सौ. दीपा नारायण पुजारी

 

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ विज्ञान बिंदू… प्रा. मोहन  पुजारी  ☆ परिचय – सौ. दीपा नारायण पुजारी ☆

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नांव – विज्ञानबिंदू

लेखक – प्रा. मोहन पुजारी, इचलकरंजी

श्री. मोहन पुजारी यांचा हा पहिलाच लेख संग्रह. वैज्ञानिक व शैक्षणिक लेखांचा संग्रह असलेल्या या पुस्तकाचं नाव मोठं आकर्षक आहे. तसंच ते विषयाला साजेसं आहे. इचलकरंजी शहरात एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून सरांचा लौकिक आहे. विज्ञान – जीवशास्त्र या विषयाचं अध्यापन, विद्यार्थी व पालकांचा संपर्क आणि त्यांचं सामाजिक भान यातून त्यांच्यातला लेखक घडला आहे. त्यामुळे या पुस्तकात तीनही दृष्टीने लिहिलेले लेख वाचायला मिळतात. हेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.

पुस्तकातील पहिल्याच ” मुलांमधील संवेदनशीलता”या लेखात सध्या पालकांच्या समोर असलेल्या ज्वलंत प्रश्नावर चर्चा केली आहे. संवेदनशीलता म्हणजे काय हे सांगून,ती बोथट का झाली आहे याचे विवेचन केले आहे. एवढेच नाही तर त्यावरील उपाय देखील सांगितले आहेत. त्यामुळे विषयाला न्याय मिळाला आहे.

बहुपयोगी बांबू या लेखात बांबू या वनस्पतीची शास्त्रीय माहिती त्यांनी दिली आहे. बांबू सारख्या वनस्पतीचे विविध उपयोग वाचून मन थक्क होते.सामान्य माणसांना या माहितीचा नक्कीच फायदा होईल. शिक्षणातून संस्कार या लेखात विज्ञान विषयाची सांगड संस्कांराशी कशी घालावी याची मोठी रंजक माहिती मिळते. उदा.  न्यूटनच्या सप्तरंगी तबकडीत त्यांना भारतीयांची एकात्मता आढळते.जीवशास्र आपल्याला निसर्गाचं मानवी आयुष्यातलं महत्त्व सांगतो. रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणं बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचं महत्त्व विषद करतात. अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी रसायनशास्त्रातील पदार्थांच्या गुणधर्माचा उपयोग करून पटवून देण्याचा प्रयत्न ते करतात. एक संवेदनशील विचारी शिक्षक या लेखकाच्या मनात दडलेला दिसतो.निसर्गाशी नाते जोडूया या लेखात वनस्पतींवर झालेल्या प्रयोगाचे उदाहरण दिले आहे. वनस्पतींना भावना असतात. निसर्ग व माणूस यातला जिव्हाळा त्यांच्या वाढीसाठी महत्त्वाचा ठरतो या एका वेगळ्या मुद्द्याचा उल्लेख या लेखात केलेला दिसतो. निसर्गातून घेण्याच्या गोष्टीही त्यांनी सांगितल्या आहेत. जसं की; सिंहाचा रुबाबदारपणा,हरणाचा चपळपणा, फुलपाखराचे सौंदर्य,मधमाशीकडून समाजसेवा, मुंगीची शिस्त इ. यांत्रिकीकरणामुळे मिळालेला वेळ आणि रिकामे हात निसर्ग संवर्धनासाठी वापरा हा संदेश या लेखात दिला आहे.

जलसंवर्धन – काळाची गरज – या लेखात त्यांचा या विषयाचा अभ्यास लक्षात येतो. या लेखात आणि एकूणच पुस्तकातील माहितीपर लेखात क्रमांक घालून मुद्दे,उपमुद्दे गुंतागुंत व क्लिष्टता टाळली गेली आहे.वाचकाला विषय समजणं सोपं झालं आहे. लिखाणाच्या याच वैशिष्टपूर्ण पद्धतीमुळं टेस्ट ट्यूब वनस्पती हा लेख वाचनीय झाला आहे.

नयनरम्य प्रवाळे हा लेख या पुस्तकाचा आकर्षण बिंदू आहे. प्रवाळ म्हणजे काय, प्रवाळांची वैशिष्ट्ये,त्यांचे प्रकार, उपयोग, अनुकूलन अशा सर्व गोष्टींचा उहापोह त्यांनी केला आहे.त्यांचे रक्षण करणे किती गरजेचे आहे हे वाचकांच्या सहज लक्षात येते. समुद्रातील अतिशय सुंदर पर्यावरणसंस्थेची माहिती वैज्ञानिक भाषेची क्लिष्टता टाळून लिहिण्यात ते यशस्वी झाले आहेत. प्रवाळांच्या फोटोमुळे लेख वाचताना कुतूहल निर्माण होते आणि लेख आकर्षक ठरतो.

घर,शाळा आणि आरोग्य, सार्वजनिक उत्सवांचे बदलते स्वरूप, व्यसनाधीनता,सुखावह वृद्धत्व अशा लेखांमधून लेखकाचे सामाजिक भान लक्षात येते. थकलेली शारीरिक अवस्था व कमकुवत ज्ञानेंद्रिये,परावलंबन आणि परिणामी आलेली मानसिक अस्वस्थता यांचा तोल साधत वृद्धत्व सुखावह कसे करावे हे छानशा भाषेत सांगितले आहे. लेखक स्वतः जबाबदार ज्येष्ठ नागरिक असल्यानं या विषयाची हाताळणी संवेदनशील मनानं झाली आहे.

व्यसनाधिनता- एक सामाजिक समस्या या लेखात व्यसनाधिनतेची कारणे, त्यावरील उपाय वाचायला मिळतात.या लेखाच्या शेवटी पालकांना सल्ला देताना ते एक जीवनमंत्र देतात.मुलांना मुठीत न ठेवता मिठीत ठेवा हाच तो मंत्र! मुलांना वाचनाचे आणि अभ्यासाचे व्यसन लागू दे अशा शुभेच्छा देखील ते देतात.

वनस्पतींचा आरोग्याशी असलेला संबंध, महाराष्ट्रातील सण -उत्सव आणि वनस्पती, वनौषधी आणि स्री सौंदर्य, तसेच उतू नका,मातू नका, फळांच्या साली टाकू नका अशा सारख्या लेखांमधून वनस्पतींचं महत्त्व साध्या,सोप्या भाषेत सांगितले आहे. संपूर्ण पुस्तकात असलेली साधी, सोपी सहज भाषा; पुस्तक वाचनाची ओढ निर्माण करते. ‘ ज्याप्रमाणे थर्मामीटर मधील पारा वर- खाली होतो, पण बाहेर पडू शकत नाही ‘ किंवा आपले घड्याळ आपल्या मानगुटीवर बसले आहे.’

वरवर बघता साधी वाटणारी अशी वाक्ये लेखकाचे मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि विचारशक्ती दाखवतात.

वैज्ञानिक लेखांच्या या लहानशा पुस्तकाला कुतुहल निर्माण करणारे आकर्षक मुखपृष्ठ लाभले आहे. विषयाची सोप्या पद्धतीने हाताळणी, मुद्देसूद मांडणी, वैज्ञानिक संज्ञा न वापरता सामान्य माणसाला समजेल अशी भाषा, प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास ही या पुस्तकाची उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

फोन नं : 9665669148 ईमेल : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments