सौ विजया कैलास हिरेमठ

अल्प परिचय 

शिक्षण – M.Com,M.Lib

विशेष – छंद – वाचन, लेखन. सद्या लहान मुलांचे क्लासेस घेते.

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “वन पेज स्टोरी” – डॉ. विक्रम लोखंडे ☆ परिचय – सौ विजया कैलास हिरेमठ ☆ 

पुस्तक – वन पेज स्टोरी

लेखक – डॉ विक्रम लोखंडे

प्रकाशक – साकेत प्रकाशन प्राइवेट लिमिटेड, औरंगाबाद 

पृष्ठ संख्या – 128 

आयुष्य हे एक अनुभवांचे पुस्तकच तर आहे असं आपण सहजच म्हणतो तसंच डॉ विक्रम लोखंडे यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये तसेच इतर वेगवेगळ्या ठिकाणी आपले काम करताना येणारे अनुभव या पुस्तकातून आपल्यापर्यंत अतिशय सुंदर पद्धतीने पोहचवले आहेत . रोज नवनवीन लोकांशी भेटी वेगवेगळ्या गोष्टी शिकवून जातात ,पेशंटच्या तसेच त्याच्या नातेवाईकांच्या भावना समजून घेताना   डॉक्टरांना काय वाटतं होतं,त्यांच्या मनात कोणकोणते विचार येत होते आणि त्यातून जी कथा सुचत गेली त्याचे हे पुस्तक..वन पेज स्टोरी या नावातच पुस्तकाचं मोठं गुपित आणि यश दडलेले आहे  कारण प्रत्येक कथा एका पानातच संपते. कथा एका पानावर संपते म्हणून ती कुठंही अर्धवट किंवा अर्थहीन,बोधविरहित मात्र नक्कीच वाटत नाही तर अगदी कमी वेळात बसल्या बसल्या एखादी कथा खूप काही सांगून जाते,एखादा छानसा बोध आणि वाचनाचा आनंद ,समाधान देवून जाते. आपल्या मनोगतात लेखक म्हणतात की, नवीन पिढी खूप फास्ट आहे, त्यांचा संयम कमी आहे, लांबलचक लेख वाचायला खूप कमी लोकांना आवडते. जास्त वेळ एकाग्र न राहू शकणाऱ्या,सगळं झटपट,थोडक्यात पटकन हवं असणाऱ्या या पिढीची आकलन क्षमता मात्र खूप जास्त आहे.नेमकं सांगितलेलं त्यांना पटकन समजतं आणि आवडतही. म्हणून हा लेखन प्रयोग. नेमका आशय,भावना पोहचवताना शब्दांची जी कसरत करावी लागत होती ती रोमांचक होती. लेखकाचे हे पुस्तक लिहितानाचे अनुभव वाचून खूप छान वाटले पेक्षा  बऱ्याच गोष्टींची खरोखर गंमत वाटली.  लिहणं ही मला सर्वोत्तम क्रियेटीव्हीटी वाटते . यात तुम्ही न जगलेली खूप सारी आयुष्यं जगता येतात. लेखकाचे हे वाक्य वाचून आपण जे थोडफार तोडकं मोडकं काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो याबद्दल कौतुक वाटले.

या पुस्तकांत काही बोलक्या चित्रांसहित तब्बल 42 कथा आहेत. सर्वच्या सर्व हृदयस्पर्शी.

कथांमधून नाती, त्यातून निर्माण होणाऱ्या अपेक्षा आणि आपेक्षाभंग याचं दर्शन लेखक करून देतात. प्रत्येक कथेतून लेखकाचा व्यापक  दृष्टीकोन लक्षात येतोच पण कथेकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनातून प्रत्येक कथा आपल्याला आपल्या आयुष्याचा एक भाग वाटू लागते. एक एक छोट्या कथांमधून लेखक आपल्याला वेगळ्याच मार्गावर घेवून जात आहे हे आपल्या लक्षात ही येते आणि या कथा म्हणजे लेखकाने आपली केलेली आनंददायी फसवणूक वाटू लागते. एक डॉक्टर म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असताना एक लेखक म्हणून प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा लेखकाचा दृष्टीकोन खरोखर खूप कौतुकास्पद वाटतो. या पुस्तकातून मला काय मिळालं हे सांगणं अवघड आहे कारण 42 कथा 42 नव्या गोष्टी सांगून गेल्या त्यातल्या नेमक्या एक एक बाबी सांगणं म्हणजे  वाचकाची सत्वपरीक्षा ठरेल म्हणूनच मला इथे कथांचा सारांश देणे उचित वाटत नाही. शिवाय लेखकाने पुस्तकांत इतक्या कमी शब्दांत आपल्या भेटीला इतक्या छोट्या पण छान कथा आणल्या आहेत तर प्रत्येकीने त्या वाचूनच पाहायला काहीच हरकत नाही.. हो ना?

क्षणक्षणात नवं आयुष्य

पुस्तकाच्या पानापानांत

उलगडताना दिसतं

प्रत्येक पानावर नवं काहीतरी भेटतं..

प्रत्येक दिवशी नवं जगणं

नव्या अनुभवातून नवं शिकणं

रोज नवं कोणी भेटणं

भेटीतूनच एक कथा फुलणं…

त्याचं सुंदर पुस्तक बनलं

नाव त्याचं वन पेज स्टोरी ठरलं

एकाच पानात एक कथा

कधी आनंदी गाथा तर कधी सांगे व्यथा….

परिचय – सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments