मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पडीक… भाग – 1 — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? जीवनरंग ?

☆ पडीक… भाग – 1 — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

” हे बघ हारवाल्याची ऑर्डर सुद्धा फायनल झाली आहे,… आजीला मोगऱ्याची फुलं खुप आवडतात ना, मग त्याचाच सुंदर हार ठरवला आहे,.. आणि डाळिंबी रंगाची फिकट गुलाबी पैठणी ती देखील आज फायनल झाली,.. एक तन्मणी आज येईल ते कुरिअर,… आजी एकदम खुश आहेत रे,.. मला फार समाधान वाटतं त्यांना बघून,.. ” असं म्हणत रेवाने डोळ्यांच्या कडांमध्ये आलेलं पाणी अलगद टिपलं,.. तसा सर्वेशने तिचा हात हातात घेतला,..”खरंतर तुझ्यामुळे हे सगळं छान होतंय तू उभं केलंस आजीला नाहीतर आम्ही हरलो होतो ग,.. म्हणून तर चिडचिड करून आई, काकु, वहिनी सगळ्यांनी बोलणं सोडून दिलं होतं तिच्याशी सांभाळून घेत होते तिला, सगळे पण उभं करू शकत नव्हते,… पडीक भिंतीसारखी झाली होती ग ती घरात,.. अस्तित्व तर होतं पण ढासळलेलं,.. मनोरुग्ण म्हणून त्याही भरपूर गोळ्या झाल्या पण काही गुण नाही,.. खरंतर जिच्या अंगा खांद्यावर खेळलो, त्या आजीला असं बघून जीव कासावीस व्हायचा ग… आपल्या लग्नानंतर तुला हे सगळं सांगायचं होतं पण तुझ्या हातावरची मेंदी नाही गेली आणि मला ऑफिसचा कॉल आल्याने लंडनला जावं लागलं,.. मला सतत वाटायचं तुला म्हणावं,.. तू बघ आजीशी बोलून पण परत वाटलं नवीन आहेस या घरात.. थोडं रुळली कि सांगु… पण रेवा चार महिन्यात तू तर सगळं बदललंस.. तू आलीस आयुष्यात माझ्या आणि खुप काही दिलं आहेस,..थँक्स हा शब्द अपुरा आहे त्यासाठी,..”*

तशी शुन्यात हरवत रेवा म्हणाली, “मला ना लहानपणापासून आजी हे घरातलं पात्र खुप आवडायचं,.. पण माझं दुर्दैव दोन्हीकडे आजी नाही,.. वाड्यातल्या मैत्रिणीची आजी जीव लावायची, पण ते सुरकुतलेले हात, तो मायेचा स्पर्श तो मात्र हवासा वाटायचा,.. मला ना सर्वेश अगदी असं भरलं घर मिळावं म्हणून मी हरतालिकेच्या महादेवाला कायम प्रार्थना करायचे,.. खुप शिक्षण पदव्या असल्या, तरी ह्या निसर्गनिर्मितीच्या मास्टरवर माझा विश्वास आहे,.. आपली प्रार्थना हि ह्या वातावरणात पोहचून कधीतरी आपल्याला त्याचे रिटर्न्स देते हे सुद्धा मी खूपदा अनुभवलं आहे,.. तुझ्या घरातला प्रवेश हा माझ्या आयुष्यातलं फार सुंदर वळण होतं,.. प्रायव्हसीच्या नावाखाली,.. एकट्यानेच जगण्याचे आनंद लुटायचे,.. जीव लावणारी माणसं अंतरावर ठेवायची,.. तोंड देखला पाहुणचार करत पुन्हा नंतर साधा चौकशीचा फोन देखिल करायचा नाही, हे असलं तुटक वागणं मला नकोच होतं मला हवी होती माणसं,…. भरभरून प्रेम करणारी,.. चिडणारी, रागवणारी परत समजावून जवळ घेणारी,.. खळखळून हसणारी,.. बरणीतल्या लोणच्याच्या फोडीसारखी एकमेकांच्या प्रेमाने खारवून जाऊन एकत्रच आयुष्यात मुरण्याचा आनंद घेणारी,.. ती सगळी सापडली तुझ्या घरात फक्त आजी मात्र खटकली,..

अशी का झाली असेल? प्रत्येकाकडून जाणून घेतलं,.. मग कळलं आजोबांनी ह्या प्लॉटवर बांधलेलं हे अपार्टमेंट,.. कारण कळलं पण ह्यावर आजीशीच बोलायचं असं ठरवलं,.. एक दोन दिवस बळजबरी आजीच्याच खोलीत झोपले,.. आजी गप्प, सुन्न नेहमी सारखी,… सासुबाई म्हणाल्या, “अग नको नादी लागुस त्यांच्या नाही बोलणार त्या काय मनात घेऊन अश्या झाल्या कुणास ठाऊक,..?” पण मी नाद सोडला नाही,…. आजीसारखी एकटक बघते तिकडे मी बघायला लागले आजीच्या त्या खिडकीतून तर मला दिसलं ते मागचं जुनं घर जिथे आयुष्य गेलं त्यांचं,.. मग मला लक्षात आला त्यांच्या मनाचा सल,…. मग मीच मागे गेले आपल्या कामवाल्या मावशींना घेऊन,.. त्यांच्याकडून दारासमोर वाढलेलं गवत काढलं,.. ओटा स्वच्छ केला आणि आजीला बळजबरी तिथे घेऊन गेले,…. चहाचे कपही नेले. आधी आजी गप्पच होत्या, मग मीच बडबड करत सुटले,.. त्या पडक्या घराच्या खिडकीतुन डोकावत म्हंटल,.. इथे देवघर होतं का? शेंद्री कोनाडा दिसतोय,.. तसं त्या बोलायला लागल्या,.. हो तिथे माझ्या विठुची मूर्ती होती काळीभोर,.. घराचे वाटे झाले,.. हि खोली आपल्या वाट्याला आली तेंव्हाच ह्यांना म्हंटले होते,.. मला इथे छोटंसं विठुचं मंदिर करू द्या,.. पण फार नास्तिक होते,.. मला म्हणाले , “तुझा विठूच देऊन टाक कोणाला तरी,..”

मला फार वाईट वाटलं ग.. कष्टात दिवस काढून ह्यांच्या संसाराला हातभार लावला आणि माझी मेलीची मागणी ती काय फक्त एवढी,.. कारण घराचे बाकी सगळे डिझाईन बिल्डर आणि पुढची पिढी त्यांना सोपं जाईल तसं करणार मला त्याच काही वाटत नव्हतं ग,.. पण माझ्या विठूवर का एवढा राग,..? खरंतर सगळ्यांनी समजावलं लेक, सून सगळे म्हणाले, बांधु छोटसं देऊळ… पण नाहीच ऐकलं,.. ही जागा जी कधीकाळी शेण सडा करून मी प्रसन्न करायचे,.. जिथं मिणमिणता दिवा मनाला प्रकाशित करायचा, तिथं हळूहळू सगळं पडीक झालं ग,.. अंधार पसरला. हे गेले पण जाईपर्यंत एकदा सुद्धा म्हंटले नाही कि, मी तुझी ही इच्छा पूर्ण केली नाही,.. वाईट वाटलं ज्याच्यासोबत आयुष्य गेलं, त्याला एवढीही खंत कधी वाटू नये … विठ्ठल मात्र माझ्या जवळ तसाच आहे.. जपलेला छोटी रखुमाई पण आहे.. त्याची ट्रंकेत बसलेली,..*

— क्रमशः भाग पहिला 

लेखक : अज्ञात 

संग्राहक : श्री मेघ:श्याम सोनावणे.  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈