मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – प्रतीक्षा – ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆

सुश्री उषा जनार्दन ढगे

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – प्रतीक्षा – ? ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे 

 

माझ्या मनातल्या स्नेहलहरी

आत अंतरात उचंबळतात

आठव येती भरती ओहोटीचे

माझिया मनाचिया सागरात..

तू नभीचा तळपता भास्कर

पार करशील का अवघे अंतर ?

दूर जरी तू इतुका माझ्यापासून

पोहचतील का चार किरणें उबदार..?

तू दूर असणारा तो रजनीकांत

करशील रुपेरी स्नेहाची बरसात ?

परि कसे बहरतील प्रितीचे क्षण

अन् प्रतिक्षेतली ती पुनवेची रात?

मनोमनी आठवता तुज क्षणार्धात

स्मृतीसुमने ही फुलूनी उमलतात

मिळत रहाते एक अनामिक आशा

ओंजळीत फुलतो गंधित पारिजात..

असे वाटते मम केव्हातरी कधी

कुठूनही बघता सामोरा येशील

निळ्याशार विशाल अंबरासम

निळ्या बाहूंत मजशी सामावशील..!

चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

ठाणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈