श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ सुपरहिरो – त्यांचा आणि त्याचे… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆ 

आज गोरेगाव, मुंबईच्या सन्मित्र शाळेचे १९८६ च्या दहावीच्या बॅचचे सगळेजण खुशीत होते. फारा दिवसांनी आज त्यांचं नाशिकला गेट टुगेदर होतं. व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेजा-मेसेजी व्हायची नियमितपणे, पण प्रत्यक्ष भेटीचा आनंदच काही आगळा.

बऱ्याच जणांच्या विशेष खुशीचं कारणही तसंच विशेष होतं – आज त्यांचा सुपरहिरो त्यांना प्रत्यक्ष भेटणार होता – सुनील लुकतुके, डेप्युटी कलेक्टर – त्यांचा वर्गमित्र, आजच्या गेट टुगेदरला येणार होता.

त्याला भेटणं म्हणजे बौद्धिक मेजवानी असायची. सर्वसामान्य मध्यमवर्गातला मुलगा, मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतलेला, कोणतेही ट्युशन – क्लासेस न लावता, आपल्या मेहनतीने राज्य सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला होता आणि टप्प्याटप्प्याने बढती घेत आज डेप्युटी कलेक्टर पदावर विराजमान झाला होता. आपल्या कर्तृत्वाने, निर्भीड, निस्पृह वागण्याने त्याच्या नावाचा डंका सर्वत्र गाजत होता आणि शाळामित्र – वर्गमित्र या नात्याने आपोआपच या सगळ्यांची कॉलर ताठ होत होती.

आजही तो लाल दिव्याची सरकारी गाडी न आणता, सगळ्यांबरोबर ग्रुपने केलेल्या बसने मुंबईहून नाशिकपर्यंत आला होता. गाण्याच्या भेंड्या, नकला – सगळ्या सगळ्यामध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणे तो सहभागी होत होता, खळखळून हसत होता, रुसत होता, फुरंगटत होता, मज्जा करत होता.

सर्व मित्र मैत्रिणींना स्वतःच्याच भाग्याचा हेवा वाटत होता. एवढा मोठा माणूस, पण कोणतीही शेखी न मिरवता चारचौघांप्रमाणे सगळ्यांच्यात मिसळत होता – जणू अजून सगळेच जण शाळकरी होते.

पण त्यांना कल्पना नव्हती की त्या सगळ्या मित्रमैत्रिणींइतकाच, किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्त खुश स्वतः सुनील होता. आणि यामागचं त्याचं कारण होतं की त्याचे सुपरहिरो त्याला आज प्रत्यक्ष भेटत होते.

वर्गातल्या अनेक जणांशी तो फोनवरून संपर्कात होता, काहीजण व्हॉट्सॲपमुळे संपर्कात होते. आणि यातूनच त्याच्या सुपर हिरोंचे विविध पैलू त्याला उमगत होते.

तो विनी फडणीसला भेटला होता. तिचा पहिला मुलगा normal होता, पण धाकटी मात्र स्पेशल चाइल्ड होती. विनीचं कौतुक हे होतं की ना तिनं “माझ्याच नशिबी हे का” म्हणून कधी दैवाला बोल लावला ना तिनं एकाकडे लक्ष देताना दुसऱ्याकडे दुर्लक्ष केलं. आज तिचा मुलगा तर कॉलेजात व्यवस्थित शिकत आहेच आणि तिची मुलगी भरतनाट्यम आणि स्विमिंगमध्ये, ती शिकत असलेल्या संस्थेला भारंभार सुवर्णपदकं मिळवून देत आहे. ज्यांची मुलं अशी शैक्षणिक दृष्ट्या challenged आहेत अशा पालकांना समुपदेशन करण्यासाठी विनीला त्यांच्याच सन्मित्र शाळेने नुकतेच बोलावले होते.

किशोर सरोदे हा त्याचा दुसरा हिरो. त्याचा मुलगा आता तेरा चौदा वर्षांचा आहे. आज सगळे स्पर्धात्मक युगात आपापल्या मुलांवर अभ्यास, tuitions या सगळ्यांची भारंभार ओझी लादत असताना, या पठ्ठ्याने मात्र लॉन टेनिसमध्ये प्राविण्य दाखवणाऱ्या आपल्या मुलाची शाळा बंद केली होती. त्याचा मुलगा – राघव आता पूर्णवेळ टेनिस खेळतो आणि आईवडिलांना विम्बल्डनच्या vip stand मध्ये बसवून सामना दाखवण्याचं स्वप्न उरी बाळगून आहे. आज राघव under 14 वयोगटात all India level च्या साठाव्या रँकिंगला पोचला आहे.

स्वतः इंजिनीयर असूनही, मुलाचे कौशल्य आणि मेहनत घेण्याची तयारी बघून एवढा मोठा निर्णय घेणारा किशोर सुनीलला स्तिमित करत होता.

स्वामी समर्थांवर निस्सीम श्रद्धा असलेली सुनंदा गोडबोले त्याला आज कित्येक वर्षांनी भेटत होती. तिचा नवरा पोलीस हवालदार होता. दारू पिऊन बायकोला मारहाण करणं हा त्याचा आवडता टाईमपास. आणि त्याच्या या छंदात त्याची आई आणि भाऊ सक्रिय सहभागी. माहेरची अति गरीबी असल्याने सुनंदाचे परतीचे दोर केव्हाच कापले गेले होते. पण सासरच्यांकडून इतका छळ होऊनही सुनंदा खचली नव्हती.

निरलस सेवा करून जेव्हा तिनं आजारपणात खितपत पडलेल्या सासूचे प्राण वाचवले, अपघातानंतर सेवा सुश्रुषा करून दिरांना शब्दशः आपल्या पायावर उभं केलं आणि नवरा नोकरीतून सस्पेंड झाल्यावर तिच्या पोळीभाजी केंद्राने जेव्हा घर चालवलं, तेव्हा कुठे तिच्या सासरच्यांचे डोळे उघडले आणि ती आता सन्मानानं सासरी रहात होती.

वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी कर्करोगाचे निदान झाल्यावरही न खचणारा आणि करोना काळात नवरा बायको एकाच वेळी icu त असूनही निराश न होणारा प्रति टॉम क्रुझ मनिष …

विमान कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने नोकरी गमावलेला, नंतर करोनामुळे घरी बसावे लागलेला, पण अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतही आपली सदाबहार विनोदबुद्धी कायम राखणारा हिमांशू …

सुनीलच्या स्वतःच्या जडणघडणीमध्ये, शाळेत असताना त्याचा अभ्यास घेण्यापासून त्याच्या आईची महत्त्वाची भूमिका होती. आज त्याच्या अनेक वर्गमैत्रिणी स्वतः करीअर करण्याची संधी व पात्रता असूनही मुलांना यशस्वी करण्यासाठी पूर्ण वेळ गृहिणी झाल्या होत्या आणि आपापल्या परीने सुनीलच्या आईची भूमिका निभावत होत्या.

बाकी मित्र मैत्रिणींपैकी कोणी सायबर गुन्हे तज्ञ, कोणी योगगुरू झाले होते. कोणी शरीराला प्रमाणबद्ध करणारा – वळण लावणारा बॉडी बिल्डर, तर कोणी मनाला वळण लावणारे शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, कीर्तनकार, कोणी डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाऊंटंट, उद्योगपती, आर्मी ऑफिसर, आणि या सगळ्यांचे रुसवे फुगवे सांभाळत, क्वचित कधी डोळे वटारून पण बरेचदा प्रेमाने सांगून – समजावून – चुचकारून सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा all rounder निलेश … सुपर हिरोंची ही यादी न संपणारी होती.

त्याची बायको त्याला नेहमी विचारायची – “तुझे शाळा सोबती तुझे सुपर हिरो का आहेत ?” आणि त्याचं नेहमी उत्तर असायचं की “हे एका साध्यासुध्या सुनीलचे मित्र आहेत, लाल दिव्याच्या गाडीत फिरणाऱ्या सुनीलचे मतलबी, फायद्यासाठी झालेले तोंडदेखले मित्र नव्हेत. शाळा कॉलेजात लौकिक अर्थाने त्यांना कदाचित कमी गुण असतील, पण आयुष्याच्या परीक्षेत ते त्याच्याइतकेच, किंबहुना कांकणभर जास्तच यशस्वी होते.

ते आर्थिक दृष्ट्या किती यशस्वी झाले, त्यांचं नाव –  मानमरातब किती आहे हे त्याच्या लेखी महत्त्वाचं नव्हतं. पण त्यांची झुंजार सकारात्मक वृत्ती त्याला प्रेरणादायक होती.

गुरू ठाकूरने

“असे जगावे छाताडावर

आव्हानाचे लावून अत्तर,

नजर रोखुनी नजरेमध्ये

आयुष्याला द्यावे उत्तर”

ही कविता जणू या दोस्तमंडळींना बघून, अनुभवून आणि उद्देशून लिहिली होती आणि म्हणूनच ते सगळेच त्याचे सुपरहिरो होते, आहेत आणि राहतीलही.

आजच्या गेट टुगेदरच्या दिवशी, सगळेच जण आपापल्या सुपर हिरोंना भेटून जाम खुश होते.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments