मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…माझे बालपण भाग-5 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

 ☆ मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…माझे बालपण भाग-5 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

कोणतं साल होतं नक्की आठवत नाही,  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरची व्याख्याने होती. खासबान मैदानावर.रोज रात्री नऊ वाजता सुरू होत. संपून घरी परत पोचायला साडेबारा व्हायचे. तुफान गर्दी होती. आम्ही सर्वजण जात असू. शिवाजी महाराजांचे लहानपणापासूनचे प्रसंग,  छोटा शिवबा, जिजाबाई,  शहाझीराजे,  तानाजी मालुसरे, सूर्याजी, नेताजी पालकर, औरंगजेब, शाहिस्तेखान, अफझलखान, रोहिडेश्वराची शपथ, आधी लगीन  कोंढाण्याचं…..असे प्रसंग आणि व्यक्तिरेखा हुबेहूब डोळ्यासमोर उभे केले होते. आम्ही अगदी भारावून गेलो होतो.  आजच्या व्याख्यानात ऐकलेला प्रसंग दुसरे दिवशी आम्ही घरी प्रत्यक्ष नाटकरूपाने अभिनय करायचो. खूपच मजा यायची.  जिजाबाई होण्यासाठी माझी आणि बहिणीची अंजूची वादावादी व्हायची. शिवाजी होण्यासाठी दोघं भाऊ, राजू उजू.ची मारामारी व्हायची. मग आम्ही तह केला. व एकेक दिवस वाटून घेतला.

???

सर्वांत शेवटचा दिवस राज्याभिषेकाचा.

राज्याभिषेक सोहळा प्रत्यक्ष घडवून आणला होता. अनेकजण त्यात अभिनय करत होते. जे आम्ही गेले 15 दिवस घरी करत होतो, ते इथं मोठी माणसे आजचा सोहळा करत होती. प्रचंड प्रचंड गर्दी होती. श्री. बाबासाहेब पुरंदरे खास गुलाबी फेटा बांधून व्याख्यान देत होते.स्टेजवर राज्याभिषेकाचा सेट लावला होता. प्रेक्षक श्वास धरून, जीवाचे कान करून ऐकत होते,  डोळ्यांनी अनुभवत होते. काशीहून आलेल्या गागाभट्टानी मंत्रोच्चाराने सप्तसागर, सप्तसरिताचा पवित्र जलाभिषेक केला. राजवस्त्रे,  जिरेटोप  लेवून राजे सिंहासनाजवळ गेले. त्यांनी सिंहासनाला मुजरा केला. पाय न लावता आरूढ झाले.

शिंग- तुता-या निनादल्या. चौघडे ताशांचा गजर झाला. 32 मण वजनाचे सिंहासन  रोमांचित झाले. दणदणीत आवाजात घोषणा झाली,

” गडपती, गजअश्वपती,  भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर,  महाराजाधिराज, राजाशिवछत्रपती महाराज की जय!”

जमलेल्या हज्जारोंनी जयजयकार केला. प्रत्येकाची छाती अभिमानाने भरून आली होती. जयजयकाराने अवघे खासबाग मैदान दणाणून गेले होते. मैदानाच्या बाहेर हजारो लोक उभे होते. अख्खे कोल्हापूर रात्री साडे बारा वाजता जयजयकार करत होते.

दुसरे दिवशी वर्तमान पत्रात सोहळ्याचे फोटो आणि वर्णन वाचले आणि त्या सोहळ्यात आपल्याला उपस्थित रहायला मिळाले, ही गोष्ट भाग्याची,  अभिमानाची वाटली.

नंतर पुढे महिनाभर आमची शिवचरित्राची नाटके चालू होती.  परिक्षा आली म्हणून ते वेड बाजूला ठेवावं लागलं.

हे नकळत आमच्यात रुजलेले संस्कार आयुष्य भराची शिदोरी ठरले.

क्रमशः…

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈