मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पालवी… ☆ श्री संजय आवटे ☆

? मनमंजुषेतून ?

☆  पालवी… ☆ श्री संजय आवटे ☆

वसंताचा सांगावा घेऊन येणा-या चैत्राच्या पालवीचा धर्म कोणता? रणरणत्या वणव्यात बहरणा-या झाडांचा धर्म कोणता? ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ त्वेषाने फुलून येणा-या गुलमोहराचा धर्म कोणता?  

तरीही नववर्षाला धर्माशी जोडणारे जोडोत बापडे, आपला धर्म मात्र पालवीचा. आपला धर्म बहरण्याचा. आपला धर्म फुलून येण्याचा. हा धर्म ज्याला कळतो, त्यालाच झाडांची हिरवाई खुणावते, त्यालाच निळं आकाश समजतं. आणि, 

“चंद्रोदय नव्हता झाला, आकाश केशरी होते”, हा केशरी रंगही त्यालाच मोह घालतो ! 

परवा असंच तळेगावला जायचं होतं. ड्रायव्हर म्हणाला, ” सर, मामुर्डीचं जे चर्च आहे ना, तिथून पुढं गेलं की बुद्ध विहार आहे. तिथून सरळ पुढं जाऊ. तसे आलो, तर आयोजकांचा फोन आला- तळेगाव स्टेशनच्या जैन मंदिराकडं या. मग आपण पुढं जाऊ. आयोजक तिथं भेटले. गेलो, तर प्रत्यक्ष कार्यक्रम गणपती मंदिरात. तिथं शेजारीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा टुमदार बंगला. बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचा त्यांचा विचार इथंच अंतिम झाला, असं म्हणतात. अवघ्या दहा किलोमीटरच्या प्रवासात कुठं कुठं जाऊन आलो!  

हा भारत आहे. 

उद्यापासून रमजान सुरू होईल. 

पुण्याजवळच्या खेड शिवापूरला दर्गा आहे. हजरत कमर अली दुर्वेश रह दर्गा. रमजान आला की या गावातले सगळे कोंडे-देशमुख रोझे ठेवतात. एवढेच नाही, रमजानमध्ये, तिथल्या उरूसात देशमुखांचा मान असतो.

अशी कैक उदाहरणं देता येतील. 

भारताची ही गंमत आहे. 

हिंदुत्वाचं राजकारण करून थकलेल्या नेत्याला अखेर जावेद अख्तरांचा आदर्श जाहीरपणे सांगून नववर्ष साजरं करावं लागतं, ही खरी मजा आहे. जावेद यांनी पाकिस्तानात जाऊन बरंच सुनावलं, हे भारी आहेच. पण, भारतात राहून ते रोज काही सुनावत असतात. तेही ऐकावं लागेल मग ! कारण काहीही असो, पण हिंदू मतपेटीचं राजकारण करणा-यांना जावेद अख्तर सांगायला लागणं, असा ‘क्लायमॅक्स’ सलीम-जावेद जोडीला सुद्धा कधी सुचला नसता. 

पण, तीच भारताची पटकथा आहे ! 

साळुंब्र्याच्या प्राथमिक शाळेपर्यंत चालत चालत आलो. तर, पोरं ‘ खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे ‘, ही साने गुरूजींची प्रार्थना म्हणत होती. 

वाटलं, हे वेगळं सांगण्याची गरजही भासू नये, इतकं भिनलेलं आहे ते आपल्या मनामनात. इतकं नैसर्गिक आहे हे. अर्थात, उगाच नाही उगवलेलं हे. त्यासाठी मशागत केलीय आमच्या देहूच्या तुकारामानं. आळंदीच्या ज्ञानेश्वरानं. कबीरानं. त्याहीपूर्वी बुद्धानं. म्हणून तो वारसा सांगत आज ही पोरं प्रेमाचा धर्म सांगू शकताहेत. 

या प्रेमाच्या धर्मावर आक्रमण करणारे मूठभर प्रत्येक काळात असतात. त्यांचा विजय झाला, असं काही काळ वाटतंही. पण, युद्ध संपतं. बुद्ध मात्र उरतो. मंबाजी संपतो, तुकोबा उरतो. शेणगोळे विरतात, सावित्री-ज्योतिबा उरतात. 

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। 

भेदाभेद-भ्रम अमंगळ॥ 

हाच धर्म अखेरीस जगज्जेता ठरतो. 

आपण चालत राहायला हवं, या पोपटी पालवीकडं पाहात. जोवर ही पालवी येते आहे, तोवर निसर्गानं आशा अद्याप सोडलेली नाही, हे नक्की आहे ! 

तुम्ही का सोडता? 

© श्री संजय आवटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈