मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘नमस्कार मित्रांनो —- TMT’ – डॉ. स्मिता दातार ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘नमस्कार मित्रांनो —- TMT’ – डॉ. स्मिता दातार ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

नवरात्रात माझ्या  वहिनीकडे गेले होते. तिच्याकडे   घटस्थापना झाली होती. दरवर्षी  देवीचं नवरात्र निगुतीने करणार्‍या माझ्या वहिनीला एका आठवड्यापूर्वी  रिक्षाचा अपघात होऊन तिचा पाय दुखावला होता. तिच्या सचिनचं सहा महिन्यांपूर्वीच  लग्न झालं होतं. नव्या सुनेचं हे पहिलं नवरात्र होतं. दरवर्षी नवरात्रीत सवाष्णपूजन , कन्यापूजन करणारी , साग्रसंगीत स्वयंपाक– हो अगदी ‘स्वयं’ पाकसिद्धी करणारी वहिनी  .. आता या वर्षी काय करेल ,याची मला काळजी वाटली. काळजीपेक्षा परंपरांच्या बाबतीत आग्रही मतं असणार्‍या वहिनीच्या नव्या सुनेची मला जास्त  काळजी वाटली. जरा धास्तावूनच जरीच्या साडीचा घोळ सावरत मी वहिनीच्या घरी पोचले.  वहिनीच्या  सुनेनं हसून माझं स्वागत केलं. रंगवलेल्या सोनेरी ब्लॉन्ड केसांचा सैलसर बुचडा, आधुनिक फॅशनच्या स्लीव्हलेस ब्लाऊज, वर चापून चोपून नेसलेली नऊवारी साडी आणि साडीच्या सोग्याजवळ खणाच्या पर्समध्ये अडकवलेला मोबाईल फोन—-स्मार्ट आणि आत्मविश्वासपूर्ण आधुनिक तरुणीचं रुप. ती अध्येमध्ये फोनवरून तिच्या स्टाफला सूचना देत होती. तिने नुकतीच एक स्टार्टअप कंपनी सुरु केली होती. जुन्या नव्याची सांगड जणू तिने पेहरावातच घातली होती. तिने जमलेल्या आम्हा नातेवाईक बायकांची चौकशी केली. ‘आईंना बोलवते हं .’. असं सांगून ती तिच्या सासूबाईंना बोलवायला आत गेली.

वहिनी चार पायांची स्टीलची  काठी टेकत  बाहेर आली. सगळ्या बायकांच्या नजरा गरकन वहिनीच्या दिशेनं वळल्या. वहिनीने चक्क गुडघ्याखाली येईल असा खणाच्या कापडाचा  फ्रॉक घातला होता. तिच्या पायाला अजून बॅंडेज होतं. वहिनी अवघडलेली मुळीच दिसत नव्हती. उलट कौतुकाने सगळ्यांना सांगत  होती, अपघात झाला तरी सुनेनं कार्यक्रम करुया म्हटलं. तिच्या  सुनेनं हौसेनं दोन पदार्थ रांधले होते. वहिनीनं बसल्या बसल्या कोशिंबीर केली होती. बाकीचे पदार्थ बाहेरून मागवले होते. वहिनी उत्साहानं सांगत होती. प्रधानांच्या घरात क्रांतीच झाली म्हणायची, माझ्या मनात आलंच.  देवीची आरती झाली. सवाष्णींच्या ओट्या  सूनबाईनं छान पॅक केलेल्या होत्या. देणारीला आणि घेणारीलाही सुटसुटीत . सांडलवंड नाही की काही राहिलं- विसरलं नाही. छान गप्पा चालू होत्या. मध्येच अर्धा तास वहिनीची सून  लॅपटॉपवरुन  एक ऑनलाईन मीटिंग करायला आतल्या खोलीत  गेली. 

सूनबाई आत गेलीये, हे पाहून न राहवून बायकांनी विषय काढलाच. “ सुमनताई ,रूढीपरंपरांच्या बाबतीत तुम्ही एवढ्या आग्रही असता.  तुम्ही एवढ्या कश्या बदललात ?”

वहिनी हसून म्हणाली , “ मला  एक मंत्र मिळालाय. मला  या मंत्राचे खूप फायदे जाणवले.  लेकाचं लग्न झाल्यापासून मी या  मंत्राचा जप करते.”

“ कुठला मंत्र ?”  बायका उत्सुक होत्या. 

वहिनी म्हणाली , “ मन:शांतीचा  मंत्र.”                      

“ कुठल्या आध्यात्मिक गुरूकडे जायला लागलात की काय ? “ शेजारच्या काकींनी विचारलं . 

“ नाही हो .. स्वत:च स्वत:चा गुरु झाले आणि  जवळच्यांना  गुरु मानलं.” वहिनी अजूनही सस्पेन्स राखून होत्या.

“— कसंय नं .. आपल्यासाठी  घर खूप महत्वाचं असतं.  मुलं आणि आपण सोयीसाठी  वेगवेगळ्या घरात राहिलो तरी मनानं  सगळ्यांनी एकत्र येणं, एकमेकांना सोबत देणं गरजेचं असतं. मात्र नवीन सून आली की  सासूचा मानसिक गोंधळ सुरु होतो. घराची सत्ता, मुलावरचा अधिकार  आणि माझ्यावाचून अडलं पाहिजे.. हा अहंकार—  यामुळे आपल्या जवळच्या प्रिय  माणसांशीच वाद सुरु होतात. मीसुद्धा यातून जायला लागले होते. पण थोड्याच वेळात भानावर आले. घर आणि घरपण अबाधित ठेवायचं असेल तर बदलायला हवं होतं.  अनेक वर्ष साचलेलं पाणी स्वच्छ होण्यासाठी त्याखालचे नैसर्गिक झरे पुन्हा वाहते करावे लागतात, हा तर निसर्गनियम आहे . घरातल्या कर्त्या बाईने आणि पुरुषाने देखील सत्तेचं सिंहासन वेळीच मोकळं केलं तर पुढच्या पिढीला जबाबदारी लवकर कळते. म्हणून माझा मीच मंत्र ठरवला … TMT  .. ‘ तू म्हणशील तसं ‘

“TMT? तू म्हणशील तसं … किती छान आहे हा मंत्र  . “  पस्तीशीची  कनका  उत्साहाने म्हणाली. 

“ छान काय ?  मला नाही पटत .. सुनेनं आधी तिचा वकूब सिद्ध करायला नको का ? उगीच आधीच डोक्यावर घेऊन नाचलं तर उद्या या आपल्याच डोक्यावर मिरी वाटायच्या. त्यातून या आजकालच्या मुली .. “ वहिनींची जाऊ करवादली . 

“ जाऊबाई , नात्यांना आधीच चुकीची  लेबलं का लावायची . आणि वकूब सिद्ध करायला, सुनेला संधी तर दिली पाहिजे ना . उलट ‘ तू म्हणशील तसं  ‘ म्हटलं की  नवी पिढी आपल्याशी चर्चा करायला येते, असा माझा अनुभव आहे. आता आधुनिकता म्हटलं, तर प्रत्येक बाबतीत त्यांचं चुकतं असंही नसतं हो . या पिढीला परंपरांमधलं  विज्ञान समजावून सांगितलं तर त्यांना ते नक्की पटतं. आपणही काही चुकीच्या गोष्टी आंधळेपणी  पुढे चालवत असू तर आपल्यालाही त्यातल्या  चुका उमगतात.  माझी सूनबाई देव देव करणारी नाही. पण तिला माणसं आवडतात, नवीन नाती जोडायला आणि जपायला आवडतात. माणसातच देव शोधावा, असं म्हणते ती. आता हेच बघा ना, माझा पाय जायबंदी झालाय, साडी पायात येऊन मी पडू नये, म्हणून सूनबाईनेच हा खणाचा ड्रेस माझ्यासाठी  शिवून घेतला. माझा संकोच दूर केला . आजचा कार्यक्रम आणि  मेन्यू ठरवताना ही मी हाच मंत्र ओठांवर ठेवला होता  तू म्हणशील तसं— पण त्यामुळे आमच्यात छान चर्चा झाली. अनावश्यक गोष्टींना मी ही फाटा दिला . थोडा तुम  चलो, थोडा हम चले .. “

“ वहिनी , खरच छान आहे हे.. TMT.. “  मी भलतीच इम्प्रेस झाले होते. 

“ आणि बरं का ..सूनबाई  आता येऊन कानात सांगून गेली, की तिला देवीची आरती करायला खूप आवडलं . मेडिटेशन झालं म्हणाली. तुम्ही सगळे आलात, सगळ्यांशी ओळख झाली म्हणून देखील खूश आहे स्वारी. कुणास ठाऊक, आपल्या पूर्वजांनी नाती दृढ करण्यासाठी आणि  मानसिक शांतीसाठीच या आरत्या , श्लोक म्हणायला आणि सण साजरे करायला सांगितलं  असेल . “ 

वहिनी काठी टेकत स्वयंपाकघरात गेली. तिच्या सूनबाईंची मीटिंग संपली होती.  “ आई , पानं आधी घेऊया की आधी फन गेम्स घेऊ,” असं सूनबाई  वहिनीला विचारत होती. 

वहिनी म्हणाली , “ बायका भुकेजल्या असतील तर आधी वाढूया , मग खेळ घे. तरी तू म्हणशील तसं करूया.”

“ ओके . मी आधी वाढायलाच घेते. सचिन आज वर्क फ्रॉम होम आहे, त्याला हाक मारते. तो करेल मदत . तुम्ही बसा बरं .. पायावर प्रेशर येईल. “

त्यांच्या मदतीला आत आलेल्या माझ्या कानावर  पुन्हा एकदा  TMT  मंत्र  पडला आणि मला खुद्कन हसू आलं.  लेकाच्या लग्नाचं घोडामैदान जवळंच आलय. त्याआधीच एक छान मंत्र मला सापडला होता. TMT—

लेखिका :  डॉ. स्मिता दातार

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈