मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘मानसपूजा…’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ ‘मानसपूजा…’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

सहज शांतपणे बसायचं …

हळूच डोळे मिटून घ्यायचे 

अंतरंगातले कल्लोळ शांत होईपर्यंत काहीही करायचं नाही.

 मनाला स्थिरता आली की 

मानसपुजा  सुरू करायची..

 

 प्रेमाने मायेने अंतकरणपूर्वक…

 हळूहळू आत आत  जायचं 

हे  आता जमायला लागले होते……….

 

प्रथम डोळे भरून त्याच्याकडे बघायच.नमस्कार करायचा..पुजा सुरू करायची..

 पंचामृत स्नान ,मग शुद्धोदक स्नान जरतारीची मखमली  देवाची वस्त्र ..

ती अर्पण करायची..

सोन्यामोत्याचे अलंकार घालायचे .

 

सुंदर हार फुलं देवाला वहायची..

आणि मग एकटक .. 

ते गोजिर रूप बघतच राहावं असं वाटायचं ..

जीव त्यात रमायचा..

 

 मोठ्या चांदीच्या ताटात पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवायचा

 आरतीच तबक निरंजनांनी सजवायचं….

 

 आरत्या म्हणायच्या सोबत टाळाचा गजर त्या नादात पाच-सहा आरत्या होऊन जायच्या..

 धूप लावायचा ..

कापूरच्या आरतीने ओवाळायच ओवाळताना कापूर आरती म्हणायची मंत्रपुष्पांजली झाली की

साष्टांग दंडवत घालायचा 

…..

 सगळं कसं यथासांग  करायचं

 नंतर त्याच्यासमोर बसून राहायचं…..

काही न बोलता शांतपणे…

कारण  

त्याला सगळंच माहित असत..

 

 असं वाटायचं पुजा  सफल झाली……

 पूर्वी तेवढ्याने जीव रमायला  लागला होता .

आताशा एक वेगळीच ओढ लागली होती…

 

मनात यायच  पंचामृताचा फुलांचा वास कधीतरी जाणवावा..

पक्वान्नांचा गंध नाकाला क्षणभर तरी यावा ..

निरंजनाची उष्ण ऊब आरती घेताना  हाताला स्पर्शून जावी..

 निदान कापराचा तो चिरपरिचित वास तरी यावा….

 

काहीतरी घडावं असं वाटायचं आजही क्षणभर तसंच वाटलं…..

 

 अर्थातच तिला माहीत होत आपला इतका अभ्यास नाही …भक्ती भाव नाही हे लगेच घडणार नाही..

 खूप मनोभावे अनेक वर्ष तप साधना करायला हवी तेव्हाच हे होईल 

 

आज तर मनाने बजावलच ही अपेक्षा करूच नकोस ..

अनुभव प्रचिती या फार लांबच्या गोष्टी आहेत …

तिथपर्यंत पोहोचायला अजून खूप वेळ आहे …

साक्षात्कार काय इतक्या सहजासहजी होत नसतो…

इथे सबुरी हवी .

 

आणि खरंतर असं कुठलं मागणं मागायलाच नको …

इथपर्यंत वाटचाल करायचं हे भाग्य मिळालं हेही खूप झालं .

 

हे सगळं कळत होतं पण मन मात्र आज खुळावलं होतं .

 

ती भानावर आली. पूजा पूर्ण झाली होती .कापूर अजून जळत होता. दिव्यांच्या वातीच्या उजेडातलं ते मोहक रूप  ती बघत  होती..

 

 किती वेळ गेला काही कळलच नाही आणि अचानक हवेच्या मंद झोक्याबरोबर खिडकी जवळच्या प्राजक्तांचा वास दरवळला..

 अंगावर एक अनामिक लहर आली मन भारल्यासारखं झालं ..

 

देवाने आज जणू कौलच दिला होता प्रसाद म्हणून हा सुवास आला होता का…जाणवला होता का..

काय सुचवायचे असेल बरं…

 

 केवळ मानस पूजेतच तो नाही तर चराचरात तो भरून राहिलेला आहे ही तर शिकवण देवाने दिली नसेल ..

एक हलकीशी गोड जाणीव मनाला स्पर्श करून गेली …

खरतर हा वास नेहमी यायचा..पण त्यातला हा गर्भित अर्थ आज ऊमगला..

 

तो असतोच आसपास कुठल्या ना कुठल्या रूपात.

 सगुणरूपाची पूजा करायची सवय असल्याने तेच रूप परिचित असते आणि तेच खरे वाटते.

 इतके संकुचित रूप असेल का बरं  त्याचे ?

 

त्यासाठी आता  शांतपणे  विचार करायला हवा  ….हळुहळु  मग तो चराचरात  दिसेल.

 अगदी आसपासच्या  माणसातही ….

हेच सुचवायचं असेल का ?

ती भानावर आली …

खरंच मनापासून प्रयत्न करायला हवे आहेत हे तिच्या लक्षात आले. वरवरच्या विचारातून बाहेर येऊन अंतरंगात खोल डोकावून पहायला हवे आहे..

 संकल्पना तपासून बघायला हव्या आहेत .

आज मनाला एक वेगळाच विचार स्पर्शून गेला होता .

त्यावर अभ्यास करायला हवा .

विचार नीट तपासून बघायला हवे

 तिला मनोमन संतोष वाटला. 

 

त्यानी  मार्ग दाखवला  आहे.. त्यावरून आता जायला हवे.

 जे हवेहवेसे वाटते आहे ते तिथे गवसेल.

 

डोळे उघडून ती लौकिकात परत आली. 

आज मन मात्र  काहीसे शांत स्थिर झाले आहे असे वाटत होते .

अननभूत असे काहीसे त्याला आज गवसले होते .

 

एक मात्र खरे होते..

आजची मानसपूजा खूप काही शिकवून गेली होती.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈