मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अ.ल.क.  … श्री प्रदीप आवटे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ अ.ल.क.  … श्री प्रदीप आवटे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे 

काही अलक 

 

१.  आपणच राखले नाही ईमान

    आणि वर म्हणालो, ऋतू बेईमान झाले.

    तसं असतं तर, रस्त्यावरच्या अमलताशने चैत्र आल्याची बातमी

    सगळ्यात आधी कशी सांगितली असती?

****

२.  तुला झाडाचे नाव नाही ठाऊक

     पण झाडाला माहीत आहेत, 

     तुझे ऋतू, तुझे सण, तुझे उत्सव !

     म्हणून तर हिरव्या पोपटी पानांची गुढी

    त्याने कधीची उभारली आहे…… आणि.. 

    त्याच्या अनोळखी फुलांचा बहर वाहून नेणाऱ्या वाऱ्याने, 

    व्हायरल केली आहे बातमी …… 

    वसंत आल्याची !

****

३. झाडांना काढाव्या वाटत नाहीत मिरवणुका, 

    वाजवावे वाटत नाहीत ढोल ताशे, 

    ती फक्त आतून आतून पालवतात

   आणि शांत उभी राहतात कोसळणाऱ्या उन्हात

   एखाद्या तपस्व्यासारखी !

   वसंताच्या इशाऱ्यावर वाहत राहते …. 

   सर्जनाची गंधभारीत वरात

   त्यांच्या धमन्यातून..!

****

४. कर्णकर्कश्य खणखणाटाशिवाय

    तुला व्यक्त करता येत नाही, तुझा आनंद. 

    झाडाला मात्र पुरुन उरते .. किलबिल पाखरांची

   आणि आनंदविभोर खार खेळत राहते झाडाच्या अंगाखांद्यावर.

   मुळे वाहून आणतात मातीमायचे सत्व त्यांच्या रक्तवाहिन्यापर्यंत…

   कळ्यांच्या हळव्या नाजूक देठापर्यंत !

 

     तुला असे उमलता येत नाही खोल आतून

    …. म्हणूनच तुला फुले येत नाहीत. 

****

५.  झाडं कधीच नसतात ‘खतरे में ‘…. दुसऱ्या झाडांमुळे.

     झाडांना नीट असते ठावे प्रत्येक झाडाचा हक्क असतो .. मातीच्या प्रत्येक कणावर!

     मातीतून उगवणारे आणि त्याच मातीत मिसळणारे प्रत्येक झाड

     समृध्द करत असते माती.. मातीशी एकजीव होता होता..!

     आणि तू .. अवघी पृथ्वी काबीज करण्याच्या नादात, 

     स्वतःच्याच मुळांवर घाव घालणारा शेखचिल्ली आहेस तू, 

     झाडांना भीती वाटते फक्त तुझ्या ‘गोतास काळ ‘ कुऱ्हाडीची !

****

लेखक : श्री प्रदीप आवटे

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈