मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन लघुकथा (भावानुवाद) – श्री कमल चोपड़ा, सुश्री मीरा जैन, श्री राम मूरत ‘राही’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ तीन लघुकथा (भावानुवाद) – श्री कमल चोपड़ा, सुश्री मीरा जैन, श्री राम मूरत ‘राही’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

☆ (१) चूक… ? की बरोबर…?? – श्री कमल चोपडा (२) यात सौदा कसला ?… – सुश्री मीरा जैन  (३) चोरी म्हणजे ??… – श्री राम मूरत ‘राही’ ☆

 

☆ १. चूक… ? की बरोबर…?? (अनुवादित कथा) ☆ श्री कमल चोपडा  ☆

नितीनने एक जोरदार शॉट मारला, आणि बॉल जवळच्या एका उघड्या गटारात जाऊन पडला. आता त्या गटारातून बॉल काढणार कोण ? घाण आणि दुर्गंधीने भरलेलं खोल आणि अगदी घाणेरडं गटार होतं ते. 

चरणू नावाचा एक मुलगा मोठ्या आशेने त्या मुलांचा खेळ बघत बसला होता ….. ती मुलं त्यालाही त्यांच्यात खेळायला बोलावतील म्हणून वाट बघत होता. पण कोणीच त्याला बोलावत नव्हतं. पण आता मात्र नितीनने त्याला हाक मारली.. “ ए मुला, त्या गटारातून आमचा बॉल काढून दे जा … बघ .. त्यासाठी आम्ही तुला एक रुपया देऊ .. आणि आमच्यात खेळायलाही देऊ. “ 

चरणू लालचावला, आणि गटारात उतरण्यासाठी त्याच्या कडेला लटकला. पण अचानक त्याचा हात घसरला आणि तो धपकन आतल्या घाणीत जाऊन पडला. तो धडपडत हात-पाय मारायला लागला.. जणू प्राणांची बाजी लावल्यासारखा. 

बाकीची मुलं कडेला उभं राहून नुसती हसत होती … कधी एकदा तो बॉल काढून आणतोय याची वाट बघत होती. 

“ किती तुच्छ मुलगा आहे ना हा… एक रुपयासाठी या घाणीत उतरलाय ..” 

“ ही गरीब माणसं इतकी हपापलेली असतात ना … एक रुपयाच काय, एका पैशासाठी सुद्धा प्राणही देतील हे “ 

चरणू नेमका त्याचवेळी बाहेर आला होता. डोक्यापासून पायापर्यंत घाणीने बरबटला होता. तोंडालाही सगळी घाण आणि चिखल लागलेला होता. 

“ हा घे एक रुपया, आणि आमचा बॉल आम्हाला दे. “… 

चरणू त्याच्यापुढे अक्षरशः फेकलेल्या त्या एक रुपयाच्या नाण्यावर पाय ठेऊन उभा राहिला, आणि गंभीर होत म्हणाला, “ या एका रुपयासाठी मी इतका मोठा धोका पत्करला नव्हता .. “

 “ मग काय आता शंभर रुपये हवेत की काय तुला ? “ 

“ नाही. पैसे नकोच आहेत मला .. मला खेळायचंय तुमच्याबरोबर … “

त्याची ती काहीतरी जगावेगळी आणि विचित्र इच्छा ऐकून बाकीची मुलं खळखळून हसायला लागली. 

“ साल्या तू आमच्याबरोबर खेळणार ? .. आधी स्वतःची अवस्था बघ कशी झाली आहे ती. असं वाटतंय की एखादं डुक्कर चिखलात मस्त लोळून आलंय …” आणि सगळे आणखीच जोरजोरात हसायला लागले. 

“ हे बघा .. मला खेळायचंय … तुम्ही खेळा आणि मलाही खेळू द्या की … घ्याल ना मला खेळायला ..की  नाही ? “ … चरणूने जरा आवाज वाढवत विचारलं. 

“ तुला सांगितलं ना एकदा… आमचा बॉल आम्हाला दे आणि तू लगेच निघून जा इथून … नाहीतर ..” नितीन चिडून म्हणाला. 

“ नाहीतर काय ?.. “ आणि चरणूने जणू जीवाची बाजी लावून तो बॉल ज्या घाणेरड्या खोल गटारातून काढून आणला होता, त्याच गटारात सगळी ताकद एकवटून पुन्हा जोराने फेकून दिला. आणि … 

“ आता बघतोच तुम्ही तरी कसे खेळता ते … “ असं म्हणत एका वेगळ्याच निर्धाराने तो तिथून निघून गेला. 

……… 

मूळ हिंदी कथा : खेलने दो  

कथाकार : श्री कमल चोपडा, दिल्ली 

भावानुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे  

२. यात सौदा कसला ?… (अनुवादित कथा) ☆ सुश्री मीरा जैन ☆

पाच वर्षांची मुक्ता आज सारखी आत-बाहेर आत-बाहेर करत होती. बहुतेक कुणी तरी येण्याची वाट पाहात होती. मध्येच वरच्या खोलीत जात होती – परत खाली येत होती. गॅलरीत जाऊन लांबवर बघून येणं तर सारखंच चाललं होतं. अचानक झोपाळ्यावर बसून मोठाले झोके घेत होती ….. पण असं सगळं करत असतांना तिचं सगळं लक्ष मात्र बाहेरच्या दाराकडे होतं. इतक्यात तिला तिच्या आजीची हाक ऐकू आली … 

“ मुक्ता .. पटकन ये बाळा, नाश्ता करून घे . आज तुझ्या आवडीचा शिरा केलाय बघ.. आज अजून भूक कशी लागली नाहीये माझ्या छकुलीला .. “ 

“ आजी थांब ना जरा. अजून भूक लागलीच नाही आहे गं मला “.. 

…. इतक्यात दारात टॅक्सी थांबल्याचा आवाज आला… आणि मुक्ता पळतच दाराकडे गेली. नीता – तिची आई एकदाची तिला दिसली आणि नीताने दारातून आत पाऊल टाकल्याक्षणी ती जाऊन नीताला बिलगली. नीतानेही तिला छातीशी घट्ट कवटाळलं आणि पटापट तिचे मुके घेतले. दोघींच्याही डोळ्यातून आसवांच्या धारा वहात होत्या…. कितीतरी वेळ दोघी तशाच उभ्या होत्या. जराशाने रडतरडतच मुक्ता तिला म्हणाली .. 

“ आई आता मला सोडून तू कुठेही जायचं नाहीस हं .. “ नीताने पुन्हा तिला घट्ट मिठी मारली, आणि जणू सगळा आत्मविश्वास एकवटून तिला अगदी ठामपणे सांगितलं … “ नाही बाळा.. नाहीच जाणार .. आता तुला सोडून नाही.. तर तुला माझ्याबरोबर घेऊनच जाणार आहे परत.. “ 

तिची आईही तोपर्यंत तिथे आली होती. तिचं बोलणं ऐकून ती आश्चर्यचकित झाली होती. न रहावून तिने विचारलं … “ नीता अगं हे काय करते आहेस तू ? ते लोक कधीच मुक्ताचा स्वीकार करणार नाहीत हे चांगलंच ठाऊक आहे तुला .. तुझ्याकडून तसं आधीच कबूलही करून घेतलंय ना त्यांनी … तरीही … ? “

“ हो, ठरलं होतं तसं .. पण आई तूच सांग … एखाद्या पूर्णपणे परक्या मुलाची मी आई होऊ शकते … केवळ त्याच्या वडलांशी मी पुनर्विवाह केलाय म्हणून.. आणि अगदी मनापासून तसा प्रयत्नही करते आहे ना मी. पण म्हणून..  मी जिला जन्म दिलाय त्या माझ्या स्वतःच्या मुलीला मी माझ्यापासून दूर लोटावं … तिला कायमचं विसरून जावं अशी अपेक्षा करणं चुकीचंच आहे …. मला ते पटणारही नाही.. आणि जमणार तर मुळीच नाही … अगं मी पुन्हा लग्न केलं आहे… याचा अर्थ एखादा सौदा नाही केलाय… माझ्या ममतेचा… माझ्या पोटाच्या गोळ्याचा. …आणि आई, सगळ्यांनीच समजून घ्यायला हवं हे.  चल मुक्ता.. “… 

मूळ हिंदी कथा : पतझड बसंत  

कथाकार : सुश्री मीरा जैन, उज्जैन

भावानुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे  

☆ ३. चोरी म्हणजे ??… (अनुवादित कथा) श्री राम मूरत ‘राही’

मी आणि बायको दर्शन घेऊन देवळातून बाहेर पडलो. पाहिलं तर बाहेर ठेवलेल्या बायकोच्या चपला कुठेच दिसत नव्हत्या. काल-परवाच घेतलेल्या नव्याकोऱ्या चपला होत्या त्या. साहजिकच आम्ही जरा जास्तच अस्वस्थपणे त्या शोधू लागलो. तेवढ्यात मला अगदी गरीब वाटणारा एक पाच -सहा वर्षांचा मुलगा हातात माझ्या बायकोच्या चपला घेऊन जातांना दिसला. 

मी पटापटा चालत त्याच्याजवळ गेलो आणि त्याला थांबवून विचारलं.. “ बाळा या चपला घेऊन कुठे चालला आहेस तू ?” — त्याचा कोवळा निरागस चेहेरा पाहून मी रागावू शकलोच नाही त्याच्यावर. 

“ घरी चाललोय. “ – तो म्हणाला. 

“ ही चप्पल कुठून आणलीस तू ? “

“ देवळाच्या बाहेर ठेवलेली होती – तिथून. “

“ बाळा पण ही चप्पल घेऊन काय करणार तू ? “

“ माझ्या आईला देणार … “

“ आईला देणार ? का ? “

“ कारण माझ्या आईकडे चपला नाही आहेत ना …. आम्ही खूप गरीब आहोत .. “

“ पण बाळा ही तर चोरी झाली ना ? “ 

“ चोरी ?.. चोरी म्हणजे काय असतं ? “

“ अरे एखाद्याला न विचारता त्याची एखादी वस्तू घेऊन टाकायची याला चोरी करणे म्हणतात.. आणि ही अगदी चुकीची आणि वाईट गोष्ट आहे. “ 

“ मला तर हे माहितीच नव्हतं “ … तो मुलगा विचार करायला लागला… आणि मग एकदम वळून देवळाकडे जायला लागला. मी त्याला थांबवलं आणि विचारलं .. . “ कुठे निघालास रे .. “

“ देवळात “.

“ का “. 

“ चपला ठेवायला “

“ राहू दे बाळा. आता या चपला तू तुझ्या आईला नेऊन दे … जा “. 

“ पण या तर चोरीच्या आहेत ना ? “

“ अरे आता या चोरीच्या नाहीयेत “. 

“ म्हणजे ? … ते कसं काय ? ‘

“ कारण या आमच्या चपला आहेत, आणि आम्ही तुला त्या घेऊन जाण्याची परवानगी देतोय. “

… हे ऐकून त्या मुलाला फार आनंद झाला होता हे त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होतं … तो धावतच तिथून निघून गेला. 

लगेचच माझी बायको माझ्यासमोर येऊन उभी राहिली आणि रागानेच म्हणाली .. “ अहो काय तुम्ही …. सरळ माझ्या चपला नेऊ कशा काय दिल्यात त्याला ? “

“ अगं तो त्याच्या आईसाठी घेऊन चालला होता.. म्हटलं ने. तुझ्यासाठी दुसऱ्या घेऊ ना आपण “… 

यावर बायकोने त्याच रागाने मान उडवली. 

मग मी तिला शांतपणे म्हटलं …. “ एक गोष्ट लक्षात आली नाही का तुझ्या … अगं त्या लहानग्याला आपण तिथल्या चपला उचलतोय म्हणजे “ चोरी “ करतोय…. काहीतरी वाईट काम करतोय .. हे सुद्धा कळत नव्हतं. “ चोरी म्हणजे काय “ हे इतक्या निरागसपणे विचारलं ना त्याने… आणि ते समजल्यावर चपला परत ठेवायला निघाला होता तो… पाहिलंस ना ?  आता पुन्हा कधी तो असा वागणार नाही बघ …. खात्री वाटतेय मला “ ….. 

मूळ हिंदी कथा : मां के लिये – कथाकार : श्री राम मूरत ‘राही’

भावानुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈