मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चौकट ☆ सौ.प्रियदर्शिनी तगारे

सौ. प्रियदर्शिनी तगारे

☆ जीवनरंग ☆ चौकट ☆ सौ.प्रियदर्शिनी तगारे ☆ 

उषा शाळेतून बाहेर पडली तेव्हां दोन वाजायला आले होते. ऊन रणरणत होतं. तशी शाळा घरापासून जवळच होती. पण आज तिला थकल्यासारखं वाटत होतं

तीन वर्षांपूर्वी ती नोकरीला लागली. शाळा म्हणजे बालवाडीच होती. पगारही बेताचाच होता पण तिथं तिचा वेळ चांगला जात होता. आता दोन्ही मुली मोठ्या झाल्या होत्या मोठीचं तर लग्नही झालं होतं. धाकटी नोकरीला लागली होती. त्यातून अरूण घरी नेहमी उशीरा येत असे.उषाला घर खायला उठू लागलं. तिच्या मनानं उचल खाल्ली. अधूनमधून भाजीला जाताना तिनं ती शाळा पाहिली होती. एक दिवस धाडस करुन ती आत गेली.आणि नोकरीसाठी अर्ज देऊन आली. आश्र्चर्य म्हणजे महिन्याभरात नोकरी मिळूनही गेली. शाळेत  बायकांबरोबर ती रमली. एकमैकींच्या सुखदु:खात त्या वाटेकरी झाल्या.

विचारांच्या नादात उषा घरी पोहोचली. फ्लॅटचं कुलूप काढून आत जाताच बरं वाटलं. हातपाय धुवून तिनं ताट वाढून घेतलं. पण जेवावसं वाटेना.सारखा सुमाचा चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला. रोज दोघी शेजारी बसत.गेले काही दिवस सुमा अस्वस्थ होती. आज द़ोघीच असताना उषा तिला म्हणाली ” सुमा,काही होतंय का गं?”

” छे! गं , कुठं काय?”

उषा तिच्या पाठीवर हात ठेवत बोलली, “तू नेहमी सारखी वाटत नाहीस. चेहरा बघ किती उतरलाय तुझा .”

त्यासरशी सुमा हुंदके देत रडायला लागली. तिनं जे सांगितलं ते ऐकून उषाला धक्काच बसला. सुमाच्या नवऱ्यानं दुसऱ्या एका बाईशी लग्न केलं होतं. आणि सुमाला सरळ घराबाहेर काढलं होतं. तात्पुरती ती एका नातेवाईकांकडे रहात होती. पण पुढे काय हा प्रश्र्न आहे वासून उभा होता. कोर्टात जाण्याएवढं आर्थिक आणि मानसिक बळही नव्हतं.

आता जेवताना उषाला ते सारं आठवत होतं. अरुणनं आपल्यालाही असंच घराबाहेर जा म्हणलं तर असा विचार मनात येऊन ती हादरली. गेली काही वर्षं अरुण अलिप्तपणे वागतोय असं तिला सतत वाटत होतं. एकदा धाडस करून तिनं त्याच्या आॅफिसात महिन्यापूर्वी चौकशी केली. आॅफिसमधल्याच एका अविवाहितेसोबत …….सारा प्रकार कळताच उषाच्या डोक्याला झिणझिण्या आल्या. अरुणला याबाबत जाब विचारण्यासाठी ती संधीची वाट बघत होतो.पण आज सुमाची हकिगत ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली. अरुणला जाब विचारला आणि तो घराबाहेर जा म्हणला तर कुठं जाणार आपण!बाहेरचं सगळं वखवखलेलं जग अंगावर येईल.या घरात केव्हढी सुरक्षितता आहे.संसाराच्या या सुरक्षित चौकटीसाठी किती बायका असे अन्याय निमूटपणे सोसत असतील. आणि तीही आता सोसत राहणार आहे.उषानं असह्हायपणे डोकं टेबलावर टेकून अश्रुंना वाट करुन दिली.

© सौ.प्रियदर्शिनी तगारे

© सौ.प्रियदर्शिनी तगारे≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈