मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्वयंप्रकाशी रवी… भाग – १… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? जीवनरंग ❤️

☆ स्वयंप्रकाशी रवी… भाग – १… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

काल संध्याकाळची शिफ्ट संपवून घरी जात असताना ऑफिस बसमधून उतरलो आणि अचानक पावसाची सर आली. सर ओसरायची वाट बघत मी इथेच पुलाखाली थांबलो. रात्री पाऊण एकची वेळ. इतक्यात कानावर आवाज पडला…

“ सर, ओळखलं का? ”

“…. नाही ”

“आता??” त्याने चेहऱ्यावरचा मास्क खाली घेतला. फार तर वीस बावीस वय असेल.

“सॉरी, पण नाही आठवत आहे”

“कुर्ला स्टेशन?? कसाऱ्याचं लोकल तिकीट??”

“ओह ओके ओके.. आत्ता आठवलं ”

दोन वर्षांपूर्वी पहिला कडक लॉकडाऊन लागला होता, तेव्हा लोकल प्रवास फक्त अत्यावश्यक सेवांपुरता मर्यादित होता. कुर्ला स्टेशनवर मी तिकिटासाठी रांगेत उभा असताना हा मुलगा माझ्याजवळ येऊन “ सर, प्लिज एक तिकीट काढून द्याल का?? कसारा पर्यन्त. प्लिज सर प्लिज, अर्जंट आहे, आई आजारी आहे ” असं कळवळून म्हणाला होता. मुलगा खरं बोलतोय असं वाटत होतं, आणि शिवाय पैसेही मागत नाहीये.. तिकीटच मागतोय, म्हटल्यावर मीही त्याला माझ्या ओळखपत्रावर लोकलचं तिकीट काढून दिलं होतं. आज तो दोन अडीच वर्षांनी असा अचानक भेटलेला.

“ तू इथे कसा?”

“आलो होतो सर एका कामासाठी, आता घरी जात होतो. पाऊस आला म्हणून थांबलो ”

“हम्म.. पाऊस कधीही पडतोय या वर्षी ”

“ हो ना..”

पुढची काही सेकंद शांततेत गेली..

“ कसाऱ्याला राहतोस का तू? आता घरी कसं जाणार? ”

“ माझं गाव आहे सर तिकडे. स्टेशनपासून तीस किलोमीटरवर ”

“अच्छा.. आई बरी आहे का आता?” पावसाची सर ओसरेपर्यंत मी संभाषण वाढवायचा प्रयत्न केला.

“ ती गेली साहेब ”

“ओह..” मला ओशाळल्यासारखं झालं.

“ म्हणजे मागच्या वेळेला आपण भेटलो त्यानंतर बरी होती. आता सहा महिन्यापूर्वी वारली ”

“ओह….आणि हे बाळ तुझं आहे का?” त्याच्या हातात तीन-चार महिन्यांच मूल होतं.

“ हे?? माझंच म्हणा आता ” तो बाळाकडे बघत बोलला.

“ म्हणजे?? ”

“ म्हणजे आहे तसं बहिणीचं आहे. चौदाव्या वर्षी लग्न लागलेलं तिचं. चार महिन्यातच पोटुशी राहिली. सातव्या महिन्यात डिलिव्हरी. डिलिव्हरीच्या वेळी बहीण गेली . ही पोर तेवढी वाचली. मुलाच्या दुसऱ्या लग्नात अडचण नको म्हणून मुलाकडच्यानी जबाबदारी नाकारली. आमची आई जिवंत असती तर तिने बघितलं असतं हिच्याकडे. आता ती पण नाही. आणि दुसरं कोणीच नाही जवळचं ”– क्रिकेट मॅचचे हायलाईट्स सांगावे तशी तो त्याच्या आयुष्याची गोष्ट सांगत होता.

“मग आता हिला घेऊन इथे कुठे राहतो?”

“इथेच पुढे, धारावीजवळ. भाड्याने घेतलीय खोली”

“काय करतो आणि?”

“जिथे राहतोय तिथेच दोन खोल्या सोडून एक इमिटेशन ज्वेलरीचा कारखाना आहे. त्याच्याकडे काम करतो”

“अच्छा… शिकलाय किती तू?”

“एम ए पार्ट वन ला आहे सर, हिस्ट्री.. डिस्टन्स मधून..”

“अरे मग चांगली नोकरी का नाही बघत? ही असली मजुरीची कामं का करतोय?” मला कौतुक वाटलं.

“इथं पगार कमी आहे पण हिच्याकडे बघता येतं साहेब. मी सगळं मटेरियल खोलीवर आणून काम करत बसतो. या पोरीकडे पण लक्ष राहतं मग.”

“तुझं अख्ख आयुष्य बाकी आहे अजून..” मला थेट बोलायची हिम्मत होत नव्हती.

“हो साहेब, मागे एकदा ही पोर रात्रभर रडली होती. खूप राग आलेला मला. कंटाळून सकाळी एका अनाथ आश्रमात घेऊन गेलो होतो. पण गेटवरूनच मागे फिरलो सर. नाही हिम्मत झाली..” तो निग्रहाने सांगत होता सगळं.

“हम्म.. इथे काय काम मग?”

आता तो थोडा वरमल्यासारखा वाटला. इकडे तिकडे बघत मग बोलला,

“ ती हिरव्या रंगाच्या साडीत बाई बसलीय बघा ” पूलाखाली उघड्यावर संसार थाटलेल्या एका बाईकडे नजर करत तो बोलला, “ तिच्याकडे दूध पाजायला आणतो हिला ”

जेमतेम विशीच्या मुलाला अकाली आलेलं, उसनं पालकत्व बघून मी आधीच भारावून गेलो होतो, तेवढ्यात त्याने हा नवीन बॉम्ब टाकला..

“दूध पाजायला म्हणजे..??” कसाऱ्याच्या कुठल्याशा आदिवासी पाड्यातला मुलगा, धारावीत भाड्याने राहतो आणि चार महिन्याच्या बाळाला दूध पाजायला पार्ला-अंधेरीत येतो.. रात्री एक वाजता?? मला कळत नव्हतं काय बोलू..

“जेमतेम चार महिन्यांची आहे ही.. दूध लागतंच ना लहान जीवाला ”

“ तू मिल्क बँकबद्दल ऐकलय का कधी?? आई नसलेल्या बाळांना…..”

“ दूध मिळतं साहेब तिकडे. आईची छाती नाही मिळत.”

माझं वाक्य मधेच तोडलं त्याने– “ एरवी ही पोर पिशवीतल्या दुधावर दिवसभर राहते. पण कधीकधी रात्री भरल्या पोटाचीसुद्धा इतकी रडते की काय करू कळत नाही. नुसत्या दुधाने पोट नाही भरत सर ”

“ हम्म..खरंय.. पण त्या बाईला कसं काय ओळखतो तू??” खरं तर मला पुढे काय बोलू हेच कळत नव्हतं. पण उत्सुकता सुद्धा तितकीच वाढलेली होती .

—क्रमशः भाग पहिला 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈