मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साबुदाण्याची उसळ– ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘साबुदाण्याची उसळ’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

‘नववधू प्रिया मी बावरते’ असे होते ते दिवस.  “उगवत्या  चंद्राला  लागली रजनीची  चाहूल…. माजगावकरांची  कन्या  गोपीनाथ रावांच्या संसारात  ठेवते  पाऊल.  .” असा काहीसा कुणीतरी शिकवलेला   घोटून घोटून  पाठ  केलेला उखाणा अडखळत  धडधडत मी घेतला  खरा  पण डोळ्यासमोर काजवे चमकत  होते. कसं असेल बाई हे सासरच  गाव ? आपण अस्सल पुणेरी आणि सासर अस्सल खान्देशी.. त्यातून भुसावळ कधी  पाह्यलेलं पण नाही. शाळेत भूगोलाच्या पुस्तकात डोकं खुपसतांना नकाशात  ठिपका  बघितला  होता. बस एवढीच काय ती त्या गावाची ओळख. आणि आता तर सगळं आयुष्यच  काढायचय   तिथे.  मनात भीती,  हुरहूर  सगळ्या भावनांचं   मिश्रण होतं. त्यातून . महाराष्ट्र एस्प्रेसचा  बारा तासांचा  प्रवास. दुसऱ्या गाडीने गेलं तर मनमाडला गाडी बदलावी लागायची  . मनमाड स्टेशन हें sssभलं मोठ्ठ, आणि तें  बघून मॅडच  व्हायची वेळ यायची.  तर अशा ह्या भुसावळ गावांत माझा गृहप्रवेश झाला.  खान्देशी आमटी जिभेला चव  आणायची,  तर ठेचा  आणि भरीत  मेंदूला झटका देऊन डोळ्यात पाणी आणायचं.  पण माझी खरी  त्रेधा तिरपीट उडाली ती  खान्देशी भाषेशी हात मिळवणी करतांना.         

एकदा काय झालं, बस स्टॉपवर उभी  होते .एका आजी बाईंना विचारलं,” बस गेली का हो आजी?”   खडया आंवाजात  उत्तर आलं , ” बस कवांच चालली गेली.  सरळ जाऊन  फाकली बी असलं ., ”  अरे बाप रे ! फाकली काय,  चालली  गेली काय,  माझ्या मेंदूला काही अर्थ बोधच  होईना.   काय करावं  ?   हे गावात  वाट बघत  असतील. मी भांबावून उभीच . तोवर आजींचा  दणदणीत आवाज कानावर पडला  , “आता  काय करून राह्यली तू ? तरणीताठी पोरगी हायेस.  जा कीं झपाझपा चालत. नायतर घरी  जाऊन दादल्या संगट ये सायकल वरन डब्ब् ल शीट. ” काय सांगू त्यांना,दादला घरी नाही तर गावात वाट बघतोय   म्हणून . मख्ख  उभी  राहयले. आता कुठला  नविन   गोंधळात  टाकणारा शब्द कानावर पडणार ह्या भीतीने गप्प बसले. बाईं गं ! धसकाच घेतला होता मी त्या आजींच्या शब्दांचा.                  अहो काय सांगु तुम्हाला ? दुसरी फजिती  माझी घरीच  झाली की हो !. त्याचं असं झालं  सासूबाईंचा  उपास होता.  आपली  पाककृती  दाखवून त्यांना खुश  करावं म्हणून मी  विचारलं .  “आई  काय करू उपवासाच ? कुणाशी  तरी बोलताना त्यांनी  उत्तर  दिलं. “कर की  साबुदाण्याची  उसळ”..  मी उडालेच.  बाप रे! साबुदाण्याची उसळ ? आणि आता हा कुठला नवीन पदार्थ ? 

माहेरी लाडोबा आणि त्यातून शेंडेफळ . मोठ्यां तिघी बहिणी,आई ,आत्या,     काकु अशा गृहकृत्यदक्ष अन्नपूर्णा होत्याच की घरात.त्यामुळे वहिनीवर  पण सून असून जबाबदारी नव्हती.  मग माझी काय कथा ! त्यातून माझी नोकरी.  स्वयंपाक घराशी  सबंध  खाण्यापुरताच . जरा इकडे तिकडे केल.,   कधीतरी  वरणाला  मोहरी जाळून सणसणित  फोडणी दिली, तरी वडील कौतुक   करायचे.   अशा  सुगरणीला  सासूबाईनी साबुदाण्याची उसळ करायला  सांगितली… दिवसा तारे चमकले  डोळ्यासमोर. सासूबाई वयानी माझ्यापेक्षा  बऱ्याच मोठया.  मला संकोच  आणि  भीती  वाटायची  त्यांची.  त्यातून त्या चार  बायकात बसलेल्या . साबुदाण्याची उसळ कशी  करायची ? हें त्यांना विचारू कसं बाई ?  अज्ञानाला आमंत्रणच कीं हो ! मनात नुसता गोंधळ   चालला  होता. साबुदाणा भिजेल पण ==पण त्याला मोड कसे आणायचे  ?   हे दिवे आईपुढे  पाजळावे.तर  फोनची  सोय पण  नव्हती तेव्हा.   तरी आई  लग्नाआधी  कानी कपाळी ओरडायची, स्वयंपाकाची सवंय ठेव  म्हणून.  आता काय करायच ? बसा आता रडत. घड्याळ तर पुढे सरकत होतं.  जरा वेळाने सासरे व सासूबाई फराळाला आत  येतील.   साबुदाणा तर केव्हाच   भिजवलाय., डोकं लढवून.  पण???त्याची उसळ???फराळाच्या ताटलीत सासऱ्यां पुढे  काय ठेऊ?    दरदरून घाम  फुटला मला.  आणि  मग  एकदम, शेजीबाई  आठवली.    मागच्या दाराने तिच्याकडेपळत गेले. ‘ ‘उसळीच ‘ अज्ञान तिच्या पुढे उघडं  केल.    तीने पण एवढंही येत नाही कां हीला?   अशा नजरेने बघून कृती  सांगितली.  आणि मग एकदम ट्यूब पेटली. ‘अय्या  !अगंबाई!    हीं  तर साबुदाण्याची खिचडी ..ही तर येते कीं  मला.सोप्पी तर आहे . उगीचच   घोळ   घातला बाई इतका वेळ .आणि अहो मग काय!खिचडी जमली कीं हो मला ! सासुबाई आणि सासरे एकदम खुश झाले,खिचडी खाऊन.  पण एक मात्र झालं हं! आपल्याकडच्या साबुदाण्याच्या खिचडी ला तिकडे ‘ साबुदाण्याची उसळ ‘ म्हणतात ह्या नविन शब्दाची ज्ञानात  भर  पडली.आणि तेव्हाच  साबुदाण्याची  उसळ पदार्थाचा शोध मला लागला. अशी खानदेशी भाषेशी फुगडी खेळता खेळता भुसावळ वास्तव्यातला बहिणाबाईंच्या भाषेतला ‘अरे संसार संसार ‘ पार पाडला. आणि बरं कां मंडळी!अजूनही बरेच किस्से आहेत बरं का ! पण आपली फजिती एकाचं वेळी सगळी सांगणं बरं नव्हे ! नाही का ?  सांगेन हं,पुढच्या वेळी,पुन्हा  कधी तरी ,  केव्हा  तरी…                     

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈