मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बॅलन्सशीट – भाग – २ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ बॅलन्सशीट – भाग – २ ☆ डॉ. शैलजा करोडे

(तसेच कपनीच्या काही ठेवींवरील व्याज, कर्मचार्‍यांना व इतर उपकंपन्यांन्या दिलेल्या कर्जावरील व्याज पाहाता रिझर्व्ह व सरप्लस रेशो समाधानकारक वाटला. चला हे ही काम झाले हातावेगळे. मला खरंच खूप मोकळं वाटलं.) – इथून पुढे –

“माई , खूप काम आहे काय गं तुझ्याकडे. चेहरा बघ किती कोमेजलाय तुझा.” 

“काही नाही गं आई. आहेत नेहमीची कामं. बाकी काही नाही.” 

“माझीही खूप सेवा करावी लागते तुला.” 

“अगं तुझ्या सेवेचा त्रास नाही होत मला. तू कशाला काळजी करतेस. बघ कशी ठणठणीत आहे मी. तू झोप आता.” मी आईच्या अंगावर पांघरुण घातले.

चला आता रात्रीच्या प्रशांतवेळी प्रसन्ना सिल्क मीलच्या बॅलन्सशीटचं काम उरकविण्यासाठी मी लॅपटाॅप हाती घेतला. यांच्या बॅलन्सशीटमध्ये मला कॅपिटल वर्क इन प्रोसेस, इन्व्हेन्टरी आणि व्यापारप्राप्तीचा दिलासा वाटला. मीलच्या इमारतीचे वाढीव बांधकाम होत होते, तसेच साठवलेला कच्चा माल, अर्धवट प्रक्रिया झालेला कच्चा माल, पूर्ण झालेला पण विक्री बाकी असलेला माल, यातून बराच फायदा होणार होता. कंपनीने काही दीर्घकालीन तरतूदीही केलेल्या होत्या. मी माझे विश्लेषण पूर्ण केले आणि निद्रेच्या कुशीत शिरले.

प्रथमेश रि रोलिंगचा बॅलन्सशीट अहवाल मात्र मी चांगला नाही देऊ शकले. कंपनीने वेळोवेळी अल्पकालीन व दीर्घकालीन तरतूदी वापरल्या होत्या. व्यापारी देयकेही भरपूर होती आणि इतर बर्‍याच लायबिलीटीझमुळे मी ते नाकारलं.

“निलीमा, अभिनंदन. आज विभागीय कार्यालयातून तुमच्यासाठी अभिनंदनपर लेटर आलं आहे. तुमच्या कामाचा गौरव करण्यात आलाय. लेटस् सेलिब्रेट. आज एक छोटीशी पार्टी आपल्या स्टाफलाही देऊया.”

आजपर्यंत मी अनेक बॅलन्सशीटचं काम केलं होतं, टॅली केलं होतं, पण आयुष्याचं बॅलन्सशीट, ते मात्र मी नाही टॅली करू शकले. आयुष्यभर मी प्रत्येकाला देतच राहिले, खूप देयके भरली. पण ॲसेटस् नाही मिळवू शकले. मी खूप चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न केला म्हणून माझ्या वाटेला चांगलं येईलच हा विश्वास फोल ठरला होता. कारण इतर घटक परिणाम करणारे होते. कधी घर, कधी समाज, आपले म्हणणारा मित्र गोतावळाही, कधी रूढी, कधी परंपराचा गुंता, हा चक्रव्यूह तोडणे जमलेच नाही.

जीवनाच्या ताळेबंदात आर्थिक स्थितीला फारसे महत्व नसते, कारण पैसा सर्वस्व नाही, तर माणूस किती आनंदी आहे आणि किती उपयुक्त आहे हे महत्वाचे. जीवनात नाव, यश, किर्ती बरोबरच आपल्या व्यक्तीची सोबत, घर, कुटुंब व त्यातून मुलाबाळांच्या रूपातून होणारी गुंतवणूक, भावनिक आस्था, त्यातून निर्माण होणारं प्रेम व्यक्तीला समृद्ध करत असतं. प्रत्येकाच्याच वाटेला हे सुख येत नाही व जीवनाचा ताळेबंद संतुलित होत नाही.

काय दोष होता माझा ? माझं शिक्षण ? माझी बुद्धीमत्ता ? माझं सौदर्य ? कि माझं सुख पाहू न शकणारे नात्यांचे बंध, मी नेस्तनाबूत कशी होईल हे पाहणारे माझे शुभचिंतक ? हितचिंतक ? 

पण जाऊ देत. त्या त्या घटकांनी आपापली कामे केली. माझा जीवनाचा ताळेबंद असंतुलित केला. पण हे संतुलन मी का साधू नये. स्वतःला या कष्टातून मलाच बाहेर यावं लागेल. माझ्याकडे चांगलं नाव आहे आणि प्रतिभाही आहे. शब्दांची संपत्ती आहे. ही अविनाशी संपत्तीच माझ्या जीवनाचा ताळेबंद मजबूत करणारी ठरणार आहे.

सद् भावना ही एक आणखी माझी संपत्ती, आणि ती मिळवायला मला आयुष्य वेचावे लागले आहे. माझ्या समवेतचा भोवताल, त्यातील दुःख, वेदना तसेच प्रसंगी आनंदालाही मी चढवलेला शब्दांचा साज, लेखणीची धार माझ्या सोबतीला आहे.

मोबाईलच्या रिंगटोनने माझी तंद्री भंग पावली. सु का देवधर कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयातून फोन होता. “नमस्कार मॅडम, मी प्रिन्सिपाॅल अनिल महाजन बोलतोय. पुढच्या आठवड्यात वासंतिक व्याख्यानमाला आम्ही आयोजित करीत आहोत. त्यातील “जीवनाचा ताळेबंद” यावर आपण मार्गदर्शन करावं अशी विनंती करतोय. आपण येणार ना मॅडम.” 

“होय सर, मी अवश्य येईन.”

“धन्यवाद मॅडम, मी ईमेल वर निमंत्रण पत्र पाठवतोय मॅडम, पुनश्च धन्यवाद.” सरांनी फोन ठेवला.

“माझ्या विद्यार्थी मित्रांनो, ॲसेटस् आणि लायबिलिटीझच संतुलन म्हणजे बॅलन्सशीट आपण शिकलात. लायबिलीटीझ जितक्या कमी तितके चांगले मानले जाते. पण जीवनाचे बॅलन्सशीट फार वेगळे असते मित्रांनो. जीवनाचा ताळेबंद म्हणजे व्यक्तीचं आत्मचरित्रचं म्हणता येईल. घर, कुटुंब, मित्र गोतावळा, नात्यांचे बंध, आपला भोवताल, सगळेच घटक महत्वपूर्ण ठरतात. फार खोलात न शिरता काही महत्वाचे मुद्दे मी मांडणार आहे. तुम्ही या देशाचे भावी सूज्ञ नागरीक आहात. तुम्हांला मी काय शिकवावं.

तर जीवनाच्या ताळेबंदात आमचा जन्म हा ओपनिंग बॅलन्स, मृत्यू हा क्लोजिंग बॅलन्स, आमच्या सर्जनशील कल्पना, सद्भावना संपत्ती, पुर्वग्रहदूषित विचार, द्वेष, ईर्शा, मत्सर, क्रोध हे आमचे दायित्व, ह्रदय ही वर्तमान संपत्ती, आत्मा ही स्थिर संपत्ती, ‌नाव, यश, किर्ती हे आमचं खेळतं भांडवल, शिक्षण, ज्ञान, अनुभव हे सर्व आमचे जमा खाते, लोभ, स्वार्थ हे आमचे दायित्व.

शिक्षण, ज्ञान, आणि आत्मसात केलेल्या कौशल्यामुळे तुमच्याकडील सगळी संपत्ती जरी कोणी काढून घेतली तरी तुम्हांला पुन्हा श्रीमंत होण्यात कोणतीही अडचण येणार नाही कारण तुमच्याकडील आयुष्याचा ताळेबंद हा मजबूत असणार आहे.

बस एवढंच माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण मला इथे बोलावलंत, तुमच्याशी सुसंवाद साधण्याची संधी दिली. ऋणी आहे मी आपली. नमस्कार आज मलाही आंतरिक समाधान वाटले.”

– समाप्त – 

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈