मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

@doctorforbeggars

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

प्रसंग पहिला – साधारण सहा महिन्यांपूर्वीचा…

नेहमीप्रमाणे याचकांच्या भेटीला निघालो असताना, पुण्याच्या मध्यवर्ती गजबजलेल्या भागात एका सरकारी ऑफिसच्या गेट बाहेर, दाढी वाढलेल्या आणि अत्यंत गलिच्छ अवतारात, उकिरड्यात झोपलेल्या बाबांना विव्हळताना पाहिलं.

जवळ जाऊन पाहिलं तर पायाला भली मोठी जखम झाली होती आणि त्यात अक्षरशः किडे वळवळत होते.

बाबांची ओळख झाली, त्यांची व्यथा समजून घेतली. 

यानंतर किडे बाहेर काढण्याची वेगवेगळी औषधे वापरून रस्त्यावर ड्रेसिंग करत राहिलो. जखम बरी झाली झाली… म्हणता म्हणता पुन्हा बिघडायची.

मला जाणवलं की, हे किडे रस्त्यात अशी मला दाद देणार नाहीत…. रस्त्यावरचे किडेच ते….!

आपल्या आजूबाजूलाही असतात असे अनेक किडे…. दुसऱ्यांची आयुष्य पोखरणारी….!

तर यांना माझे मित्र डॉ. शोएब शेख यांच्या मॉडर्न हॉस्पिटल पुणे येथे ऍडमिट केलं.  इथल्या टीमने प्रयत्नांची पराकाष्ठा करुन बाबांचा पाय वाचवला. 

दवाखान्यात होते, तोवर अन्नपूर्णा प्रकल्पातून जेवणाची सोय लावून दिली.

मला आपलं एकच सुख… बाबा जोपर्यंत ॲडमिट आहेत तोपर्यंत हॉस्पिटलमुळे निवारा तरी आहे…. दोन वेळच्या जेवणाची सोय तरी होतेय. किमान रस्त्यावर तरी आता यांना पडून राहावं लागत नाही. 

एके दिवशी हॉस्पिटल मधून फोन आला, येत्या काही दिवसात बाबांना डिस्चार्ज करत आहोत, त्यांची ट्रीटमेंट पूर्ण झाली आहे, त्यांना घेऊन जावे. 

डिस्चार्ज झाल्यानंतर मी त्यांना कुठे घेऊन जाणार होतो ?  परत त्याच रस्त्यावर ?  त्याच जागेवर ?? त्याच उकिरड्यात सोडून येऊ?? त्यांच्या मुलानेही हेच केलं होतं…. मी पण तेच करू ??? 

प्रसंग दुसरा – पुण्यामध्ये एक प्रसिद्ध बाग आहे. अनेक दानशूर मंडळी येथे अन्नदानाचे काम करत असतात.

इथे भीक मागणारी मंडळी मला एक गठ्ठा भेटतात,  मी इथेही वार लावून येत असतो. 

एके दिवशी बागेशेजारच्या फुटपाथवर एक आजोबा पडलेले दिसले. जवळ गेल्यानंतर कळलं यांना Paralyais झाला आहे , वाचा जवळपास गेली आहे. 

आता यांच्याशी बोलायचं कसं ?  यांचा भूतकाळ कसा जाणून घ्यायचा ? 

ज्यांना बोलता येत नाही,  ते किमान हातवारे करून, खाणाखुणा करून काहीतरी सांगतात, त्यातून काहीतरी दिशा मिळते.

परंतु पॅरालिसीस झालेल्या या बाबांकडे हे दोन्ही मार्ग नव्हते….  ना ते खाणाखुणा करु शकत,  ना स्वतःची वेदना शब्दात मांडू शकत….!

पण वेदनेला शब्दांची गरज नसते…. संवेदनेला भाषा नसते….! 

निष्प्राण डोळ्याने माझ्याकडे बघत मला बोबड्या बोलीत काहीतरी ते सांगण्याचा प्रयत्न करायचे….. परंतु मला काहीही कळायचं नाही.

ते जमिनीवर पडून असायचे…. मी यांच्याकडे गेलो कि काही न बोलता यांच्या डोळ्यातून टपटप आसवं गळायची…. आपल्याला पाहून कुणाची तरी आसवे टपकली तर समजावे, आपल्या बरोबर तो त्याचा गतकाळ वाटू इच्छितोय….! 

मी जवळ बसलो कि माझा हात धरायचा ते प्रयत्न करायचे….. बुडता माणूस जसा मिळेल तो आधार शोधतो तसा….

मला कळलं, हे माझ्यात आधार शोधत आहेत….!

एकदा त्यांनी हाताची पाच बोटं तोंडाकडे नेत मला इशारा केला…. मला कळलं, यांना भूक लागली आहे, मी बाजूच्या हॉटेलमधून काहीतरी मागवलं…. आणि त्यांच्या तोंडापुढे  नेलं…. पण त्यांनी तोंड फिरवलं….

मला काहीच कळेना….

यानंतर त्यांनी मनगटावर बोट ठेवलं…. आणि पुन्हा हाताची पाच बोटं तोंडाकडे नेत, माझ्याकडे बोट दाखवलं ….

ओह…. त्यांना म्हणायचं होतं…. खूप वेळ झालाय पोरा, तू जेवून घे…..!

मी त्यांच्या या बीन बोललेल्या वाक्यावर रडलो होतो तेव्हा …!!!

जो स्वतः उपाशी आहे, तो दुसऱ्याला म्हणतो…. जेवून घे….! खूप मोठं मन लागतं याला…..

असं हे बीन शब्दाचं, बीन भाषेचं आमचं नातं….! 

माझ्या आजोबांसारखा….. आजोबांसारखा कसला…. आजोबाच की….! 

क्रमशः….

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈