मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अप्पर हाफ – लेखक – श्री रविकिरण संत ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर  ☆

? जीवनरंग ❤️

 अप्पर हाफलेखक – श्री रविकिरण संत संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर 

मी नुकताच NTC च्या एका काॅटन मिलमधे ‘सुपरवायझर’ ह्या पोझीशनवर लागलो होतो. गेटच्या आत कंपाऊंडमधे एका व्यक्तीचा अर्धपुतळा लावलेला होता.

खूप दिवसांनी मिलमधे माझ्यासारखा पंचविशीतला इंजिनीअर आला असावा. कारण बहूतेक जण अर्ध्या वयाचे दिसत होते. पहिल्याच दिवशी लंच अवरला मला तेथील सिनीअर्स कडून असे सांगण्यात आले की कामाचे टेन्शन घ्यायचे नाही. ही सरकारी कापड गिरणी आहे. इथे वेळेवर येवून पोहचणे हेच मुख्य काम. ‘ब्राइट करियर’ वगैरे गोड कल्पना तुझ्या डोक्यात असतील तर ही मिल तुझ्यासाठी नाही. आम्ही इथे जेवण झाल्यावर रोज तासभर डोळे मिटून आराम करतो.

मग त्यातील एक सिनीअर  उत्साहाने सांगू लागले, ” तो गेट जवळचा पुतळा पाहिलास ना, ते काशीराम बंकाजी आहेत. त्यांचा मृत्यू १९४८ साली वयाच्या ५९ व्या वर्षी झाला. त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीला आम्ही कामगारांनी पैसे गोळा करून सुप्रसिद्ध शिल्पकार व्ही.पी.करमरकर यांच्याकडून त्यांचा अर्धपुतळा त्यावेळी चाळीस हजार रुपयात बनवून घेतला आणि समारंभपूर्वक तो सिनेकलाकार अशोककुमार यांच्या हस्ते स्थापन केला.”

” पुतळ्यासाठी कामगारांनी पैसे ऊभे केले म्हणता, म्हणजे कामगारांसाठी त्यांनी खूप काही केले असणार!” मी म्हणालो.

” खूपच केले. माझे वय आज ५७ आहे. मी १९४१ साली मॅट्रिक होवून वयाच्या १८ व्या वर्षी इथे सुपरवायझर पोस्टवर नोकरीला लागलो. त्यावेळी ही कंपनी ‘बंका काॅटन मिल्स’ या नावाने प्रसिद्ध होती. मिलमधे २१०० कामगार होते. मालक काशीराम बंका ‘काॅटन किंग’ म्हणून हिंदुस्थानात प्रसिद्धी पावले होते.”

” सन १९०० च्या पहिल्या दशकात राजस्थानातून मुंबईत आले तेव्हा बंकाजी फक्त १६ वर्षांचे होते. ते अतिशय मेहनती, हुशार आणि मुत्सद्दी होते. त्यावेळी सर्व महत्वाचे व्यवसाय ब्रिटीश कंपन्यांच्या हातात होते. बंकाजींनी मुंबईत काॅटन ट्रेडिंगचा व्यवसाय सूरू केला. पुढच्या पाच वर्षांत त्यांच्या ‘काशीराम बंका काॅटन ट्रेडर्स’ कंपनीला ब्रिटीश सरकारच्या काॅटन काॅन्ट्रॅक्ट बोर्डाची मेंबरशीप मिळाली जो बोर्ड पुढे East India cotton association चा मेंबर झाला.”

” बंकाजी एवढ्यावर थांबले नाहीत. ते भपकेबाज रोल्स राॅइस गाडी वापरीत. पुढे ते Indian merchant’s chamber चे अध्यक्ष झाले. १९३५ साली त्यांना New York cotton exchange ची प्रेस्टीजीअस मेंबरशीप मिळाली, जी भारतीय माणसाला अपवादानेच मिळायची. ती त्यांच्या मृत्युपर्यंत कायम होती. मुंबईच्या स्टाॅक एक्सचेंजचे ते फाउंडर मेंबर होते. त्यावेळी ब्रिटन आणि अमेरिकेत काॅपर, शुगर, व्हीट एक्स्चेंजेस होती. त्या सर्व ठिकाणी बंकाजींनी आपल्या प्रेझन्सने दबदबा निर्माण केला.”

“बंकाजी हयात असेपर्यंत आमच्या मिलच्या लायब्ररीत New York Times येत असे. त्यात वाचलेल्या आर्टीकल्समधे त्यांच्या बिझनेस प्रोजेक्शन्सकडे पाश्चिमात्य पत्रकार भितीयुक्त आदराने पाहात  असल्याचे जाणवायचे. ते कोणते शेअर्स विकत घेतात किंवा विकतात यावरून मार्केटमधे चलबिचल व्हायची.”

“१९२० साली बंकाजींनी टेक्स्टाईल मिल काढण्यासाठी ही तीनशे एकराची प्रशस्त जागा घेतली. मिलचे बांधकाम तीन वर्षांत पूर्ण झाले. त्यातील चाळीस एकरात निवासासाठी चाळी, शिक्षणासाठी शाळा आणि एक हाॅस्पिटल बांधण्यात आले. ह्या तिन्ही गोष्टी कामगारांसाठी विनामूल्य होत्या. मग ब्रिटनहून मशिनरी मागवण्यात आली आणि १९२५ साली ही मिल सूरू झाली.”

” फक्त आमचीच मिल तेव्हा वर्षांतून दोनदा बोनस द्यायची. एक दिवाळीत तर दूसरा जूनच्या १ तारखेला.”

“१ जूनच का?”

” कारण १३ जूनच्या आसपास शाळा सूरू व्हायच्या. तेव्हा मुलांची पुस्तके, वह्या, युनिफॉर्म, बूट, दप्तरे, छत्र्या ह्यासाठीच्या खर्चाची ती सोय असे. बंकाजी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खूप आग्रही होते. मॅट्रिक झालेल्या प्रत्येक मुलाला त्यांच्याकडे नोकरीची ऑफर असे. तसेच हवी असल्यास उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळे.”

” बंकाजी खरोखर देवमाणूस होते.” मी भारावून म्हणालो.

” …आणि हा देवमाणूस अतिशय प्रामाणिक होता. त्यावेळचे श्रीमंत  लोक गांजा, मदिरा आणि मदिराक्षी यांच्या सहाय्याने आपले शौक पूर्ण करायचे. पण बंकाजींना त्यांच्या आईने सोळाव्या वर्षी मुंबईला पाठवताना ‘गांजा आणि मदिरेपासून तू दूर रहाशील’ अशी शपथ घातली होती. मग त्या देवतूल्य आईच्या शपथेनुसार बंकाजी आयुष्यभर तसेच वागले.

मिलचा चार एकर भाग त्यांनी उंच भिंत घालून वेगळा केला. त्यात एक टूमदार हवेली बांधली. तळमजल्यावर पार्टी हाॅल, किचन व पहिल्या मजल्यावर चार प्रशस्त बेडरूम्स बनवल्या. हवेली समोर दोन एकरात छोटा कृत्रीम तलाव बांधला. त्यात खास काश्मीरहून आणलेला शिकारा ठेवला. दूपारी ते मिलच्या ऑफिसातून हवेलीत जेवायला जात. आवडीची भरीत- भाकरी खाल्ल्यावर ते शिकार्यात वामकुक्षी घेत. त्यावेळी त्यांच्यासोबत दोन युरोपीयन मुली नावेत असत.

” उंच भिंती पलिकडचे हे कसे काय तूम्हाला दिसायसे?” माझा प्रश्न.

“आमच्या स्पिनिंग डिपार्टमेंटच्या तिसर्या मजल्यावरच्या एका खिडकीतून आम्ही हे चोरून बघत असू. त्यातली एक मुलगी त्यांचे पाय चेपत असायची तर दुसरी नाव वल्हवत असे. दर शनिवार, रविवार हवेलीवर संध्याकाळी पार्टी असे. त्यांत मी त्या काळातल्या सर्व नटनट्यांना भेटलो.”

” ते कसे काय?” मला आश्चर्याचे धक्के बसत होते.

” त्याची गंमतच झाली. मी नाशिकच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’ मधून १९४१ ला मॅट्रिक झालो ज्याचे  १९४३ ला पुढे नाव बदलून ‘जे.एस. रूंगठा’ हायस्कूल झाले. आठवी ते अकरावी आम्हाला इंग्रजी विषय शिकवायला थॉमस लेन नावाचे ब्रिटीश शिक्षक होते. ते अतिशय सुंदर शिकवत. तिथल्या चार वर्षांच्या अध्यापनानंतर सर्व मुले छान इंग्रजी बोलत असत.”

“त्यावेळेस बंका काॅटन मिल्स मधे केलेल्या नोकरीच्या अर्जात उत्तम बोलता येणार्या भाषेंत मी इंग्रजी, मराठी आणि हिंदी असा उल्लेख केला होता. म्हणून माझा इंटरव्हू घ्यायचे काम जेम्स स्टूअर्ट नावाच्या ब्रिटीश स्पिनिंग मास्तरना दिले गेले. त्यांनी मला नाशिकला कुणाकडे, किती वर्षे इंग्रजी शिकलो असे विचारले. तसेच इथे मुंबईत कुणाकडे राहिला आहेस असे विचारले.

मी सर्व प्रश्नांची उत्तरे सफाईदार इंग्रजीत दिली. त्यानंतर मला बंकाजींच्या केबिनमधे पाठवण्यात आले.

बंकाजी म्हणाले,” तुला मिलमधे सुपरवायझरची नोकरी देतो पण दर शनिवार आणि रविवार तुझी हवेलीत ड्यूटी असेल.

” सर तिथे मी काय करायचे?”

मी नम्रपणे विचारले.

” त्या दोन्ही दिवशी बर्याच  विदेशी पाहुण्यांचा राबता असतो. त्यांना काय हवे नको ते बघायचे.”

अशा रितीने माझा हवेलीत प्रवेश झाला.

हवेलीतल्या पार्ट्यांना कधी हिंदी फिल्म इंडस्ट्रीतल्या नटनट्या यायच्या तर कधी ब्रिटीश पदाधिकारी! त्यांत गांजा, चरस, मदिरा, तर्‍हेतर्‍हेचे मांसाहार ह्यांची रेलचेल असे. बंकाजी स्वतः ह्यातील कशालाही स्पर्श करत नसत. कारण त्यांच्या आईच्या शपथेने त्यांना बांधलेले होते.

मात्र पार्टी पुर्ण भरात आल्यावर  हळूच एखाद्या नटीबरोबर ते पहिल्या मजल्यावरच्या खोलीत काही काळासाठी गडप होत!  राजस्थानच्या छोट्या गावात आयुष्य काढलेल्या त्यांच्या माऊलीला मदिराक्षी हा प्रकार ठाऊक नसावा, म्हणून तिच्या शपथेत हा एक मुद्दा राहून गेला!

मला ती १९४२ सालची बंकाजींची बर्थ डे पार्टी अजून आठवतेय. एकीकडे भारतात गांधीजींचे “छोडो भारत” अभियान गाजत होते तर दुसरीकडे बंकाजींचे “आवो भारत” अभियान!

” दुसर्या महायुद्धाच्या दरम्यान जगातल्या चित्रपट उद्योगावर मंदीचे सावट आले होते. बंकाजींनी त्यांच्या वाढदिवसाला हाॅलिवूडच्या ‘मर्ले ओबराॅन’ या नटीला आमंत्रित केले होते.”

” ही तिच का जी ‘द डार्क एन्जल’ या गाजलेल्या चित्रपटातील जबरदस्त भूमिकेबद्दल अकॅडेमी अवाॅर्डसाठी नाॅमिनेट झाली होती?”

मी विचारले.

” तिच ती! ती इथे चार दिवस होती. एके दिवशी पार्टी चालू असताना रात्री साडेअकराच्या सुमारास ‘प्लीज अलाऊ मी टू गेट फ्रेशन अप’ असे बंकाजींना सांगून ती वरच्या मजल्याचा जीना चढू लागली. मला तिने मागून येण्याची खूण केली. मी मागोमाग तिच्या बेडरूमच्या दारापर्यंत गेलो.

” प्लीज गेट मी अ पॅक ऑफ कंडोम !” तिने मला विनंती केली.

मी काहीच न उमगुन तिच्याकडे पहात राहिलो.

तिने तेच वाक्य परत एकदा म्हटले, तरी माझ्या डोक्यात प्रकाश पडेना. हा शब्द ना कधी लेन सरांनी सांगितला होता ना डिक्शनरीत पाहिला होता! मी तसाच बावळटासारखा उभा राहिलो.

” नो वंडर यू पिपल हॅव सो मेनी चिल्ड्रेन.” असे म्हणून तिने धाड्कन दरवाजा बंद केला.

“मग जिना उतरत असताना मला थोडाफार अंदाज आला की हे असे काहीतरी उपकरण असावे जे मुले रोखून धरते. पण ते भारतात मिळत नसणार ह्याची मला खात्री वाटली. असे वाटण्याचे कारण बंकाजींच्या सतत बदलत्या युरोपियन सेविका! जेव्हा एखाद्या सेविकेचे पोट थोडे वाढे तेव्हा तिची रवानगी मायदेशात होई!”

बंकाजींचा असा सर्व कामेतिहास त्यांच्याकडून ऐकल्यावर मला काय रिॲक्ट व्हावे हे सुचेना.

” मग अशा माणसाचा पुतळा गेटवर लावून कसली प्रेरणा मिळणार ?” मी थोडे चिडून विचारले.

” ह्या माणसाने डोके वापरून कसा जगात दबदबा निर्माण केला, डोळ्यांनी कसे कामगारांचे दैन्य पाहिले, कान वापरून कशी त्यांची गाऱ्हाणी ऐकली आणि मग दोन्ही हातांनी कसे भरभरून दान दिले हे आम्ही पाहिले. कामगारांच्या ह्रदयात त्यांनी कायमचे स्थान मिळवले त्या प्रीत्यर्थ त्यांचा हा अर्धपुतळा बसवला गेला. त्यांचा कमरेखालचा हिस्सा आमच्या खिजगणतीतच नाही. समर्थांनी म्हटलेच आहे,

जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे l

जनी वंद्य ते सर्व भावे करावे ll

मग मीही मनोमन त्यांना हात जोडले.

 – समाप्त –

लेखक – श्री रविकिरण संत

साल १९७९

संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈