मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वंशाचा दिवा… की पणती ?… भाग – 2 ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? जीवनरंग ❤️

☆ वंशाचा दिवा… की पणती ?… भाग – 2 ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

(अपेक्षा होती…. म्हणावे राहुलने.. ‘दादा तुम्ही आता काही करू नका. दोघेजण आरामात रहा फ्लॅटवर.’ पण ते त्यांच्या नशिबी नव्हते.) इथून पुढे 

अलीकडे खूपदा त्यांच्या मनात येई.. काय मिळवले आपण आयुष्यात?वडिलोपार्जित घर आहे ते सांभाळले फक्त. अदितीला पदवीधर केले. राहुलचे इंजिनिअर पर्यंत शिक्षण केले. दोघांची लग्ने केली. बस्स. नवीन प्रॉपर्टी करणे काही आपल्याला जमले नाही. ना एवढी शिल्लक राहिली की त्याच्या व्याजावर उरलेले आयुष्य जाईल. जी काय थोडी शिल्लक होती ती पण राहुलला देऊन बसलो.

आला दिवस घालवत होते. अशीच १०-१२ वर्षे गेली. वाडा आता खुपच मोडकळीस आला होता. त्यातल्या त्यात एक खोली शाबूत राहिली होती. तिथेच आता दोघे रहात. भद्रकालीत असलेले दुकान त्यांनी आता भाड्याने दिले होते. त्या पैशातून त्यांचा प्रपंच चालत होता. अदिती अधुनमधून थोडे पैसे देई. राहुलहि मीनुच्या नकळत पैसे देत होता. त्यांनाही त्यांचा संसार होता.. फ्लॅटचे हप्ते होते.. नीलचे शिक्षण होते. त्यांच्याकडून फार अपेक्षा करण्यात अर्थच नव्हता.

अदिती जिना चढून वर आली. जिन्याच्या फळ्या आता कधीही निसटतील अशा झाल्या होत्या. कठडे हलायला लागले होते.

“येगं.. आताच आई तुझी आठवण काढत होती” राजाभाऊ म्हणाले.

“कुठाय आई ?” तिने विचारले.

“येईल. खाली गेली आहे”.

अदितीने खोलीवर नजर टाकली. एका खोलीतील संसार. जुन्या लोखंडी टेबलवर गैसची शेगडी. त्याच्या बाजूला एक मांडणी. मांडणीवर भांडी मांडुन ठेवली होती. टेबलाच्या खाली काही डबे, ताट, वाट्या वगैरे. दुसऱ्या कोपऱ्यात लोखंडी पलंग. खरकट्या भांड्यांचा ढीग. त्याच्या वासाने अदितीला असह्य झाले.

“दादा मी एक सुचवायला आले आहे” अदिती म्हणाली.

“बोल. काय म्हणतेस?” 

“तुम्हाला माहितच आहे.. इंदिरा नगरला आम्ही एक फ्लॅट घेऊन ठेवलाय.”

“मग?”

“तिथे तुम्ही रहायचं”

“अगं पण जावईबापु..?”

तेवढ्यात ललिताबाई वरती आल्या. धापा टाकीत बसून राहिल्या. राजाभाऊंनी त्यांना सांगितले.. अदिती हे असं असं म्हणतीय.

“नको गं बाई जावयाच्या घरात..”

“काही जावयाचे वगैरे म्हणू नका हं. तो फ्लॅट मी माझ्या पगारातून घेतलाय. त्याचा निर्णय मीच घेणार. आणि तसंही मी यांच्या कानावर घातले आहे”.

राजाभाऊंना काय बोलावे हेच कळेना. हो म्हणावे की नाही? त्यांना सुचेनासे झाले. स्वस्थ बसून राहिले.

“आणि आता ही खोली कधी खाली येईल याचा भरवसा नाही. आई अगं तुम्ही रहाता इथे.. पण आम्हाला रात्री झोप येत नाही. रात्री बेरात्री काही झालं… भिंत पडली तर कोण आहे इथे?पावसाळा तोंडावर आलाय. मी आता तुम्हाला या पडक्या वाड्यात राहु देणार नाही”.

“अगं पण…”

अदिती सगळं ठरवुनच आली होती. दुसऱ्याच दिवशी तिने टेंपो बोलावला. राहुलच्या कानावर पण घातलं. दोघा बहिण भावांनी सर्व सामान हलवले. आणि इंदिरा नगरच्या फ्लॅट मध्ये राजाभाऊ, ललिताबाईंचे नवीन आयुष्य सुरू झाले.

बाल्कनीत उभे होते राजाभाऊ विचार करत होते. आता इथे येऊन तीन वर्षे झाली होती. त्यांना इथली सवय होउन गेली होती. मोकळी जागा, भरपूर खेळती हवा. इथले आयुष्य त्यांना मानवले होते. अधुनमधून लेक जावयी, मुले सुना येत. नातवंडे सुटीत रहायला येत. शेजारच्या बिल्डिंग मध्ये योगा हॉल होता. तिथे सकाळी तासभर दोघे जात. संध्याकाळी ऊन उतरल्यावर दोघेजण गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन बसत. येताना भाजीबिजी घेऊन येत. सर्व व्यवस्थित चालले होते. पण…

…पण अलीकडे राजाभाऊंचे मन अस्वस्थ होऊ लागले होते. वारंवार मनात विचार येत. आपण या जागेत, म्हणजे मुलीच्या घरात रहाणे योग्य आहे का? सर्व आयुष्य स्वतःच्या घरात गेले, आणि आता अखेरीस या जागेत येऊन राहिलो. मनात तोच एक सल होता. आतल्या आत तगमग होई. हि बाब त्यांनी ललिताबाईंजवळ पण बोलुन दाखवली नव्हती. 

तसं म्हटलं तर या विचारांना काही अर्थ नव्हता. त्यांच्याकडे दुसरा पर्याय पण नव्हता. मग आहे ते आयुष्य आनंदाने घालवायचे तर असला विचार का करत बसायचा? पटत होते त्यांना. पण डोक्यातील विचारही जात नव्हते.

आज त्यांचे लहानपणापासून चे मित्र.. चंदुकाका त्याच्याकडे आले होते. सहजच. त्यांच्याशी बोलताना राजाभाऊंनी मन मोकळे केले. मनातली व्यथा त्यांना सांगीतली.

“अरे,कसला विचार करत बसतोस राजा. मुलाची जागा.. मुलीची जागा. राहुलच्या घरी राहिला असता तर हे विचार आले असते का तुझ्या डोक्यात?का हा भेदभाव? उतार वयातील आयुष्य जरा मोकळ्या हवेशीर जागेत घालवायचे होते ना तुला? मग लेकीनेच केली ना तुझी इच्छा पूर्ण? 

एकिकडे म्हणायचं.. मुलगा मुलगी भेद नको. अरे, खरं तर तु भाग्यवान. म्हातारपणात पोरं आईबापांची रवानगी वृध्दाश्रमात करतात. तुला इतकी सुंदर जागा घेऊन दिली लेकीने आणि तु दुःख करत बसतोस. म्हणे मुलगा वंशाचा दिवा…. मग मुलगी? अरे ती तर पणती ना. दिवाळीत लावतो ती. सगळा आसमंत उजळून टाकणारी. तिनेच तर तुझे हे जीवन उजळून टाकले आहे.”

बराच वेळ चंदुकाका बोलत होते. आणि तसं तसं राजाभाऊंच्या मनावर आलेलं मळभ दुर होत गेलं. त्यांना हलकं हलकं वाटु लागलं. प्रसन्नपणे त्यांनी ललिताबाईंना हाक मारली..

“अगं.. चंदु आलाय, फक्कडसा चहा बनव.”

 – समाप्त – 

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈