मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ मांडवावरची वेल – लेखिका – डॉ. ज्योती गोडबोले ☆ परिचय – सौ. प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ 

☆ मांडवावरची वेल – लेखिका – डॉ. ज्योती गोडबोले ☆ परिचय – सौ. प्रभा हर्षे ☆ 

पुस्तक : मांडवावरची वेल

लेखिका : डॉ. ज्योती गोडबोले

प्रकाशक : अमित प्रकाशन, पुणे.

पृष्ठसंख्या : १९०

किंमत :    रू ३७०

डॉ. ज्योती गोडबोले

कविता, कथा कादंबरी आदी वाडंःमय प्रकार आपण नेहमी वाचत असतो. आणि  त्यात लघुकथा आवडीने वाचल्या जातात. लघुकथेचा विषय  छोटासा पण लक्ष वेधून घेणारा असल्याने मनात रेंगाळत रहातो.  डॉ.ज्योती गोडबोले यांचा ‘मांडवावरची वेल’ हा असाच एक लघुकथा संग्रह आहेत. 

डॉ. ज्योती या व्यवसायाने डॉक्टर असल्याने लोकांशी संपर्क तर रोजचाच. त्यातही वैविध्य फार ! वय, जात आणि स्त्री पुरुष फरक ज्याचा परिणाम माणसाच्या वागणुकीत दिसत असतो.  त्याचे वेगळेपण टिपणे आणि ते कथारुपाने वाचकांपर्यंत पोचवणे यात डॉ ज्योती अगदी यशस्वी झाल्या आहेत. 

डॉक्टरांकडे येणारा पेशंट हा त्याची व्याधी तर घेऊन येतोच पण खूपदा मनाची दुखणी खुपणी ही त्यांना सागतो, त्यांच्याकडून काही दिलासा मिळतोय का याची वाट बघतो. ‘ देव तारी त्याला ‘ या कथेतील रोजंदारीवर काम करणाऱ्या बाईचे जेमतेम १ किलो वजनाचे बाळ कसं वाचलं आणि पोलिस इन्स्पेक्टर झालं  ही कथा,  किंवा ‘ वठलेला मोहर ‘ ही अरूणाची कथा, या कथा वाचकांनाही आपल्यासमोर घडताहेत असे  वाटावे इतके जिवंत चित्रण लेखिकेने केले आहे.

इतक्या वेगवेगळ्या विषयांवर कथा त्यांनी लिहिल्या आहेत कि त्यांच्याबरोबर आपणही जग फिरुन येतो.
परदेशात स्थायीक झालेली भारतीय मुलगी व तिचा अमेरिकेन नवरा यांची ‘ मायबाप ‘ ही  कथा आपल्याला एका वेगळ्या संस्कृतीत वाढलेल्या व्यक्तीला आपले संस्कार कसे लोभसवाणे वाटतात हे सांगते, तर ‘ रॉबर्ट आमचा शेजारी ‘ ह्या कथेत त्या एका  जिद्दी निग्रो डॉक्टरची मनापासून तारीफ करतात .  अशाच प्रकारची ‘ गराजसेल ‘ किंवा ‘ डाउनसायझिंग ‘ ह्या कथाही परदेशातील परिस्थितीचे वेगळे विषय मांडतात.

या दोन्हीपेक्षा वेगळे आहे ते त्यांचे समृद्ध भावविश्व ! माणसाच्या मनाचे कंगोरे कोपरे त्यांना सहज दिसतात आणि आपल्या प्रवाही भाषेत ते त्या मांडतातही … इतक्या सुबकपणे की अशा कथांना अगदी सहजपणे दाद दिली जाते. 

‘ झोपाळ्यावर ‘ ही कथा अशीच सुंदर आहे. झोपाळ्याच्या सुरेल व सुरेख आठवणी  त्यांनी सांगितल्या आहेत . तशीच एक छान गोष्ट म्हणजे ‘ ओंकारची शेळी ! ‘ खेड्यात रहाणारा ओंकार शेळीसाठी हट्ट करतो, आईच्या सगळ्या अटी पाळून अगदी प्रेमाने शेळीची काळजी घेतो. ती शेळीच त्याच्या शिक्षणाचा आधार बनते. 

अजून एक प्रेरणादायी कथा मांडवावरची वेल ही शीर्षक कथा…. एक नाजुक साजूक वेल, पण जर तिला मांडवाचा घट्ट आधार मिळाला तर ती कशी बहरते, फुलते-फळते हे समजण्यासाठी पुस्तकच वाचायला पाहिजे. 

या कथा संग्रहात एकूण पस्तीस कथा आहेत. सर्व कथांची मांडणी नेटकी असून कथेची गोडी वाढवणारे आहे.

अशा रितीने, अगदी हलक्या फुलक्या पण वाचता वाचता सहज शिक्षण देणाऱ्या या संग्रहातल्या कथा वाचताना वाचकाच्या मनात एक विचार शलाका नक्कीच जागृत करणाऱ्या आहेत.  हा कथासंग्रह  सादर करून डॉ. ज्योती  यांनी आपले अनुभव उत्तम प्रकारे शेअर केले आहेत. त्यांचे हे अनुभव तुम्हीही वाचावेत अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.

परिचय : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈