मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विश्वरूप दर्शनाचे दोन परिणाम ! — भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

??

विश्वरूप दर्शनाचे दोन परिणाम !  भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

कुरूक्षेत्राच्या मध्यावर श्रीकृष्णाने अर्जुनाला संपूर्ण गीता सांगितली. तरी अर्जुनाच्या मनात काही शंका बाकी होत्या. शेवटी कृष्णाने अर्जुनाला आपले विराट विश्वरूप दाखवले. या विश्वरूपासमोर मात्र अर्जुनाचे उरलेसुरले सर्व अहंकार गळून पडले. तो श्रीकृष्णाला पूर्णपणे शरण गेला. त्यानंतर अर्जुन केवळ श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार वागला. शेवटी म्हणतात ना, ‘चमत्काराला नमस्कार असतो !’

खरे तर श्रीकृष्णाने अर्जुनाआधी आणखी एका व्यक्तीला आपल्या विश्वरूपाचे दर्शन दिले होते. 

चक्रवर्ती सम्राट पांडूच्या अकाली मृत्यूनंतर त्याची मुले मोठी होईपर्यंत हस्तिनापूराचे राज्य धृतराष्ट्राला विश्वस्त म्हणून सांभाळायला दिले गेले होते. पण युधिष्ठिराचा अभिषेक करायची वेळ आल्यावर कौरवांनी वारणावताच्या लाक्षागृहात पांडव आणि कुंतीच्या हत्येचा प्रयत्न केला. विदुराच्या सल्ल्यानुसार ते तात्पुरते भूमिगत झाल्यावर घाईघाईने दुर्योधनाचा युवराज म्हणून अभिषेक केला गेला. द्रौपदीच्या स्वयंवरात पांडवांचे खरे रूप समोर येऊन पांडव हस्तिनापूरला परत आल्यावर पांडूचे राज्य त्यांना परत देण्याऐवजी राज्याच्या वाटण्या केल्या गेल्या. अर्ध्या राज्याच्या नावावर पांडवांना खांडववनासारखी बंजर भूमी दिली गेली. पांडवांनी त्यातही नंदनवन फुलवले. राजसूय यज्ञात पांडवांना मिळालेले यश पाहून असुयेने आंधळा झालेल्या दुर्योधनाने धूर्त शकुनीच्या सांगण्यावरून कपटी द्यूतक्रिडेचे आयोजन केले. द्युतक्रिडेदरम्यान पांडव बंधूंचे घोर अपमान झाले. सर्वात मोठा अधर्म म्हणजे भर सभेत द्रौपदीची विटंबना झाली. त्यानंतर पांडवांना वनवासात धाडले गेले. पांडवांचा बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास संपल्यावरही पांडवांनी स्वकष्टाने उभे केलेले इंद्रप्रस्थाचे राज्य दुर्योधन त्यांना परत करण्याची लक्षणे दिसेनात. कौरवांनी केलेले हे सर्व अधर्म पांडव विसरलेले नव्हते. पांडव स्वतः प्रचंड शूर होते. पांडवांना सासरचा म्हणजे पांचाळनरेश द्रुपदाचा आधार होता. आता मत्स्यराज विराटही त्यांचे व्याही झालेले होते. साक्षात श्रीकृष्ण त्यांच्यामागे खंबीरपणे उभा होता. त्यात कौरवांकडून पांडवांचे इंद्रप्रस्थ परत न देण्याचा आडमुठेपणा केला गेला. युद्धाचे ढग दाटू लागले. 

श्रीकृष्णाने तोपर्यंत केलेल्या अलौकिक कामांमुळे लोक एव्हाना त्याला परमेश्वर म्हणू लागले होते. कौरव-पांडव युद्ध हे केवळ इंद्रप्रस्थ आणि हस्तिनापूरात होणार नव्हते, तर भारतातील बहुतेक राजे दोन्हीपैकी एक पक्ष निवडून युद्धात सामील होणार होते. या युद्धाच्या व्याप्तीमुळे लाखो लोक मारले जाणार होते. फक्त श्रीकृष्णाच्या अंगी युद्ध टाळण्याची शक्ती होती. भीष्म, द्रोण, विदूर आणि धृतराष्ट्र यांच्यासारखे ज्येष्ठ कौरव श्रीकृष्णाला देवासमान मानत त्याचा प्रचंड आदर करत होते. पांडव तर कधीच श्रीकृष्णाचे भक्त झालेले होते. दोन्ही पक्षांना समजावून सांगून युद्ध टाळण्याची क्षमता फक्त श्रीकृष्णात होती. पण श्रीकृष्णाने आता काही हालचाल केली नसती तर ‘अंगी क्षमता असूनही युद्धातील रक्तपात टाळला नाही’ असा बोल समाजाने त्याला लावला असता. तसेच सरळमार्गी पांडवांना, खास करून युधिष्ठिराला, कौरव किती आडमुठे आहेत हेही दाखवून देणे गरजेचे होते. त्यामुळे युद्ध टाळण्यासाठीचा शेवटचा प्रयत्न म्हणून श्रीकृष्ण शांती प्रस्ताव घेवून हस्तिनापूरला गेला. भीष्म, द्रोण, आणि कृपाचार्यांसारख्या महानुभावांनी श्रीकृष्णाचे हस्तिनापुरात यथासांग स्वागत केले. हस्तिनापूरच्या दरबारात श्रीकृष्णाने शांती प्रस्ताव मांडला. पांडव द्युतसभेत झालेले सर्व अपमान विसरून कौरवांशी सख्य करतील. बदल्यात कौरवांनी ठरल्या- -प्रमाणे पांडवांचे इंद्रप्रस्थचे राज्य त्यांना परत करावे अशी मागणी श्रीकृष्णाने केली. पण दुर्योधन इंद्रप्रस्थचे राज्य परत करायला अजिबात तयार नव्हता. श्रीकृष्णाने दरबाराला हर त-हेने धर्म काय हे समजावून सांगितले. पण दुर्योधनाच्या हट्टासमोर कुणाचेच काही चालले नाही. त्यावर श्रीकृष्णाने दरबाराला अजून एक प्रस्ताव दिला. हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ या दोन साम्राज्यातील केवळ पाच गावे पांडवांना दिली तरी युद्ध आणि रक्तपात टळेल असे श्रीकृष्णाने दरबाराला सुचवले. यावर दुर्योधनाने ते प्रसिद्ध उद्गार काढले, “सुईच्या अग्रावर मावेल इतकी भूमीही पांडवांना मिळणार नाही.” 

यावर श्रीकृष्ण ठामपणे म्हटला, “आता मात्र अहंकाराचा आणि अधर्माचा कळस झाला. आता युद्ध आणि कुरूकुलाचा नाश अटळ आहे.”  यानंतर श्रीकृष्णाने मूर्ख दुर्योधनाच्या अहंकाराला, त्या अहंकारातून निर्माण होणाऱ्या त्याच्या महत्वाकांक्षांना , आणि त्या महत्वाकांक्षापुढे अगतिक होऊन दुर्योधन करत असलेल्या अधर्माला आवर न घातल्याबद्दल संपूर्ण दरबाराला बोल लावला. 

– क्रमशः भाग पहिला 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈