मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रुजणं… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ रुजणं… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆ 

“अग सुरू जरा खाली येतेस का..?ताजं लोणचं देते तुला.. लवकर ये पण, मला देवळात जायचं आहे गं..” असं म्हणत साने आजी घराच्याबागेतून आत गेल्या…   

गॅलरीतली सुरू नवरोबा कडे वळून म्हणाली, “अहो जाऊ ना.. माझी फारशी ओळख नाही म्हणून म्हंटलं…”

त्यावर हसत अवि म्हणाला, “जा जा, फार चवदार पदार्थ असतात आजींच्या हातचे.. आणि तेवढ्याच मायेने देतात देखील. अगं आपलं लग्न ठरलं तश्या मला चिडवत होत्या ‘आता आजीने पाठवलेले पदार्थ आळणी लागतील’, अग आईला देखील बरेच पदार्थ त्यांनी शिकवले….जा बिनधास्त खुप काही शिकवणारं व्यक्तिमत्त्व आहे सानेआजी..”

सुरू आजीच्या दाराजवळ आली तर तिथेच तिला एकदम प्रसन्न वाटलं…. छोटी तुळस.. दारात रांगोळी, दरवाज्याला तोरण… तिने बेल दाबली तश्या लगबगत आजी आल्या.. बुटक्याश्या आजी मस्त गुलाबी कॉटनचे पातळ.. पांढऱ्या शुभ्र केसांचा छोटासा अंबाडा, त्यात मोगऱ्याचं फुल, एका हातात घड्याळ… अगदी गोड हसणाऱ्या आजी.. तोंडात कवळीच असावी पण ती देखील त्यांना अगदी शोभत होती..

फ्लॅट वन बीएचकेच होता आणि मागची थोडी बागेची जागा.. सगळं न्याहाळत सुरू बैठकीत बसली… ‘आपला फ्लॅट मोठा असुन प्रसन्न नाही, आजीच्या घरात किती छान वाटतंय’ ती विचार करत होती तेवढ्यात आजी थंड पन्ह घेऊन आल्या… 

काहीतरी बोलावं म्हणुन सुरू म्हणाली, “महिना झाला लग्नाला पण माझं जास्त खाली उतरणंच झालं नाही. आई आजारी आहेत त्यामुळे जरा जास्तच काम पडलंय…”

खरंतर अगदी बरोबर खालचा फ्लॅट असल्याने आजीला सगळा आवाज स्पष्ट येत होता… ह्या नव्या नवरीला सासूच्या तब्येतीची सगळी माहिती देऊनच लग्न ठरलं होतं.. अवि इतका हुशार, देखणा, पण तरिही ‘माझ्या आईची सेवा करायला जी तयार होईल तिच्याशीच लग्न करणार’ असं त्याने ठरवलं होतं…

सुरू तशी फार शिकलेली नव्हती. दिसायला ठिकठाक आणि घरी गरिबी, त्यामुळे त्यांनी चटकन हे स्थळ स्वीकारलं.. कॅन्सरमुळे सासु सहा महिने जगणं तसं कठिण ह्याची कल्पना दिलीच होती.. तरी पण सुरुचा आवाज जरा जास्तच वरच्या पट्टीत लागत होता हे साने आजींनी बरोबर हेरलं.. म्हणून आज हे बोलावणं… 

आजी सुरुला म्हणाल्या, “चल तुला बाग दाखवते..” 

बागेत जातांना मागच्या खोलीत कुणीतरी पलंगावर तिला दिसलं. “कोण झोपलं आहे आत??” सुरुने विचारताच आजी म्हणाल्या, “माझ्या सासुबाई, नव्वद वर्षाच्या आहेत.. फक्त तोंड सुरू आहे, बाकी सगळं जागेवर..” 

हे सांगत असतांना आतुन आवाज आला.. “कोण गं, सुरू आली का..?इकडे आण तिला..” सुरुने साने आजीकडे आश्चर्याने बघितलं.. 

साने आजी हसून म्हणाल्या, “अगं, आमच्या दोघींमध्ये संवाद हा सगळा भोवतालचा असतो… कोणाकडे सुन आली..? कोणाला लेकरू झालं..? कोणाला नोकरी?? कोण गावाला गेलं ?? अश्या सगळ्या गप्पात तू त्यांना माहीत आहेस, आणि मघाशी हाक मारली तेंव्हा ऐकली की त्यांनी…”

दोघी खोलीत गेल्या.. पलंगावरच्या पांढऱ्या शुभ्र चादरीवर त्या सासुबाई झोपलेल्या होत्या. अगदी प्रसन्न, स्वच्छ छान मंद कापुराचा सुवास दरवळत होता.. पलीकडे सानेआजीचा दिवाण, त्यावर दोन जप माळ, बाजुला दासबोध…

साने आजीने सासुबाईला मानेत हात घालून पाणी पाजलं.. लगेच बाजुच्या रुमालाने तोंड पुसलं.. सासुबाईंनी सुरुला बसायची खुण केली.. हे सगळं बघून सुरुला आपण किती रागारागाने सासूबाईंच करतो हे जाणवलं..

सासुबाई म्हणाल्या, “सुरू, आजारपण कोणाला आवडत नसतं, पण ते वाट्याला आल्यावर त्याचं दुःख जास्त तेंव्हा वाटतं जेंव्हा आपलेच आपला त्रागा करायला लागतात..”

सुरूला जरा अंदाज आला, बहुतेक आपलं सासुशी वाद घालणं ऐकू येत असावं.. आणि मनातून जाणवलं, आपण खरंच त्या मानाने काहीच नीट करत नाही सासुबाईचं. तेवढ्यात साने आजी म्हणाल्या, “तिला आपली बाग दाखवते हं आई.. चल गं..”

दोघी मागे आल्या.. गर्द आंब्याच्या सावलीत खुर्चीत बसवत साने आजी म्हणाल्या.. “हे बघ, हा आंबा सासुबाईंनी माझ्या हाताने लग्नानंतर लावला.. आणि मला सांगितलं ‘तुझा संसार म्हणजे हे झाड.. जशी काळजी घेशील तसं बहरेल,.. रोज प्रेमाचं पाणी झाडाला आणि संसाराला गरजेचं आहे.. त्याभोवती कचरा, दगड, गोटे येतच राहणार, जसे आपल्या संसारात येणाऱ्या अडचणी, न पटणारी माणसं… पण त्यांना तिथेच पडू द्यायचं नाही, त्यांचंच प्रेमाने उचलुन आळं करायचं भोवताली.. मग बघ, मधल्या पाण्याची ओल त्यांनाही लागते… तेही मग झाडाचं रक्षणच करतात. तसंच नात्याचं आळं करायचं आपल्या आयुष्यात, कामीच येतं गं… आणि हो, त्या झाडाला सारखं येता जाता गोंजारायचं, ते तुझ्यासारख्या नव्या नवरीच्या भुमिकेत असतं ना… पण फार दिवस नाही, कारण एकदा का ते रुजलं कि बघ, आज बहर तुझ्या समोर आहे.. आज नशिबाने आम्ही दोघीच राहलोय सोबतीला.. त्या आजारी आणि माझी सत्तरी.. त्या नव्वदिला असल्या तरी माझ्याशिवाय जेवत नाहीत. 

नात्यांचा मोहर कायम टिकवावा लागतो. त्यासाठी प्रेमाचं पाणी घालायला विसरायचं नाही.. मला वाटतं तुला कळलं असेल मला काय म्हणायचं आहे.. चल हे रोपटं लाव पलीकडे आणि रोज येऊन तू बघायचं त्याला रुजेपर्यंत…”

सुरुने मनापासून रोप लावलं.. घरात येत आजींनी बरणी तिच्या हातात ठेवली.. “बघ हे रुजणं मनातुन झालं कि असं स्वादिष्ट लोणचं आपोआप तयार होतं..”

सुरू घरी आली.. सगळा संवाद तिच्या मनात रुंजी घालत होता.. तिची भूमिकाच बदलून गेली.. आठवडाभरात वरून येणारे सुरूचे आवाज बंद झाले.. साने आजीला सासुबाई म्हणाल्या.. “रुजणं सुरू झालं वाटतं पोरीचं..”

आज आईला घेऊन दवाखान्यातुन घरी जाताना अविने पायऱ्यांवरून मुद्दाम जोरात हाक मारून सांगितलं, “आजी डॉक्टर म्हणाले, आईची प्रकृती सुधारत आहे.. बहुतेक तुम्ही लावलेलं आंब्याचं झाड रुजायला लागलं बरं का…. चांगले विचार घालुन दिलेले लोणचं फारच मुरेल असं दिसतंय…”

“छान छान…” म्हणून आजी आतूनच ओरडल्या आणि खुदुखुदु हसत त्यांनी सासुबाईंना टाळी दिली.. दरवाज्यातून रुजेललं ते रोपटं वाऱ्यावर आनंदाने हलत होतं.. तिथे ह्या दोघींना सुरूचा चेहरा दिसला.

 © सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

मो +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈