मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्वस्तिक… भाग-1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ स्वस्तिक… भाग-1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

काल रात्री डीव्ही  पाणी प्यायला उठले आणि त्यांच्या लक्षात आले की गळ्यातला ताईत  पडलाय.  ते थोडेसे विचलित झाले, काहीसे भयभीतही झाले. पाणी पिऊन पटकन बेडपाशी आले तेव्हां उशीवर  त्यांना त्यांचा ताईत दिसला.  त्या अंधुक प्रकाशात त्यातले सोन्याचा सुरेख कमनीय स्वस्तिक चमकले.  डीव्हींना एकदम हायसं वाटलं.  त्यांनी तो पटकन उचलला आणि पुन्हा गळ्यात घातला.

अजून रात्र बरीच बाकी होती.  त्यांनी डोळे मिटले आणि झोपण्याचा प्रयत्न केला.  शेजारी सावित्री— त्यांची पत्नी शांत झोपली होती.  त्यांनी पुन्हा गळ्यातल्या स्वस्तिकाला स्पर्श केला. 

तेव्हां आई म्हणाली होती,

” दिन्या! आज मी गुरुजींकडे गेले होते. त्यांना तुझी पत्रिका दाखवली. बराच वेळ ते निरखत होते.  लांबलचक आकडेवारी लिहीत होते.  म्हणाले,” माई छान आहे  पत्रिका. तुझा दिन्या नाव कमावणार.  खूप मोठा होणार. यशस्वी, कीर्तीवंत! स्वतःचे एक साम्राज्य उभं करणार तो. पण पत्रिकेत स्पष्ट दिसतंय की पनवतीचे काही टप्पे अवघड आहेत.  मी  एक ताईत देतो. यात एक स्वस्तिक आहे तो त्याचं सदैव रक्षण करेल.  आयुष्यभर त्यांनी तो गळ्यात ठेवावा.”

तेव्हांपासून आजतागायत तो गळ्यात आहे. कधीच काढला नाही. पण दिन्या ते डीव्ही या आयुष्याच्या एका दिमाखदार प्रवासात गळ्यातल्या या स्वस्तिकाने कशी काय साथ दिली याचाही कधी विचार मनात आला नाही. कित्येक वेळा तो आपल्या गळ्यात आहे याचाही विसर पडला असेल.  मात्र एक, आई असताना आणि ती गेल्यानंतरही आजपर्यंत डीव्हींनी कधीही तो काढला नाही.

जेव्हां जेव्हां डीव्ही आईला भेटायला जात, तेव्हां तेव्हां आई त्या स्वस्तिकाकडे बघूनच म्हणायची,

” मोठा झालास. नाव कमावलंस, खूप मोठी ओळख स्वतःची मिळवलीस, राज्य उभं केलंस.  आज कितीतरी लोकांची कुटुंबं तुझ्यावर अवलंबून आहेत, पण लक्षात ठेव यात आपलं काही नसतं बरं! सारं तो करतो! त्याला विसरू नकोस. सदैव जमिनीवर राहा.  आयुष्यात वाटा खूप असतात रे!  पण सरळ वाटेवर चालत रहा.”

डीव्हींनी कूस बदलली. पहाट व्हायची ते वाट बघत होते. उद्या सकाळी अकरा वाजता कोर्टात अंतिम सुनावणी आहे. न्यायालयीन चौकशी समोर त्यांना सामोरे जायचं आहे.अॅडव्होकेट झुनझुनवालांचा रात्रीच फोन आला होता.

” डीव्ही, तशी आपली बाजू भक्कम आहे. तुमच्याकडून मुद्दामहून  गुन्हा झालेला नाही.  फसवणूक करण्याचा तुमचा हेतूही नाही.  तुम्ही फक्त एका अचानक आलेल्या वादळात अडकलात आणि मग एक एक पाऊल निसटत गेलं .हे सर्व आपल्याला खंडपीठांसमोर नीट विश्वासार्ह पद्धतीने मांडायचं आहे.  निर्णय काय लागेल ते आत्ताच सांगू शकणार नाही. पण प्रयत्न करूच.  आणि अपेक्षित प्रश्नांना कसे सामोरे जायचे, काय उत्तर द्यायचे याची पूर्वकल्पना मी तुम्हाला दिलेलीच आहे.  तेव्हां धीर ठेवा, सावध राहा.   लेट अस होप पॉझिटिव्ह!”

वास्तविक या व्यवसायात येण्याचं कुठलंही स्वप्न डीव्हींनी कधीच पाहिलं नव्हतं.  दिन्या नावाचा एक मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातला माणूस काय स्वप्न बघणार? एक पदवी, एक नोकरी, एक घर, समंजस पत्नी, गुणी मुलं, वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ आणि अखेर एक समाधानी निवृत्ती!  पण सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री असूनही कुठेही नोकरी मिळत नव्हती.  प्रचंड नैराश्य आलं होतं.  अजूनही आपण कुटुंबाचा आधार बनू शकत नाही या भावनेने जगताना निरुपयोगी असल्यासारखं वाटत होतं.  अगदी आत्मघाताचेही विचार मनात घोळत होते.  आत्मविश्वास पार डळमळला होता  त्याचवेळी गळ्यातल्या स्वस्तिकाला सहजपणे केलेला तो स्पर्श एकाएकी खूप आश्वासक वाटला होता.  त्याही क्षणी क्षणभर मनात आलं होतं,’ खरंच असं काही असतं का? तर्कबुद्धीच्या पलीकडे या संकेतांना नक्की काय अर्थ असतो?’

पण योगायोगाने वासू भेटला.  एका इराण्याच्या हॉटेलात. दिन्या  चहा पीत होता.  वासूनेच जोरात हाक मारली,

“अरे दिनकर?”

दिन्या निराशच होता.  नुकतीच नोकरीसाठी एक मुलाखत देऊन तो आला होता.  आणि अपयशाचीच शंभर टक्के खात्री होती.  त्यामुळे चेहरा उदास, पडलेला, निराश.

“अरे दिनकर? दिनेश स्कॉलर? काय चाललंय तुझ्या आयुष्यात? काय करतोस? कुठे असतोस? “

दिन्या शांतपणे म्हणाला होता,

“काहीही नाही.”

आणि मग दिन्याने जे आहे ते सारं वासूला सांगितलं.

भरदार अंगाच्या, धष्टपुष्ट, उंच ताड वासुने दिन्याच्या हातावर जोरात टाळी मारली.  आणि तो म्हणाला,

“अरे भावड्या!  हे बघ माझ्याकडे सॉल्लिड प्लॅन्स आहेत. या गावकूसाच्या बाहेर,  माझ्या नावावर आजोबांनी ठेवलेली एक जमीन आहे.  तो भाग पुढच्या दहा वर्षात प्रचंड गजबजणार आहे.  काही वर्षांनी ती उद्योगनगरीच होणार आहे.  सोन्याचा तुकडा आहे बघ.  आपण ती डेव्हलप करूया.”

“म्हणजे नेमकं काय ?”

“म्हणजे आपण एक प्रोजेक्ट करूया.  एक स्वयंपूर्ण नगरच बसवूया.  सदनिका, रो हाऊसेस, सर्व प्रकारची दुकानं,  मुलांसाठी, ज्येष्ठांसाठी सुविधा, शिक्षण, आरोग्य याचा परिपूर्ण विचार करून थाटलेलं एक संपूर्ण नगर!”

वासुने जणू एक स्वप्नच दिन्याच्या हातात ठेवलं.

“हे बघ , जमीन माझी डोकं तुझं.  आजपासून तुझी आणि माझी टीम.  काय भावड्या जमतंय् का?”

“हो पण माझ्याकडे काहीच भांडवल नाहीय “

“त्याची काळजी तू करू नकोस.  तू कामाला लाग.  असा पॅव्हलीन  मध्येच आऊट होऊ नकोस.  मैदानात ये.  खेळ जमव. आपण साइटवर जाऊ आणि ठरवू  पुढचं.”

दिन्या काही बोलणार तोच त्याचं लक्ष वासूच्या गळ्यातलल्या ताईताकडे गेलं. अगदी हुबेहूब.  काळा दोरा आणि सोन्याचा सुरेख नक्षीदार स्वस्तिक. सहजच एक तार जुळली. प्रवाहाला प्रवाह मिळाला. आणि सुरुवात झाली.

आयुष्यात असही काही घडू शकत यावर विश्वास बसत नव्हता. पण ते घडलं. या पहिल्याच  स्वस्तिक प्रोजेक्टला उदंड प्रतिसाद मिळाला.  वासूने कायदेशीर बाबी, जाहिराततंत्र,  बुकिंग, सेल्स, पैशाचे नियोजन, बँकांचे व्यवहार सर्व काही अत्यंत कौशल्याने सांभाळलं.  आणि दिन्याने बौद्धिक, कल्पक, तांत्रिक, वेगवेगळे शास्त्रोक्त आराखडे, एलेवेशन्स, व्हिजीयुलायझेशनची सारी तंत्र चोख पाळली. यशाची एक वाट नव्हे, महावाटच सुरू झाली.  स्वस्तिक बिल्डर्स हे नाव प्रचंड गजबजलं. पेपरात फोटो, मुलाखती, पुढच्या प्रोजेक्टचे विचार वगैरे वगैरे सर्व काही विनासायास प्रवाहाबरोबर घडतच गेलं. 

“शहरात प्रथमच, ईको फ्रेंडली,निसर्गाच्या सान्निध्यात आगळे वेगळे आपलं घर!”अशी होर्डींग्ज झळकू लागली.

दिन्याचा डीव्ही झाला.  वास्तविक डीवी म्हणजे दिनकर आणि वासू. आणि दोघांचे मिळून स्वस्तिक, पण व्यावसायिक विश्वात, परिसरात, समाजात, देशात,  विदेशात डीव्ही याच नावाने त्याला प्रसिद्धी मिळाली. दिनकर एक दिवस वासूला म्हणालाही होता,

“आपण दोघे म्हणजे वन सोल ईन टु बॉडीज् दोन रेषा,एका बिंदुतल्या.”

आणि नकळत दोघांनी आपले गळ्यातले स्वस्तिक असलेले ताईत सहज आनंदाने उचलले.

सगळं आयुष्यच बदलून गेलं.  राहणीमान, जीवन पद्धती, सारं सारं बदललं.  एका टिंबापासून झालेल्या सुरुवातीनं आख्खा पृथ्वी गोलच जणू पादाक्रांत केला.  देश विदेशात स्वस्तिक प्रोजेक्ट्स उभारले गेले.  पन्नास मजली टॉवर्स,  फिरती पंचतारांकित हॉटेल्स,  आरकेड्स,  हॉल्स, बँक्वेट्स हॉस्पिटल्स, आणि त्याचबरोबर इनसाईड आऊटसाईड मधले गुळगुळीत फोटो. 

दिन्या नावाचं मिटलेलं कमळ डीव्हींच्या रूपात उमलत गेलं.

कुटुंब आणि परिवाराबरोबरच एक व्यावसायिक आणि सामाजिक चेहरा दिन्याला प्राप्त झाला. काही हजारांचे कित्येक हजार कोटी झाले. 

एक दिवस डीव्ही असेच, नदीकिनारी असलेल्या त्यांच्या आलिशान बंगल्याच्या पॅटीओमध्ये शांत बसले होते. समोरच्या भिंतीवरचे म्युरल ते पाहत होते.  वास्तविक ते म्युरल म्हणजे त्यांच्या व्यवसायाचा लोगोच होता. एक सुरेख स्वस्तिक.  सूर्य, चंद्र, वायु, पृथ्वी,  लक्ष्मी,  विष्णु ब्रह्मदेव,  शिवपार्वती,  श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश असणारं, शांती, समृद्धी आणि मांगल्यांचं  प्रतीक स्वस्तिक!  एकमेकांना छेदणाऱ्या दोन सरळ रेषा पुढे जाऊन विरुद्ध दिशेला वळलेल्या.

“स्वस्तिक क्षेम कायति इति स्वस्तिक:”

कुशलक्षेम, कल्याणाचे प्रतिक.

डीव्हींच्या आत, आईचा दिन्या अजूनही होता.  त्या दिन्याने मात्र समाजाभिमुख अनेक कामेही केली. लोकाभिमुख संस्थांना आर्थिक योगदान  दिले.  कितीतरी लाचार ओंजळी त्याने भरल्या.  कला, क्रीडा, धर्म, संस्कृती सर्व क्षेत्रात त्यांनी अर्थदान केले.  

भिंतीवरचे म्युरल पाहत असताना डीव्हींचा चेहरा अधिकाधिक शांत होत गेला.  क्षणभर त्यांच्या मनात आलं स्वस्तिक हेच त्यांचं अस्तीत्व.  अखंड सोबत.  एक अदृश्य मार्गदर्शक आणि सहजच त्यांचा हात गळ्यापाशी गेला.

  स्वस्तिक   क्रमश: भाग १ 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈