मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रामरक्षेचा आणि संस्कृत उच्चारांचा प्रभाव… श्री.संतोष गोविन्द जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

??

रामरक्षेचा आणि संस्कृत उच्चारांचा प्रभावश्री.संतोष गोविन्द जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

माझे एक मित्र होते, सुनील जोशी. होते म्हणजे दुर्दैवाने आज हयात नाहीत. पण त्यांच्याबाबतीत प्रत्यक्ष घडलेली हकीकत सांगतो.

पूर्वी आम्ही ज्या सोसायटीत रहात होतो, त्या रस्त्याच्या सुरूवातीच्याच सोसायटीत ते रहायचे. त्याच सोसायटीच्या तळघरातील एका हाॅलमधे ते आणि त्यांची पत्नी असे दोघेजणं संस्कृतच्या शिकवण्या घ्यायचे. नंतर आम्ही काही काळाकरता गंगापूर रोडला रहायला जाऊन आमचं घर बांधून झाल्यावर परत कामठवाड्यात आलो. तोपर्यंत ते इंदिरानगरला फ्लॅटमधे रहायला गेले होते. त्यामुळे बर्‍याच वर्षांत भेट नव्हती. ५-६ वर्षांपूर्वी आमच्यामागेच श्री. योगेशजी मांडे रहातात, त्यांनी सुनील जोशींना पॅरालिसिसचा अॅटॅक आल्याचे सांगितले. त्यातून ते बरे झाले. मला त्यांना भेटायला जायचे होते, पण कुठे रहातात हे माहिती नसल्याने एक दिवस योगेशजींबरोबरच त्यांच्या घरी गेलो. आता इथून पुढचं काळजीपूर्वक वाचा.

त्यांच्याकडे गेल्यावर आम्हाला दोघांनाही आनंद झाला. एखाद्या आजारातून बरं झालेल्या व्यक्तीला जसं आपण सहज विचारतो की काय झालं, कसं झालं, तसं मीपण विचारलं; तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते असं—-

” मी सकाळी १० च्या सुमारास डिशमधे पोहे खात इथेच बसलो होतो. निम्म्याहून अधिक पोहे खाल्ले असतांना अचानक माझ्या हातातून डिश गळून पडली. पॅरालिसीसचा झटका आला होता. त्यामुळे एक बाजू गळाल्यासारखी झाली होती आणि तोंडही वाकडं व्हायला लागलं होतं. एरवी त्यावेळी घरात कोणीच नसतं, पण नशिबाने मुलाच्या क्लासला सुट्टी असल्याने तो घरी होता. तो लगेच धावत बाहेर आला. त्याला मी कसेबसे माझ्या त्या मित्राला घेऊन यायला सांगितले, ज्याच्याबरोबर नाष्टा झाल्यावर मी कंपनीत जायला निघतो. मुलगा खाली गेला तर तो मित्र रोजच्याप्रमाणे स्कूटरवरून आलाच होता. मुलाने त्याला सांगितल्याबरोबर तो मला घेऊन खाली आला आणि जवळच्याच डाॅक्टरांकडे घेऊन गेला. तिथे तपासणी होईपर्यंत २ वाजले होते. डाॅक्टरांनी ताबडतोब न्युराॅलाॅजिस्टकडे जायला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी सुचविलेल्या हाॅस्पिटलमधे आम्ही गेलो. तिथे लगेच तपासणी होऊन अॅडमिट केले आणि प्राथमिक उपचार सुरु केले. संध्याकाळी डाॅक्टर येऊन तपासून गेले आणि स्टाफला सूचना देऊन गेले. त्याप्रमाणे आैषधोपचार सुरू झाले. रात्री ८-८॥ च्या बेताला एक फिजिओथिअरपिस्ट भेट ध्यायला आली. मला तपासल्यावर हिला सांगितले की ‘ मी उद्या सकाळी लवकर आठ वाजता येते, तोपर्यंत यांना झोपू देऊ नका. यांच्याशी सतत बोलत रहा आणि जागं ठेवा.’ ती निघून गेल्यावर मला जे काय थोडंफार उच्चार करून बोलता येत होतं, तसं मी आणि ही, आम्ही दोघेजणं संस्कृतमधून गप्पा मारत होतो. (लक्षात घ्या हं, दोघं नवरा-बायको संस्कृतमधूनच एकमेकांशी बोलत होते.) आणि विशेष म्हणजे अधूनमधून मी रामरक्षा म्हणत होतो. अशा रितीने रात्रभर बर्‍याचवेळेस मी रामरक्षा म्हटली.

सकाळी ती फिजिओथिअरपिस्ट जशी आली आणि मला जसं बघितलं, तसे तिचे डोळे विस्फारले गेले. तिने हिला विचारलं की रात्रीतून तुम्ही काय केलं? हिने थोडसं घाबरत सांगितलं की ‘ काही नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ह्यांना रात्रभर जागं ठेवलं.’

त्यावर ती म्हणाली की ‘ नाही. तुम्ही नक्कीच काहितरी निराळं केलं असणार. कारण यांचं तोंड वाकडं झालेलं होतं, त्यासाठी मी माझ्याजवळच्या निरनिराळ्या आकाराच्या लाकडी गोळ्या गालात ठेवण्यासाठी आणल्या होत्या (तोंड सरळ होण्यासाठी फिजिओथिअरपिमधला हा एक भाग असतो), पण यांचं तोंड तर सरळ झालेलं दिसतंय. मला नक्की सांगा तुम्ही काय केलं?’

…….. तेव्हा हिने सांगितलं की ‘आम्ही रात्रभर संस्कृतमधून थोड्या गप्पा मारल्या आणि ह्यांनी बर्‍याच वेळेस “रामरक्षा” म्हटली.’

तिला आश्चर्य वाटल्याचं तिच्या चेहेर्‍यावर दिसत होतं. ती लगेच निघून जातांना म्हणाली की मग आता माझं काही कामच नाही. यासाठीच मी आले होते. (म्हणजे त्या रोग्याच्या तोंडाच्या आकारानुसार योग्य अशा आकाराची लाकडी गोळी जिकडे तोंड वाकडं झालं असेल त्याविरूद्ध गालात काही तास ठेवली जाते, जेणेकरून तोंड सरळ होण्यास मदत होते.)

फक्त रामरक्षा म्हटल्याचा आणि संस्कृत उच्चारांचा शरीरावर काय परिणाम होतो याचं हे माझ्यासमोरचं जिवंत उदाहरण मी पाहिलं. माझ्याशी ते अगदी व्यवस्थित बोलत होते.  

रामरक्षेच्या प्रभावाचा त्यांनी स्वतः घेतलेला अनुभव, जो त्यांनी स्वतः मला सांगितला, तो मनांत ठसला आहे.

लेखक : श्री.संतोष गोविन्द जोशी

माहिती संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈