मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘हद्द…’ – भाग – 2 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘हद्द…’ – भाग – 2 ☆  श्री आनंदहरी  ☆ 

तो बाहेरुन आल्यावर त्याला तात्या येऊन धीर देऊन , ‘ काहीअडलं -नडलं सांगा ‘ असं सांगून गेल्याचे समजलं, तेंव्हा तो उफाळून म्हणाला,

” काही नको त्यांची मदत आपल्याला. तशीच वेळ आली तर विष खाऊन जीव देऊ पण त्यांच्या दारात जाणार नाही. “

‘ काहिही झाले तरी त्यांच्या दारात जायचे नाही ‘ असे त्याने आईला तसेच निक्षून सांगितले होते.

चारच दिवसांनी तो आपल्या वडिलांच्या वयाच्या असणाऱ्या तात्यांच्या अंगावर धावून गेला होता.  साधे फुले तोडण्याचे कारण घेऊन. त्यावेळी तात्या त्याला समजुतीने सांगत होते पण  त्याने त्यांचे काहीही ऐकून न घेता, त्याच्या हद्दीतील फुलझाडाची चार फुले तोडली म्हणून त्यांच्या हातातील फुलांची परडी हिसकावून घेऊन त्यातील सारी फुले पायदळी तुडवली होती. तात्या त्यावरही काहीच न बोलता निमूटपणे त्यांच्या घरात परतले होते.  त्याची मात्र स्वतःच्या दारात उभा राहून शिव्यां-शापांची लाखोली वहात बडबड चालू होती.

तात्यांची दोन्ही मुले त्याच्याबरोबरीचीच. तशीच गरम डोक्याची. ती नोकरीनिमित्त मुंबईला होती. ती तिथं असती तर भांडण हमरीतुमरीवर  यायला कितीसा वेळ लागणार होता?  त्याच्या आईने त्याला त्यावेळीही समजवण्याचा प्रयत्न केला होता पण उपयोग झाला नव्हता.

पिढी-दर-पिढी चाललेल्या त्यांच्या हद्दीच्या वादात खरे कुणाचे होते, कुणास ठाऊक ? प्रत्येकाला आपलीच बाजू बरोबर आहे, खरी आहे, योग्य आहे असे वाटत होते. दुसरा आपल्या मालकीच्या जाग्यावर अतिक्रमण करतोय असे वाटत होते आणि तेच मत पुढच्या पिढीत संक्रमित होत होते.. अगदी वारसा हक्काने !

रोहिणी नक्षत्रात पाऊस चांगला झाला होता. भाताची खाचरे भरून गेली होती. विहिरीचे पाणी उपसून खाचरात आणण्याची आवश्यकता नव्हती.प्रत्येकाने निसर्गाच्या, पावसाच्या कृपेचा फायदा घेत, भाताची लावण अगदी वेळेवर केली होती. मृग सरला, आर्द्रा सरल्या पण पुनर्वसू नक्षत्र लागले तेच मुळात वेगळे वातावरण घेऊन. पावसाने संततधार धरली.वादळी वारे वाहू लागले.त्या वादळी वाऱ्याने कितीतरी मोठमोठाली झाडे उन्मळून धारातीर्थी पडली होती. पुनर्वसू नक्षत्रात असा पाऊस, असे वादळी वारे नसते असे म्हातारी माणसे म्हणत होती.पण निसर्गाला काय झाले होते काय की..?  तो जणू बेभान झाला होता, बेफाम झाला होता. ‘निसर्गाचा प्रकोप का काय म्हणतात, तोच झाला असावा. आपण काय करतोय याची त्याला जाणीवच नसावी.’ असे हे निसर्गाचे रूप पाहून सारे अवाक झाले होते, सारे भयभीत झाले होते, सगळेच हवालदिल झाले होते. गावात, परिसरात ,कितीतरी कुटुंबांच्या डोक्यावरचे छत वादळाने उडून जाऊन ती कुटुंबे उघड्यावर आली होती. कुणी देवळाचा आसरा घेतला होता कुणी शाळेचा.  निसर्गाचा हा कहर पाहून पक्क्या घरात राहणाऱ्यांच्या मनातही भीती जागली होती. ‘ ही अमावस्या पार पडेपर्यंत काही खरं नाही.. ‘ म्हातारी-कोतारी माणसे मनाशीच पुटपुटत होती.. एकमेकांशी बोलत होती,  कुटुंबातील सदस्यांना सांगत होती.

अमावस्येच्या दिवशी तर वादळ-वाऱ्याने, पावसाने कहरच मांडला होता. आठवडाभर लाईटही गेलेले होते. रात्र अगदी मुंगीच्या पावलाने सरकत होती. मध्यरात्र उलटून गेली असावी आणि कसल्याशा आवाजाने तात्यांना जाग आली. पुन्हा काहीतरी धाडs धाड ss असा कोसळल्यासारखा मोठा आवाज आला. तात्यांनी उशाची बॅटरी घेतली आणि घरातच सभोवतार फिरवली आणि ते उठले.  तात्यांची बायकोही आवाजाने दचकून भिऊन जागी झाली होती.

” कसला .. कसला आवाज झाला हो ?”

तिने घाबरूनच तात्यांना विचारले.

” काहीतरी पडल्यासारखा आवाज वाटतोय. पावसाने नीट ऐकू आला नाही पण काहीतरी पडले असणार.. तसा मोठा आवाज झाला. बघतो बाहेर जाऊन..”

” अहो, नको. नका जाऊ बाहेर..”

                                  क्रमशः...

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈