मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ मनाचा गूढ गाभारा… (मराठी गझल संग्रह) – कवी : अभिजित काळे ☆ परिचय – प्रो. भारती जोगी ☆

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ मनाचा गूढ गाभारा… (मराठी गझल संग्रह) – कवी : अभिजित काळे ☆ परिचय – प्रो. भारती जोगी ☆

कवी : अभिजीत काळे

प्रथम आवृत्ती: नोव्हेंबर २०२३. 

प्रकाशक : गझल पुष्प प्रकाशन

पृष्ठ संख्या :१३२.

मूल्य :२२० रूपये. 

२६ नोव्हेंबर २०२३ ची सकाळ ! पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात लगबग सुरू होती. निमित्त होते गझल पुष्प या गझलप्रेमींच्या संस्थेच्या ५व्या वर्धापन सोहळ्याचे! याच दिवशी या सोहळ्याच्या शिरपेचात, सावळ्या निळाईचं मोरपंखी पीस खोवलं गेलं! अभिजीत काळे, सगळ्यांचा अभिदा… यांच्या १०१ गझला समाविष्ट असलेल्या गझलसंग्रहाचे प्रकाशन मोठ्या थाटात पार पडले. आणि उघडला तो बहुप्रतिक्षित  मनाचा गूढ गाभारा…. मी ही मग त्या गाभार्‍यात प्रवेश करायचं ठरवलं आणि पहिल्यांदा नजर पडली ती संग्रहाच्या मुखपृष्ठावर आणि पुस्तकाच्या शीर्षकावर..

मुखपृष्ठ हे चेहरा असते पुस्तकाचा ! ते पुस्तकाचे व्यक्तीमत्व आणि वेगळेपण घेऊन येते. पुस्तकांतील विचार आणि जाणिवांचा आशय एकवटलेला असतो तिथे! या संग्रहाच्या मुखपृष्ठावरील दिवटीतली तेवणारी ज्योत, तिची आसपास पसरलेली द्युती, तेजोवलय, त्याची आभा, आणि विविध रंगछटा दर्शवणारी त्या ज्योतीभोवतीची प्रभावळ.. सगळंच मन आणि नयन दोन्ही शांतविणारे!! काहीतरी गूढ, अगम्य किंवा अज्ञात, नेणीवेकडून जाणीवेकडे जाणारी वाट दाखविणारे! ते वलय आणि त्यांतल्या विविध रंगछटा, म्हणजे जणू काही… मनातील विचार तरंग, लहरी, ज्या विविध व्यक्ती, प्रसंग, घटना, परिस्थिती यानुरूप आलेले.. प्रवृत्ती, प्रकृती, विकृती आणि संस्कृती चे अनुभव.. यांचेच प्रतिबिंब असावे. कधी दाहक, कधी शीतल, कधी तेजाळलेले, कधी अगम्यत्वाने गूढ!! ही सगळी वाटचाल सुरू झाली ती दिवटीच्या  प्रकाशाच्या साक्षीने आणि मनाचा गाभारा आत्मतेजाने उजळून निघावा या पूर्ततेसाठी!! 

एकेक गझल, तिच्यातले शेर वाचत जावे तसतसे.. डॉ. शिवाजी काळेंनी मलपृष्ठावरील पाठराखणीमध्ये आपल्या शुभेच्छा व्यक्त करतांना लिहिलंयं तसंच.. आपल्याला त्याच्या खयाला मागचा खयाल उमजत जातो, उमगत जातो. आणि कितीतरी वेळा तर तो  खयाल आपल्याच मनातल्या खयालांशी जुळणारा वाटतो. आपल्याच अनुभवांचं प्रतिबिंब त्यात परावर्तित झालेलं वाटतं. आणि मग ती गझल त्याच्या मनातून आपल्या मनात उतरून कधी आपलीच होत, आपलेच मन विचार, अनुभव, जाणीवा लेऊन उभी ठाकते ना… हे कळंतंच नाही!! 

अभिजीतचा एक शेर आहे… 

‘मन ‘कोणाच्या कधी समजले काय मनाचे व्याप जगाला?

मनात उतरायचे दादर ज्ञात कुठे अद्याप जगाला!!! — 

पण तरीही मनाच्या गाभाऱ्यात उतरून गूढ, मन की बात, मनीचं खास गुज जाणून घेण्याचा हा प्रयत्न! 

अभिजीत ने आपल्या गझलांमध्ये..

कधी न जन्म घेतला कधीच मी न संपलो

मना तुझ्या मुळेच मी अनेक रंग रंगलो!

असं म्हणत.. जीवनानुभवांचे अनेक रंग, छटा,शब्दकुंचल्याने रेखाटल्या आहेत. 

मानवी नातेसंबंध, दुरावत चाललेली नाती, वाढत चाललेली दरी, त्यांतून झालेल्या यातना, विरहवेदना, तो बोचणारा सल, आणि त्यातून ही मनाने खचून न जाता, सुचवलेले मार्ग, आणि तटस्थ, स्थिरावलेलं मन.. अतिशय सुंदर शब्द बद्ध केलयं..

एकेक जात असता दु:खांत साथ सोडून,

शोधू कुणा कुणाला राखेत आठवांच्या?

आणि

डोह माझा असे खोल ‘मन’ राखुनी

तळ स्वतः शोधता आवडू लागलो!

असं म्हणत गझलकार अभिदा, नात्यांचं गणित अगदी लीलया सोडवंत सांगतोयं..

प्रेम ज्या नात्यांत नाही, ती खुजी नाती नकोतच

स्निग्धता मैत्रीत ओतू, स्नेह भरली साय निवडू!!

आणि मग हे नातं, हा स्नेह, हे प्रेम वृद्धिंगत व्हावं, तुटलेली नाती जुळावीत म्हणून दाखवलेला मनाचा मोठेपणा, समावेशक वृत्ती ची खोली जाणवेल अशी ही गझल, त्याच्यातील मानवतेच्या संवेदनांची उंची दाखवून देते.., असेच वाटते..

ये माझ्या फांदीवरती, तू घरटे बांध म्हणालो

तुटलेले नाजूक धागे प्रेमाने सांध म्हणालो!!

 ती चं सौंदर्य वर्णन करणारी गझल बघा..

 कसे शब्दांत बांधावे तुझे सौंदर्य मोहकसे?

रूपाच्या पैल ते असणे तुझे मी पाहतो आहे!

यातलं रूपाच्याही पलीकडे असलेलं अंतरंगातील सौंदर्य ज्याला दिसलं तोच खरा द्रष्टा!! शेरातून रूप-अरूप, सगुण-निर्गुण याला स्पर्श केला गेलायं असही दिसतंय! 

पुस्तक वाचन, अक्षरब्रह्माची ओढ, आवड कमी होत चालली आहे, ही खंत अशी व्यक्त झालीये बघा…. 

लिहिणा-यांनो थांबा थोडे पहा सभोती

माणसातला  वाचक बहुधा मरून गेला!!

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणार्‍या आणि स्तुती पाठकांनी केलेल्या स्तुतीने हुरळून जाणार्‍यांना खडा सवाल करीत विचार करायला लावणारा शेर बघा..

कुणी जराशी स्तुती करावी 

आभाळावर चढतो आपण

तसेच,’ मलाच सारे कळते ‘ म्हणतो ..  कुठे स्वतः ला कळतो आपण?

मागे पडत चाललेला गाव आणि गावाकडची माणसं, त्या आठवणी..याची ही आठवण मनाच्या गाभाऱ्यात खोल साठवून ठेवलीये. तिची स्पंदने जाणवणारे.. वानगीदाखल शेर बघा..

वाहून भूक नेते शहराकडे जथा

 गावास आठवंत मग माणूस संपतो

आणखी एक शेर..

 नभाला बाप माय भुई म्हणतो

 घरी जाऊन खूप दिवस झाले!

फक्त दोन ओळीत.. येवढा अर्थ सामावण्याची जादूच केलीयं की प्रत्येक गझलेच्या एकेका शेरात! 

आखर थोरे, अर्थ अमित! असा गागर में सागर भरलायं! या पुस्तकाच्या गझलसागरात, आपण जितक्या वेळा अवग्रहण करू, तळ आणि खोली गाठायचा प्रयत्न, कसोशी करत राहू ना.. तेवढ्या अर्थ भरल्या पाणीदार मोत्यांनी भरलेली ओंजळ घेऊन आपण बाहेर येऊ. 

अभिजीतच्या या मनाच्या गाभाऱ्यातलं गूढ उकलणं सहज सोपं नाही. त्याच्या काही गझलांना अध्यात्माची किनार आहे. त्या अंगानेही त्यांची उंची गाठायचा प्रयत्न करावा लागतो. त्याच्या संग्रहाच्या शीर्षक स्थानी विराजमान झालेले सार्थक शब्द त्याच्या आध्यात्मिक टच चा बाज राखणारेच सिद्ध होतात, तो लिहितो.. 

मनाचा गूढ गाभारा भरावा शून्य शब्दांनी

उगा कां सोंग भक्तीचे धरावे मूढ गात्रांनी!

इंद्रिय सुखाच्या मागे धावून त्याच्या पूर्ततेसाठी केलेली भक्ती त्याला मान्य नाही. त्याला एकांतातली, शब्द विरहित, विचार विरहित, तादात्म्य पावलेली समाधी अवस्था अपेक्षित असावी असे दिसते. 

म्हणूनच त्यानेच एका गझलमध्ये हे गूढ उकललंयं असं वाटत!

शांततेला शब्द हृदयाचा कळावा एकदा

स्पंदनांचा नाद कानी साठवावा एकदा!

याच गझलेत तो लिहितो,

शब्द स्पर्शाने कुणी ओळख कशी घ्यावी तुझी?

नेणिवेला निर्गुणाचा लाभ व्हावा एकदा

मनाच्या गूढ गाभाऱ्यातला हेच ते.. शांततेच्या मौनातलं अनादी तत्व आणि हाच तो अनाहत नाद अपेक्षित असावा गझलकाराला असे वाटते. 

म्हणूनच तो म्हणतोयं..

सावलीच्या आंतला काळोख जाळू या

चल उजेडाचा जरा पाऊस पाडू या!

अशा विविधांगी, अनेकविध विषयानुरूप रूप, रस, रंग आणि अर्थ गंध भरलेल्या विचार रंगछटा आणि त्यांतलं सौंदर्य जाणून घ्यायचे असेल तर मनात उतरायचे दादर उतरून च या गाभार्‍यात प्रवेश करायलाच हवा एकदा, हीच मनिषा! यातल्या प्रत्येक गझलेतला एकेक शेर म्हणजे.. देता किती घेशील दो कराने? असे व्यक्ती परत्वे विविध अर्थ देणारा! शोधा म्हणजे सापडेल!! 

सांगता करतांना.. अभिजीतला पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा आणि आशिर्वाद देते आणि त्याच्याच एका शेरात, मला माऊलींच्या पसायदानाचा स्पर्श भासला, तीच लोकमंगलकारी प्रार्थना जाणवली.. त्या ओळी उद्घृत करते..

पोचली जर प्रार्थना ही ईश्वरा कानी तुझ्या, 

ज्यांस जे काही हवे ते सर्व तू मिळवून दे !! …. 

परिचय – प्रा. भारती जोगी

पुणे

मो ९४२३९४१०२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈