मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सडकं, नासकं, कुजकं… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌸 जीवनरंग 🌸

सडकं, नासकं, कुजकं… ☆ श्री मकरंद पिंपुटकर

ती – तिच्या संसारात सुखी नव्हती. लग्नाला आठ दहा वर्षे उलटून गेली होती. दोन गोजिरवाणी मुलं होती. तिच्यावर प्रेम करणारा, निर्व्यसनी नवरा होता, त्याला ठीकठाक नोकरी होती. 

 …..पण तरीही ही संसारात सुखी नव्हती. सासरच्या प्रत्येक गोष्टीत हिला काही ना काहीतरी खोट दिसायची. 

सासू सासरे गावाहून आले की त्यांच्या वागण्यात तिला गावठीपणा दिसायचा. सासरे बशीत चहा ओतून फुरके मारत चहा पिऊ लागले की हिच्या कपाळावर आठ्यांचे जाळे उमटायचे. सासू जरा कामवालीला ख्यालीखुशाली विचारू लागली की हिचा जीव तीळ तीळ तुटायचा.

आणि नवरोबा काय ! तो तर चुका काढण्यासाठीचा हक्काचा माणूस. पलंगावर ओला टॉवेलच टाकतो, लेंग्याची नाडी लोंबत असते, रात्री झोपेत घोरतो, घरात काय हवंय नकोय ते त्याला कसं बिलकूल ठाऊक नसतं, तिनं म्हणून संसार केला – निभावून नेलं, दुसरी कोणी असती, तर केव्हाच निघून गेली असती, वगैरे वगैरे….. तक्रारींचा पाढा मोठा आणि न संपणारा होता.

शेजाऱ्यापाजाऱ्यांपासून, दूधवाला, भाजीवाला, पेपरवाला सगळ्यांकडे ही कॅसेट वाजायचीच वाजायची. 

आजची सकाळही अपवाद नव्हती. कालच सासू सासरे गावाहून आले होते, त्यामुळे असंही तिचा मूड खराबच होता. काहीतरी कारण घेऊन ती तणतणतच होती, तेवढ्यात नेहमीच्या भाजीवाल्याने हाळी दिली. 

तिला ताज्या दमाचा श्रोता सापडला होता, ती अशी संधी थोडीच सोडणार होती ! 

गळ्यांच्या मनसोक्त कागाळ्या सांगून झाल्यावर ती म्हणाली, “बरं, बरं. ते राहू दे सगळं. कामं पडली आहेत घरी. सगळी मलाच करावी लागतात. कोणी येत नाही हो मदतीला… टोमॅटो दे किलो दोन किलो.”

“नाही, नाही ताई. तुम्ही टोमॅटो घेऊ नका. ते खराब आहेत. तुम्ही असं करता का, बटाटे घ्या. ते चांगले आहेत.” भाजीवाला सांगू लागला. 

“बटाटे नको आहेत मला. आणि टोमॅटोच हवे आहेत. तू एक काम कर, मला एक रिकामी टोपली दे. मी खराब टोमॅटो त्यात काढून ठेवते आणि चांगले निवडते.”

बघता बघता तिने दोन किलो चांगले टोमॅटो घेतले. 

“बरं, आता भेंडी दे बरं.” ती.

“नाही, मॅडम. भेंडीपण किडलेली आहे. तुम्ही बटाटे का घेत नाहीत ? एक नंबर माल आहे.”

पुन्हा त्याच संवादांची उजळणी झाली आणि पुन्हा तिनं निवडून निवडून एक किलो भेंडी घेतलीच. 

आणि मग तिनं त्या भाजीवाल्यावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली. “का रे ? एवढी सगळी चांगली भाजी आहे आणि तू काय सारखं ही कुजली आहे, ती किडली आहे असा धोशा लावला आहेस ? बघितलंस ना – केवढीतरी चांगली भाजी होती की इथं. आणि तू असा आहेस की सडक्या कुजक्यातच अडकून बसला आहेस.”

ती बोलून गेली आणि क्षणभर तिला वाटलं की हा भाजीवाला भडकणार. पण झालं उलटंच. 

तो प्रसन्न हसला.

“आता कसं छान बोललात ताई ! भाजी असो की आयुष्य, आपण चांगलं तेवढं घ्यावं. सडकं, कुजकं नजरअंदाज करावं. आयुष्य किती सुंदर होऊन जाईल !”

तो तिला उद्देशून बोलला का सहज, कोण जाणे. पण ही गोळी तिला पक्की लागू पडली. 

ती आजारी पडल्यावर उपासतापास करणारे सासरे तिला आठवले. तिच्या पहिल्या बाळंतपणाच्यावेळी तिची आई हॉस्पिटलमध्ये admit होती. सासूबाईंनी तळहातावरच्या फोडासारखं जपलं होतं तिला, ते आठवलं. बायकोमुलांपासून दूर राहावे लागू नये म्हणून प्रमोशन नाकारणारा नवरा आठवला. वाढदिवस, व्हॅलेंटाईन डे सोडूनसुद्धा त्याचं कधीतरी सहज गजरा आणणं आठवलं.

आणि भाजीवाल्याचं वाक्य मनात पिंगा घालू लागलं. 

…. आज संध्याकाळी घरी जेवण तर छान झालंच, आणि नंतरचं जीवनही.

……  ती आता चांगलं स्वीकारायला शिकली होती. 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈