सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ न्यायनिष्ठ रामशास्त्री प्रभुणे… श्री रमाकांत देशपांडे ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव- न्यायनिष्ठ रामशास्त्री प्रभुणे

लेखकाचे नाव- रमाकांत देशपांडे

प्रकाशक- अनिरुद्ध कुलकर्णी, कॉन्टिनेन्टल प्रकाशन

प्रथम आवृत्ती- १ एप्रिल 20 19

किंमत- 450 रुपये.

“स्वामी” या रणजीत देसाई यांच्या कादंबरीतून ‘राम शास्त्री’ यांचे नाव वाचले, ऐकले होते परंतु त्यांच्याविषयी परिपूर्ण माहिती नव्हती. ती या पुस्तकातून चांगली मिळाली.

राम शास्त्री प्रभुणे यांचे गाव सातारा जवळ माहुली हे होते. विश्वनाथ शास्त्री प्रभुणे यांचे ते चिरंजीव होते. लहान असताना त्यांचे वडील गेले. बालपणी अतिशय हूड स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांची आई- पार्वती बाई यांना रामची खूप काळजी वाटत असे. लहानपणी शिक्षण घेण्यात त्यांनी खूप टाळाटाळ केली. त्यामुळे सर्वांच्याकडून बोलणी खावी लागत होती. शेवटी गाव सोडून बाहेर पडले. सातारला आले व तिथून पुढे पुण्यापर्यंत आले. त्यानंतर त्यांनी शिक्षणासाठी काशीला जाण्याचा निर्धार केला. काशीला जाऊन विद्वान पंडित होऊन राम शास्त्री बारा वर्षांनी घरी आले. श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी त्यांना पुणे येथे वेदशास्त्र संपन्न पंडित म्हणून बोलावून घेतले. तेथपर्यंत त्यांचा जीवन प्रवास वाचताना त्यांचा स्वाभिमान, बाणेदारपणा , निर्भीडपणा हे सर्व गुण दिसून येतात. त्यांची बुद्धी कुशाग्र होती. न्यायी वृत्ती आणि चांगल्या गोष्टीसाठी कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याचा स्वभाव हे सर्व कादंबरीकारांनी चांगले रंगवले आहे.

पुणे येथे पेशव्यांच्या दरबारात त्यांचा योग्य तो सन्मान झाला. राम शास्त्रींनी धर्मशास्त्र आणि राजकारण यांची सांगड घालून पेशव्यांच्या दरबारात स्वतःचे स्थान प्रस्थापित केले. नानासाहेबांनंतर श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या दरबारात त्यांनी अतिशय चांगले कार्य करून न्यायासनाची प्रतिष्ठा राखली. त्यांना न्यायदानाचे सखोल ज्ञान होते.  राघोबा दादांनी नारायण रावांचा खून कसा करवला याविषयीचा सर्व तपशील या कादंबरीत वाचावयास मिळतो. स्वतःला न पटणाऱ्या गोष्टींशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. त्यांचा बाणेदार पणा अनेक प्रसंगातून लेखकाने दाखवून दिला आहे. नारायणराव पेशव्यांच्या खुना संदर्भात सर्व पुरावे त्यांनी गोळा केले.आणि त्यानंतर  राघोबा दादांना देहांत प्रायश्चिताची शिक्षा सुनावली. त्यातून त्यांचा निर्भीडपणा दिसून येतो. कादंबरी वाचताना डोळ्यासमोर ते प्रसंग उभे राहतात. ऐतिहासिक कादंबरी लिहिताना सत्य तर हवेच पण रंजक पणा ही  हवा या दोन्ही गोष्टी कादंबरीत दिसून येतात. पुणे, शनिवार वाडा, पेशवाई याविषयीच्या सर्वच गोष्टी मराठी वाचकांना मनाला भावणाऱ्या असतात. त्यामुळे कादंबरी वाचताना आपण कथानकाशी  तद्रुप होऊन जातो.

राम शास्त्री प्रभुणे यांची व्यक्तिरेखा उलगडून दाखवण्यात लेखक अगदी यशस्वी झाले आहे असे या कादंबरी बद्दल मला वाटले!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे, पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments