”.. माझ्या प्रश्नावर धीरगंभीर आवाजात उत्तर आलं ” बंधू निर्मळ, निरपेक्ष मनाने तू  हे शिधादान करतो आहेस. देवाच्या दरबारातला प्रसाद समजून अवश्य घेईन मी तुझे दान “. कुठली  हाव नाही, कुठलीही  आसक्ती नाही. मिळेल ते दान पदरांत पडल्यावर समाधान मानण्याची  त्यांची  वृत्ती बघून मला बरं वाटलं. लगबगीने मी पिशव्या  त्यांच्या स्वाधीन केल्या. आणि माझ्या लक्षात आलं बाबांना एकच हात आहे. पिशवी जवळजवळ माझ्या हातातून ओढून घेऊन, तांदुळाच्या पिशवीत हात घालून मुठभर तांदूळ बु्वांनी कट्ट्यावर फेकले. माझा राग अनावर झाला. ‘ केवढा हा माजोरेपणा? ‘  ‘ ‘भिकाऱ्याला ओकाऱ्या ‘ म्हणतात ते असंच असावं. पायरीवर बसलेले पंडितजी माझ्याकडे बघून कुचेष्टेने हसले. त्यांच्यासाठी आणलेला शिधा  मी साधूबाबांच्या झोळीत टाकला होता ना !

कुणीतरी म्हणाले सुद्धा, “ हे लेकाचे फार माजलेत. दान सत्पात्रीच द्यावं. अशा माजोरडयांना अशा भिकाऱ्यांना नाही. ”  

मी पण  तिरीमिरीत उठलो  साधूबाबांच्या अंगावर ओरडलो, “अहो काय केलंत हे ? मी तुम्हाला प्रेमाने धान्य दिलं आणि तुम्ही ते भिरकावून दिलंत ? अन्नपूर्णेचा अपमान आहे हा “. ‘ माजोऱ्या सारखा ‘ हा शब्द  मात्र मी गिळून  घेतला. शांतपणे  मान झुकवून ते म्हणाले, ” नाही बंधू.. धान्याचा असा अपमान मी कसा करेनं ? उलट तुमचं धान्य भुकेलेल्या मुक्या जीवांपर्यंत पोहोचवायचं होतं, म्हणून मी ते पारावर टाकलं. तुमचं दान सत्पात्री  पडलय. क्षुधा शांतीने तृप्त झालेली ती चिमणी पाखरं भरल्या पोटी आनंदाने घरट्याकडे वळलीत. तुमच्या धान्यातला कण न कण वेचला  आहे त्यांनी. तिकडे बघा  सहस्त्र भोजन  झालय. पण थाळीमध्ये लोकांनी टाकून दिल्यामुळे उकिरड्यावर  फेकलेलं अन्न वाया गेलंय. पोटभर भोजन करून चिमण्या उरलेले दाणे आपल्या चोचीत साठवून आपल्या बाळांना देण्यासाठी व घरट्यात जाण्यासाठी आसुसल्या आहेत. ”  

मी डोळे विस्फारून  पाराकडे बघतच राहिलो. चिवचिवणाऱ्या चिमण्यांचा थवा दाणा न दाणा टिपून घेत होता. साधूबाबा निर्मळ हसत म्हणाले, ” देख बंधू, ‘दाने दाने पर भगवान ने खानेवाले का नाम लिखा  है।”  आता मी हात जोडले आणि म्हणालो, ” बाबा खरंय तुमचं, बोलक्या जीवांना ओरडून अन्न मिळवता येतं. पण ही मुकी भुकेली पाखरं कशी मागणार धान्य आपल्याजवळ? “ साधू बाबा पुढे म्हणाले, ” चिमण्यांचा चिमणासाचं जीव आहे. पण त्यांनाही पोट आहेच ना?  बलवान पक्षी मारतात त्यांना. अन्यायाविरुद्ध समर्थपणे लढण्याची शक्ती ह्यांच्यातही यायला हवी आहे.. हो ना ? त्यांचा दुबळेपणा जाऊन त्यांनी बलवान व्हावं म्हणून मी हा चिमणचारा त्यांना चारला. क्षमा कर मला. ” …. हे तत्वज्ञान ऐकून मी अवाक झालो. माझ्या मनात आलं सगळीच माणसं ढोंगी लबाड नसतात. देवमाणसं पण जगात आहेत. गाभाऱ्यातल्या अन्नपूर्णा देवीला मी हात जोडले. तिच्या डोळ्यातलं वात्सल्य मला साधूबाबांच्या डोळ्यात दिसलं. साधू बाबा दुसऱ्या पाराकडे  वळले होते. आणि पुन्हा त्यांची पिशवीतल्या तांदुळानी मूठ भरली गेली होती. पाखरांची क्षुधा शांती करण्यासाठी… 

मी ओरडून म्हणालो, “बाबा आपके लिए भी कुछ रखो. “ हसून हात हलवत ते म्हणाले, ” फिकर  मत कर बेटा, तेरे जैसे भगवानने दिया हुआ प्रसाद हैं ये. मै भी उसमे भागीदार हो जाऊंगा…” 

काय किमया आहे बघा ! मलाच ते भगवान समजताहेत आणि मला त्यांच्यात  भगवान दिसतो आहे. मंदिरातली भगवती मात्र आम्हाला आशिर्वाद देत होती. आणि आपल्या सगळ्या लेकरांवरून वात्सल्यपूर्ण नजर फिरवत होती. खडतर आयुष्याचं गणित सोपं करून जगणाऱ्या ह्या निर्मळ मनाच्या साधूबाबांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून मी हात जोडले. काही प्रसंग साधे असतात. पण त्यात मोठा आशय भरलेला असतो नाही का ? आयुष्याचं तत्वज्ञान सहज सोपं करून सांगणारी अशी ही देवमाणसं जगात आहेत. आणि म्हणूनच जग चाललंय… म्हणूनच… जग चाललंय..

(धन्यवाद. मंडळी …  माणसांच्या मनाचे अनेक कंगोरे असतात. कुणी स्वतःच्या पोळीवर तूप ओढून  घेणारे असतात तर. आपल्या घासातला घासही दुसऱ्यासाठी राखून ठेवणारे दिलदारही या जगात आहेत. साधुबुवा एक हाताने अर्थार्जन नाही करू शकत. पण मिळालेल्या धान्यातून ‘चिमणचारा’ ते बाजूला काढू शकतात. एक तीळ सात जणांनी वाटून खावा ही म्हण त्यांना लागू पडते. स्वार्थ आणि परमार्थही ते साधू शकतात. आणि ‘ विश्वची माझे घर ‘ या आनंदात ते जगू शकतात. साधीच माणसं पण विचार मोठे याची प्रचिती मला आली…. म्हणून हा लेखप्रपंच )    

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈