मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गौरीमाय… ☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ गौरीमाय… ☆ सुश्री नीता कुलकर्णी

“ अगं आई तू…..”

“ लेकरा माझ्या आगमनाची तयारी सुरू केलीस म्हणून आधीच तुला भेटायला आले ..मी येणार म्हणून  तुला काय करू काय नाही असं होतं… त्याचं मला समाधान वाटतं… पण खूप काम करून दमून नको जाऊस.. सण साजरा करताना त्यातला आनंद घ्यायला शिक.

आता लेकी बाळी नोकरी करणाऱ्या दिवसभर काम करणाऱ्या असतात. त्याच घराची खरी लक्ष्मी आहेत हे विसरू नकोस… त्या आनंदात असतील तर घर सुखात असतं…

उगीच स्वतःचा मोठेपणा दाखवायला जाऊ नकोस. हे केलंच पाहिजे ते केलंच पाहिजे असं म्हणत बसू नकोस. त्यांनी काही बदल सुचवला तर बदल कर .. आणि बदल करताना मनात भीती नको ग  ठेवूस… माझ्यावर प्रेम करतेस ना मग मला भ्यायचं कशाला   ……आपल्या घराण्यात अशीच परंपरा आहे ….हे पालुपद  तर अजिबात लावू नकोस….पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. घरात खाणारी माणसं होती.  आता तसे नाहीये हे लक्षात घे.

माझ्यासाठी हे करतेस ना…. मनातल एक  खरं सांगू …

… मला हे काही नको असतं ग…

आल्या दिवशी तू केलेल्या भाजी भाकरीवर मी तृप्त असते…

घरोघरी जाऊन तुम्ही सर्वजण सुखात आहात… हे मला बघायचं असतं…. तुमच्याशी  बोलायचं असतं..

मायेनी प्रेमानी त्या ओढीनी मी येते ग….घडीभर माझ्याजवळ नुसती बसत जा …मला बरं वाटेल बघ..

डेकोरेशनच्या गडबडीत पहिला दिवस जातो.  दुसऱ्या दिवशी जेवणाची गडबड..

हो आणि अजून एक सांगायचे आहे … करायलाच हव्यात म्हणून भाज्या कोशिंबिरी भजी वडे सगळं करतेस..  संपत नाही ग सगळं… मग राहिलेल्या अन्नाचं काय करतेस ते आठव बरं….

हे योग्य आहे का ?

शेतकरी बिचारा राब राब राबतो त्या अन्नाचा आदर कर… आणि संपेल इतकंच कर..

चार पदार्थ कमी केले म्हणून बाळा मी तुझ्यावर रागवेन का ग कधी ….

मला ओळखतेस ना तू …मग आता शहाणी हो …

खेड्यात  काहीजण राहिलेलं अन्न गाईला घालतात … पण गायी त्या  शिळ्या अन्नाला तोंड लावत नाहीत…

फार नासाडी होते ग अन्नाची …बघवत नाही म्हणून आधीच तुला समजावून सांगायला आले आहे

सणाची मजा घे…

हसत आनंदात सण साजरा कर…

यावेळेस फार छान साडी  घेतली आहेस  माझ्यासाठी…  आवडली बरं का…

आणि सुनबाईनी घेतलेलं नव्या पद्धतीचं गळ्यातलं झकासच…

.. ..  आता सजून घ्यायला आणि तुम्हा सगळ्यांना भेटायला येते की….

आणि हे बघ आईच ऐकायचं…. आईचा लेकीला सांगायचा हक्कच असतो ना… म्हणून बाळा प्रेमानी सांगतीये ……  तशी तू समजूतदार शहाणी आहेसच

…  आता भेटू आपण  लवकरच …

© सुश्री नीता कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈