मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रखमाचं काय झालं ? – भाग-3 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ रखमाचं काय झालं ? – भाग-3 ☆ श्री आनंदहरी 

सदा दिवसभर पायाला भिंगरी लावल्यासारखा रखमाचा शोध घेत फिरत होता.. सगळ्या पाहुण्या-पै कडे,  परिचितांकडे चौकशी करून झाली.. रखमाच्या माहेरी चौकशी करताच तिची आई आणि भाऊ लगोलग घरी आले होते.  फिरून फिरून दमला – भागलेला सदा हताश होऊन घरी परतला तेव्हा दारात सगळी गल्ली गोळा झालेली होती.. प्रत्येकजण दुसऱ्याजवळ  कुजबुजत होता.. सदाने दारात पाऊल टाकले तशी त्याची सासु रडत ओरडत त्याच्याकडे धावली.. ‘ या मुडद्यानंच माझ्या लेकीचं कायतरी बरं वाईट केलं असणार.. माझी गुणाची ती लेक.. ह्येनं.. ह्येनंच मारली असणार तिला.. ‘  बायजा तिला अडवायला, थांबवायला  पुढे सरसावली तोवर रखमाचा भाऊ पुढं झाला होता आणि त्याने आईला थोपवायचे सोडून तिचीच वाक्ये म्हणत सदाला बडवायला सुरवात केली होती.. सदा आधीच रखमाच्या अचानक गायब होण्याने गांगरून गेला होता.. त्याला नेमकं कोण काय म्हणतेय ते ही समजत नव्हते.. या अचानक हल्ल्याने  तो पुरता गोंधळून गेला होता.. बायजाने सदाच्या सासूला मागे ओढली.. गल्लीतलेच कुणीतरी मध्ये पडून रखमाच्या भावाला सदापासून दूर नेऊन सदाची सुटका केली होती.

” काय बोलतायसा पावनीबाय ? त्यो कशाला करील आसं ?.. अवो, त्यो गेलावता रातपाळीला.. सकाळच्या पारी घरला आला तवा त्येला समाजलं.. रखमा न्हाई ती. “

बायजा रखमाच्या आईची समजूत काढू लागली होती. वातावरण एकदमच बिघडून गेलं होते.. बाहेर चर्चेला वेगवेगळे धुमारे फुटायला लागले होते. लोकांना चघळायला आणखी एक विषय मिळाला होता..

 ” व्हय रे सदाने मारली आसंल रखमाला ? मला तर  ही काय पटत न्हाय बाबा ..”

 ” तेच्यात न पटण्याजोगं काय हाय ? “

 ” आरे, सदा गरीब हाय.. मुंगीबी मारायचा न्हाय कवा.. आन वाईच सदाकडं बग तरी… रखमा सकाळधरनं न्हाय तर पार कोलमडून गेलाय ? “

” आरं, ही समदं दाखवायचं दात असत्यात..  आरं, रखमीची आयच म्हंतीया.. भाव बी म्हंतुय म्हंजी कायतरीं आतली धुसफूस ठावं असणारच त्यासनी.. उगा कोनबी जावाय पावण्याला असे म्हनल का चार लोकांत..? “

” आरं पर त्यो तर रातपाळीला कामाव हुता न्हवका  ? “

” आरं तकडं हजरीं लावून मदनंच येऊन मारलं आसंल..बॉडी कुटंतरी दिली आसंल टाकून..आन गेला आसंल पुन्यांदा कामाव.. आरं, पोलीसांस्नी अशी लय घावल्यात.. कामाव असूनबी खून केल्याली..मी तर म्हंतो,  तसंच असणार .. न्हायतर मला सांगा सदा आजूनबी पोलिसात का ग्येला न्हाई ? “

” आरं, पर कशापायी मारंल त्यो ? कवा भांडान बी न्हाई ऐकू आले तेच्यातलं.. आरं, त्येंचा तर लय जीव हुता एकमेकाव.. छया s छयाss उगा आसलं कायबी बोलण्यात अर्थ न्हाय..”

रखमा गेली कुठं ? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकजण आपापल्या मनानुसार आखाडे बांधून शोधत होता.. आपल्याला वाटतंय तेच खरं आहे असे वाटून दुसऱ्याला ठासून सांगून पटवण्याचा प्रयत्न करत होता.. तेच वाक्य मीठ-मिरची लावून एकाकडून दुसऱ्याकडे जात होते..  चर्चेचे, अंदाजांचे, अफवांचे पेव फुटले होते. त्यातल्या कुणालाच रखमाच्या जाण्याचे दुःख नव्हते की सदाबद्दल, त्याच्या लेकराबद्दल दया, आपुलकी नव्हती.  सदाची सासरची मंडळी पण तशीच.. सदाला दोष देऊन रिकामी झाली होती.. सदा हताश झाला होता.. फक्त बायजा म्हातारी एकीकडे पोराला सांभाळत होती.. दुसरीकडे सदाला धीर देत होती.. त्याच्या पाठीशी खंबीर उभी होती.. रात्र झाली तरी रखमाचा पत्ता नव्हता..ती आलीही नव्हती आणि तिचा कुठे मागमूसही लागला नव्हता.. सदा पार कोलमडून गेला होता.. नेमके काय झाले असावे..? काहीच समजत नव्हते. तर्क-वितर्क सुरूच होते.. निरागस पोर दूध पिऊन झोपले होते. सदा शून्यात नजर लावून बसून होता.. बायजाने आग्रह करूनही त्याने दोन घास खाल्ले नव्हते.  थकलेली बायजा तिथंच पोराजवळ कलंडली पण मनात प्रश्न खदखदत होते..’रखमा अशी अचानक गायब कशी आणि का झाली असेल ? तिच्याबाबतीत नेमकं काय झाले असावे ? ती कुठं असेल ? कशी असेल ? तिला कुणी कशी आणि का नेली आसंल ?’

क्रमशः ….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈