श्री संभाजी बबन गायके

 

? मनमंजुषेतून ?

☆ “कोसळलेली आभाळं सावरताना…!” —  ☆ श्री संभाजी बबन गायके 

मानवी जीवनाच्या डोईवर मृत्यू नावाचं आभाळ कायमच कोसळण्याच्या बेतात असतं. जन्माच्या सोहळ्याची सांगता मृत्यूच्या अभ्रछायेखाली होताना दशदिशा काळवंडून गेलेल्या असतात. हे आभाळ कोसळतं तेव्हा मनाच्या पृष्ठभागावरचं सर्वच जमीनदोस्त होतं… आणि मनाच्या खोल समुद्राचा तळ भूकंपाच्या धक्क्यानं शतविक्षत होतो… आणि वेदनेच्या लाटा उसळी मारून वर येऊ पाहतात. हा अनुभव मरणा-याला येऊच शकत नाही, मात्र मरणा-याच्या रक्त-नात्यांना हा अनुभव विस्कटून टाकतो. अशा वेळी खांद्यावर ठेवला गेलेला हलका हात, पाठीवरून अलगद फिरणारी मायेची बोटं, कपाळावरून डोक्यावर हळूहळू स्पर्शत जाणारा एखाद्या थरथरत्या हाताचा तळवा. . वेदनांकित तळहाताच्या उपड्या पृष्ठभागावर एखाद्या हाताची सहज थपथप आणि कुणीतरी अतीव सहवेदनेने मारलेली मिठी… किती मोठा दिलासा असतो ! शब्द तर नंतर आणि तेही बिचारे गलितगात्र झालेले ! संवेदनेच्या फुलांतून सहवेदनेचा सुगंध अवतरतो तेव्हा आभाळ सुखावून जात असावं ! आपली स्वत:ची दु:खं एकवेळ सुसह्य असतीलही, पण दुस-याच्या दु:खाला सामोरं जाणं म्हणजे जणू श्वास रोखून पाण्याखालून चालत जाऊन पैलतीर गाठण्याएवढं गुदमरून टाकणारं. आणि एरव्ही हाताच्या अंतरावर दिसणारे हे पैलतीर अशावेळी क्षितीजाच्याही पल्याडची वाटतात… आणि असतातही ! 

जगण्यासारखीच मरणाचीही अनंत रूपे असतात. त्यातलं सर्वाधिक पवित्र मरण म्हणजे देशासाठी… परोपकारासाठी, दुस-याच्या प्राणांचे रक्षण करताना आलेलं ! ‘हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं… ’. या भगवंताच्या चिरंजीव आशीर्वादाचे फळ म्हणून असे मरण पावणारे स्वर्गास प्राप्त होतात. पण त्यांच्या मागे राहणा-यांना वेदनांच्या, विरहाच्या नरकास सामोरे जावे लागते… हेही खरेच ! आणि कोणी होऊ म्हटला तरी त्यांच्या या दु:खाचा वाटेकरी होऊ शकत नाही. शेवटी दु:ख हे अगदीच स्वतंत्र असते… स्वाभिमानी असते ! परंतू कुणी फुंकर घातल्यास हा दाह क्षणिक का होईना, गारवा अनुभवू शकतो… हे ही नसे 

थोडके !‍ कितीतरी वेळा दुखण्यापेक्षा कुणी फुंकर घालायला आलं नाही, याच्या वेदना अधिक असतात. बालकं त्यांच्या जखमेवर आई, आजी फुंकर घालते तेव्हा रडायची थांबतात ! कदाचित पुन्हा रडू लागतील, पण फुंकरीची आठवण मनाच्या कोप-यात जपून ठेवतील ! अंधाराला घाबरणारी मुलं, “आई, तु आहेस ना?” असं विचारत विचारत अंधाराला भिडतात तेव्हा ती कमाल आईच्या ‘असण्याची’ असते… लांबून का होईना !

रणभूमी मोठी चोखंदळ असते… निवडक देहांनाच आपल्या अंकावर विसावू देते. इथं प्राणांचं भय मुठीत घेऊन पावलं मागं खेचणारे तिचे नावडते ! तळहातावर शीर घेऊन मृत्यूला मरणमिठी मारण्यास धजावणारे देह जेव्हा नश्वरतेच्या काळोखात दिसेनासे होतात तेव्हा त्या देहांनी जीवनप्रवासात जोडलेले आप्तसंबंध सर्वाधिक क्षतिग्रस्त होतात. आई, बाप, पत्नी, अपत्यं, बहिण, भाऊ, मित्र… दु:खाची ही किती परिमाणं ! पण आई आणि पत्नी ही नाती सर्वांत हुळहुळी… मुळापासून हादरून जाणारी… काहीवेळा उन्मळूनही पडणारी ! 

अशी नाती वेदनेची न संपणारी वाट चालत असतात, तेव्हा त्यांना चार पावलं सोबत चालून सोबत करणं हे प्रत्येक सहृदय माणसाचं आद्य कर्तव्यच ठरावे ! आपण त्यांच्या त्यागाबद्दल त्यांच्याविषयी सदैव कृतज्ञ असावे ! जगाच्या व्यवहारात हा मृत्यूचा बाजार सदोदित गजबजत राहणार आहेच… पण या मृत्यूला संवेदनशीलतेचं कोंदण आपण सर्वजण मिळून देऊ शकलो तर मृत्यू ‘ अर्थपूर्ण ‘ होईल, नाही का? 

भारताच्या राष्ट्रपती महामहिम आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्या आपल्या प्रथम नागरीक आणि देशाच्या कुटुंबप्रमुख. हुतात्म्यांच्या आप्तांप्रती त्यांनी कृतीतून दर्शवलेली आत्मीयता, जिव्हाळा आणि सहवेदना आदर्शवत ठरावी. सर्वोच्च पदाचे शिष्टाचार, संकेत बाजूला सारून त्यांनी आपल्या गमावलेल्या माणसांच्या आठवणीने व्याकूळ झालेल्यांच्या खांद्यावर ठेवलेला हात, त्यांना दिलेलं आलिंगन, राष्ट्राच्या वतीने आभारार्थ जोडलेले हात ही दृश्ये खूप बोलकी आहेत… हे पाहून दिवंगत आत्मेही शहारून गेले असतील !

(हुतात्म्यांच्या कुटुंबियांसाठी काम करणारी खूप माणसं, संघटना आपल्या देशात आहेत. त्यांची संख्या वाढली पाहिजे, जनतेनेही यांना साथ द्यायला पाहिजे. किमान बलिदानाची दखल तरी घेतली पाहिजे. वेदना जाणावया जागवू संवेदना ! जय हिंद ! )

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments