मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दादांचे नर्सिंग होम ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

? जीवनरंग ?

☆ दादांचे नर्सिंग होम ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे)

” आक्के किती प्रकारचे नाष्टे बनवती गं? खाणारी तोंड तरी नक्की किती? “

“अगं काय सांगू, खाणारी तोंड दहा बाराच आहेत. पण प्रत्येकाच्या निराळ्या तऱ्हा. बरं त्यांना या वयात या अवस्थेत नाही म्हणायला मला नाही आवडत. म्हणून करते जमेल तसं. हे बघ ए तायडे, हे नर्सिंग होम तुझ्या दादांनी जरी उभारले असले तरी याला आईची माया या आक्केने लावली आहे. लोकांना उगा वाटते, दादांच्या औषधाने पेशंट बरे होतात म्हणून. तो हातगुण या आक्केचा आहे.”

” आक्के एवढा हातगुण आहे तर, तू का नाही डॉक्टरी शिकली? “

” शिकले असते हो, पण मला तुझ्या आई वडिलांसारखे आईवडील नाही ना लाभले. मी लहान असताना आईवडील  पाठोपाठ गेले. दादा वहिनींनी पोटच्या पोराप्रमाणे वाढविले. पण हे ओझे ते तरी किती वागवणार? वयात आले आणि दिले लग्न लावून. पण तुझ्या दादांच्या रूपाने देव भेटला बघ मला.”

” हो का? मग तुझ्या या देवाने का नाही तुझे शिक्षण पूर्ण केले?”

“अगं सगळ्यांच्या नशिबी का कर्वे येतात? पण दादांनी मला कमी मात्र काही पडू दिले नाही एवढे नक्की. शेवटी सरकारी डॉक्टराच्या पदरी किती नी काय पडणार. पण जेवढे त्यांच्या पदरी पडले तेवढे निमूटपणे गोळा करून माझ्या ओंजळीत ठेवले. कधी पैशाचाही हिशेब विचारला नाही बघ.”

“आक्के पाठीमागे दादांचे एवढे कौतुक करते आणि समोर आले की व्हस व्हस करते.”

” का नको करू? अगं निवृत्ती मिळाली, म्हटले आता करतील थोडा आराम. या वयात तरी मिळेल निवांतपणा. पण कसले काय? जेवढे पैसे मिळाले तेवढे पैसे गुंतवून हे नर्सिंग होम उभारले. ना दागिना ना कपडा. वर म्हणे, समाजाने दिलेले समाजासाठी वापरले.”

” पण अनुदान मिळाले ना गं नर्सिंग होमला?”

” कसले अनुदान गं, चार स्वयंसेवी संस्था मदत करतायत म्हणून चाललेय बघ सगळे. मागे कोणाच्या सांगण्यावरून केला होता अर्ज. पण पुढे जाऊन कोणाशी बोलायला नको का? दोन खेपा घालायला नको का? कसले काय, सरकारकडून मिळाले तेवढेच खूप आहे, आणखी काही नको असे म्हणत बसले घरी.”

” पेशंटचे नातेवाईक तरी …

” अगं दवाखान्याला पैसा उरला नाही की, टाकतात आणून इथे. वर परत मागे वळून बघणे नाही. कितीदा तर दादांनी फोन करून बोलावले, तरी येत नाहीत. मग सांभाळतो आम्हीच दोघे.”

” आणि मी येते ते अधूनमधून ? “

” कोण तू? माहेरवाशीण म्हणून येतेस आणि माझी कामे वाढवतेस.”

” असे गं काय आक्का. बाकी तुझ्या तोंडून हे सारे ऐकायला भारी वाटते. तुझ्या नी दादांच्या संसाराची शाहिरीच जणू.”

” हं झाडावर नको चढवायला. तुझ्या आवडीचे पोहे केले आहेत. अगदी तुला आवडतात तसे साखर, लिंबू, खोबरे, कोथींबीर सगळे घालून. खा गरम गरम आणि कर आराम आत जाऊन.”

लेखक : म. ना. दे.

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

+९१ ८९७५३ १२०५९ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈