सौ. अक्षता गणेश जोशी

(सौ. अक्षता गणेश जोशी आपलं ई-अभिव्यक्तीवर हार्दिक स्वागत)

अल्प परिचय

शिक्षण – बी. ए. (इतिहास) आवड – वाचनाची आवड आहे… ऐतिहासिक वाचन आवडते… वाचलेल्या पुस्तकावर अभिप्राय लेखनचा प्रयत्न करते…

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ व्हाय नाॅट आय?… सुश्री वृंदा भार्गवे ☆ परिचय – सौ. अक्षता गणेश जोशी ☆

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव – व्हाय नॉट आय?

लेखिका – वृंदा भार्गवे.

पृष्ठ संख्या – २५२

अमेय प्रकाशन

मूल्य – २५०₹

जन्मतः माणसाला सुदृढ, निरोगी,धडधाकट आयुष्य मिळणे म्हणजे दैवी देणगीच म्हणावी लागेल. ती टिकवणे आपल्याच हातात आहे असे जरी आपल्याला वाटत असले तरी एखादी व्यक्ती त्याला अपवाद असू शकते. वयाच्या सातव्या वर्षी डॉक्टरांच्या एका चुकीमुळे पाणीदार डोळ्याच्या देखण्या देवू ची (देवकी) दृष्टी गेली.याचा परिणाम त्वचा,दात, केस,वर्ण या सगळ्यावर झाला.एवढं सगळं होऊन ही तिने आणि तिच्या आईने जिद्द सोडली नाही…

सत्य घटनेवर आधारित असणारी ही आहे “उजेडयात्रा”… कादंबरी,कथा,अनुभव कथन कशात ती बसू शकेल याची कल्पना नाही. ही संघर्ष आणि जिद्दीची प्रेरणादायी कथा आहे हे मात्र नक्की!!

“अंधारावर उजेड कोरणाऱ्या मायलेकीची कहाणी…”

लेखिकेने अतिशय सुरेख शब्दात घडलेल्या घटनांचे वर्णन केले आहे. घटना डोळ्यासमोर उभ्या राहतात. डोळ्यांत पाणी तरळते…देव सुद्धा एखाद्याची किती परीक्षा घेत असतो…की मागच्या जन्मी चे पाप-पुण्या चा तर्क वितर्क आपण जोखत असतो… देवू च्या यातना सोसण्याला परिसीमा नाहीच…पण त्याहीपेक्षा तिचे स्वावलंबी होणे जास्त मनाला वेधून जाते…

तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन जातीबाह्य विवाह केला.दोन्ही बाजूंनी तसा विरोधच…सासरे आणि नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे एम.ए. करून इतिहासात बी.एड.केले. नवरा पुढे एम.फिल.कर असे म्हणत होता पण तिने शिक्षण थांबवून शिक्षकीपेशा स्वीकारला…

पंधरा वर्षाच्या संसारात दोन मुली मोठी रेणू 10 वर्षांची आणि धाकटी देवू (देवकी)साडेतीन वर्षांची.

काही तासापूर्वी तिच्याशी बोलत असणारा तिचा नवरा ज्याचे पोट थोडे दुखत असल्याचे निमित्त होऊन अकस्मातच गेला…ती आणि तिच्या मुली एकदमच बिचाऱ्या झाल्या. तिची शाळेतील नोकरी होती तरीही…

नवरा गेल्या नंतर सासरी होणारी मानसिक कुचंबणा,निराशेचे वातावरण तिला तिच्या मुलीचे भविष्य घडवण्यासाठी नको होते म्हणून मुलींना घेऊन ती माहेरी आली. बहिणीचे लग्न झाले होते, भावांनीही वेगळे संसार थाटले होते.लहानपणी भावा-बहिणींमधले प्रेम, परस्परांसाठी जीव तुटणे ही ओढ कोठे तरी हरवली आहे असे जाणवले…तिच कमतरता आई वडिलांच्या नजरेत जाणवली… सर्वार्थाने ती एकटी पडली होती. सगळीकडून तिला व्यवहारिकतेचे अनुभव येऊ लागले.तिने लक्षात ठेवले ते माणसाचे तत्वज्ञान… माणस जपायला पाहिजेत पण माणस वेगळी आणि नातलग वेगळे हे समजलेच नाही…

आपल्याला सगळे झिडकारत आहेत असे वाटू लागले.विरंगुळा काय तो दोन मुलींचा.रेणू अगदी नवऱ्यावर देखणी शांत,खळीदार हसणं… बाबा गेल्यावर उदास-गप्प गप्प रहायची, आता आपले हक्काचे नाही याची समज तिला लवकर आलेली.रेणूचा धाकटी म्हणजे देवू वर विलक्षण जीव. देऊ चे डोळे म्हणजे तिचा अँसेट… अतिशय बोलके,मोठाले डोळे, काळ्याभोर पापण्या प्रचंड मोठया,आकाशीसर पाश्र्वभूमीवर काळ्या रंगाची बुब्बुळ… दोघीना रंगाचे भारी वेड…

तिला स्वतःला आर्टिस्ट व्हायचे होत पण एक वेगळंच आयुष्य तिच्या वाट्याला आलेलं…पण दोन्ही मुलीना मात्र त्यांच्या आवडीने जगू द्यायचे अस ठरवलेलं पण हे स्वप्न नियतीने पुन्हा उध्वस्त केलेले… ९ ऑक्टोबर १९९३ ला देवू ला अचानक सर्दी खोकला  झाला. त्यातच ताप  आला.अंगावर काढण्यापेक्षा बालरोगतज्ज्ञ यांच्या कडे घेऊन गेली.

त्या रस्त्याने त्या दवाखान्यात जात नव्हती तर ती तिच्या गोंडस,सुंदर पाणीदार डोळ्याच्या मुलीच्या आयुष्याची शोकांतिका लिहायला चालली होती.

औषध घेऊन ही ताप कमी येत नव्हता.घसा लालसर झाला शरीरावर ही डाग दिसू लागले,एक डोळा लाल झाला. पुन्हा डॉक्टरानी तेच औषध सुरू ठेवा असे सांगितले. तापाचे प्रमाण पुन्हा कमी जास्त होत गेले.पण डोळे मात्र लाल, त्यातून येणारा पांढरा स्त्राव,पूर्ण शरीरावर भयंकर रँश.वरचा ओठ पूर्णपणे सुजलेला…एका विचित्र संकटाची चाहूल तर नाही ना…

रक्ताची तपासणी करून आणून द्या मगच समजेल… तोपर्यंत सेपट्रन हे औषध चालू ठेवा…हे औषध अगदी ओळखीचे झालं होत. तपासणी मध्ये मलेरिया झाले एवढंच समजले. डॉक्टरानी ताबडतोब अँडमिट करायला सांगितले. 26 तारखेला डॉक्टरांनी देवू चा नवाच आजार जाहीर केला.”STEVENS JOHNSON SYNDROME”  तिला तर समजलेच नाही. काळजी करू नका.ट्रीटमेंट बदलू असे डॉक्टर म्हटत. देवू च्या सर्वांगावर पडलेले लाल डाग आता काळ्या डागात परावर्तित झालेले.”ममा, रोज नवा फुगा तयार होतो बघ…”ती फोडाला फुगा म्हणायची… आता तिच्या डोळ्यांकडे पाहवत नव्हते.ऍडमिट केल्यापासून सलायन,अनेकदा ब्लड काढण्यासाठी सुया टोचल्या जायच्या.पण देवू एकदाही रडली नाही. हे सगळं सहन करण्याच्या पलीकडे होते.देवू साठी आणि देवू च्या आईसाठी… या सगळ्यात तिला तिच्या धाकट्या दिराची मदत झाली.वेगवेगळे डॉक्टर यायचे ते सांगतात ते ऐकायचे त्यांच्या दृष्टीने तिची वेगळी केस असायची… अगदी हैद्राबादला मध्ये तिला दाखवले एक तर डोळ्यात आलेला कोरडेपणा आणि गेलेली दृष्टी… प्रत्येकाची वेगळी औषधे आणि त्यांचे चार्जेस….

(देवू च्या सुरुवातीच्या आयुष्यात जे वेदनादायी प्रसंग आले ते मला लिहणे सुद्धा त्रासाचे झाले जे याही पेक्षा तिने कोणावरही राग,दोष न देता सहन केले…खरच काय म्हणावे तिच्या सहनशक्तीला…)

या काळात तिला नवऱ्याची प्रकर्षाने उणीव भासली कारण तो फार्मासिस्ट होता…त्याच्या मुळे तिच्या देवू वरचे संकट तरी टळले असते… पण ती आठवण सुद्धा व्यक्त करायला सवड नव्हती….या दिवसात तिच्या सोबत तिचे आई वडील असूनही नव्हते आणि नसूनही होते.तिच्या मात्र सारख्या दवाखान्याच्या चकरा असायच्या.देवू कोणतेही आढे वेढे न घेता जायची.ज्यावेळी तिला कधीच दिसणार नाही हे कळाले तेव्हा निरागस मुलीने आईची समजूत घातली आणि तिलाच धीर दिला,”ममा तू रडतेस, मी चालेन हं… पण मला आता गाड्या दिसणार नाहीत… मी त्रास देणार नाही, शहण्यासारखी वागेन…तू मला काठी आणून दे.”  या सगळ्यात तिचा धाकटा दीर आणि धाकटा भाऊ यांची साथ मिळाली.आणखी बऱ्याच लोकांचे सहकार्य मिळाले ते सहानभूती म्हणून नाही तर देवू आणि तिच्या आईची जिद्द बघून…काळकर काका फ्रान्सहून येताना देवू साठी प्रिझर्व्हेटिव्ह फ्री टीअर ड्रॉप्स च्या ट्यूब आणल्या(डोळ्यातला ओलावा कायम टिकून ठेवण्यासाठी) एकही पैसा घेतला नाही, वावीकर बाईनी ब्रेल किट च हातात सोपवलं,देवू ला ब्रेल शिकवायची…

माणूसवेडी देवू कोणी आले की तिला प्रचंड आनंद व्हयचा.स्पर्शा चे ज्ञान तिला आता चांगले अवगत झाले होते.घरातल्या घरात ती सहज वावरू लागली… गप्प राहणाऱ्यातली मुळीच नव्हती ती.देवू ला आईच्या शाळेतच घातले. आई तिला पुस्तक मोठ्या ने वाचून दाखवत असत.एकक शब्द आणि त्याचा अर्थ…तिचे मार्क नेहमी छान असायचे…तिची हुशारी बघून इतर मुलांमध्ये न्यूनगंड येईल म्हणून तिचे प्रत्येक विषयातले मार्क कमी केले. हे कळल्यावर देवू च्या आईला खूप वाईट वाटले.पण त्या काही बोलू शकल्या नाहीत…पण काही शिक्षक असे ही होते की तिला योग्य मार्गदर्शन करत तिच्यावर त्यांचा जीव होता कारण ती हुशार आणि बुद्धीमान म्हणून नव्हे,तर तिला प्रत्येक गोष्ट आत्मसात करण्याची मनस्वी ओढ होती. असे चांगले वाईट अनुभव आले तरी त्या दोघी पुन्हा नव्याने सज्ज होत…तिच्या रेणू दि ची ही साथ खूप मोलाची होती.

देवू सातवीच्या वार्षिक परीक्षेत चारी तुकड्या मधून पहिली आली. सेमी इंग्लिश मिडीयम च्या वर्गासाठी निवडलेल्या मुलांच्या यादीत तिचा पहिला क्रमांक होता.तिची स्मरण शक्ती अफलातून होती.स्वतःचे वेळापत्रक स्वतः आखून त्याप्रमाणे पूर्तता झाली पाहिजे हा तिचा कटाक्ष असे.दहावी ला तिला 86% मार्क मिळाले. देवू च्या यशात नँब ने प्रचंड सहाय्य केले.तिथल्या लोकांनाही देवू चे वेगळे जाणवले असावे.फोन केल्यावर,”बोला देवू ची आई”काय हवं नको ते विचारायचे. दक्षिणेतल्या अंदमान सफरीसाठी महाराष्ट्र राज्यातून काही अपंग विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली त्यात देवू चा ही समावेश होता.ती व्यवस्थित जाऊन आली ही…

देवू ने आर्ट्स ला ऍडमिशन घेतले. इकॉनॉमिक्स हा विषय तिला खूप आवडतो.शाळेतल्या प्रमाणे तिला कॉलेजमध्ये मैत्रिणी ही खूप छान मिळात गेल्या… “10 वी 12 वी त पहिलं येणं नाही ग एवढं क्रेडीटेबल… मला माणसांसाठी, त्यांच्या सुखासाठी काहीतरी करायचंय,त्यासाठी भरपूर शिकू दे ग मला’असे ती म्हणयची. देवूला संशोधनात रस आहे… जे तिला करावेसे वाटते त्याची पूर्तता झाली असे लेखिकेने दाखविले आहे…

या सगळ्या यशात देवू ला तिला आई, बहीण आणखी खूप जणांची साथ लाभली असली तरी तिची अभ्यासू वृत्ती, जिद्द, स्वतः चे विचार मांडण्याचे धाडस,सगळ्याच गोष्टीत शिस्तबद्धता…या तिच्या गुणांचे योगदान खूप महत्वाचे आहे…

हे प्रेरणादायी पुस्तक वाचनीय आहे.

धन्यवाद!!

संवादिनी – सौ. अक्षता जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments