मराठी साहित्य – काव्यानंद ☆ खरंच कां? …. सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆ रसग्रहण.. सुश्री गायत्री हेर्लेकर

सुश्री गायत्री हेर्लेकर

? काव्यानंद ?

☆ खरंच कां? …. सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆ रसग्रहण.. सुश्री गायत्री हेर्लेकर ☆ 

 

कविता – खरंच कां? – सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

 

खरंच कां?

बघतां बघतां हे काय झालं?

गृहसम्राज्ञीच पद माझ्या हातुन गेलं–

कळलं नाही माझं मला,

असं कसं झालं?

खरंच कां वय माझं उताराला लागलं?

 

आपणही काही चवीढवीचं ,

करावंसं वाटलं

 कसं कोण जाणे ,

भांडं हातातुन निसटलं

आवाज कानी आदळला—

कोण आत कडमडलं?

तेल तर सांडलंच—अन्–

पाठी धुपाटणं आलं—    

खरंच का वय माझं उताराला लागलं?

 

फुलांच्या ठेल्याजवळ

घुटमळले मी जरा,

हळुच,स्वारींना म्हटलं–

“घ्याना गडे –गजरा—“

डोळे मोठे करीतच हे वदले,

“जरा वयाचा विचार करा”

माझी मीच गोरीमोरी,

भोवताली पाहिलं–

खरंच का वय माझंउताराला लागलं?

 

हौसेनं नातवंडांच करायला गेले,

तर सुनबाईनं मान हलवत

नाक की हो मुरडलं—

नात म्हणाली,

 “आजी नको मधे मधे येऊ,

तुझं तू बघ आपलं—“

तुम्हीच सांगा आता—

माझं काय चुकलं–?

खरंच का वय माझं उताराला लागलं?

 

हसतच हे म्हणाले,

“बाईसाहेब,संपली तुमची सद्दी,

स्वखुशीने सोडलीत ना ,

तुम्ही तुमची गादी?

बाहेर पडा यातुन जरा,

पुसा डोळे ,चेहरा करा हसरा

साहित्य-साधनेसारखा

मित्र नसे दुसरा”

मलाही सारं पटलं—

ष्रसन्नपणे हसतच,

कुठे कुठे विसावायचं,

माझं मी ठरवलं–

माझं मी ठरवलं.

 

सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

कोथरूड- पुणे. मोबा. 9595557908/02

 

आवडलेल्या कवितेचे रसग्रहण.. सुश्री गायत्री हेर्लेकर

स्थूलमानाने, कवितेचे  २ महत्वाचे पैलु म्हणजे आशय आणि  अभिव्यक्ती. सोप्या भाषेत—

“काय सांगितले?” आणि “कसे सांगितले?”

कोणतीही कविता वाचतांना हे दोन्ही पैलु डोळसपणे ,वेगवेगळ्या अंगाने पारखणे ,आणि त्याच कसोटीवर कवितेचा जनमानसावर होणाऱ्या परिणामांचा विचार करणे म्हणजे रसग्रहण.त्यामुळे कवितेचा आस्वादही मनापासुन घेता येतो. दुःख, आनंद,आश्चर्य, भिती, प्रेम, वात्सल्य राग, चीड ,संताप अशा कोणत्या ना कोणत्यातरी भावना मनात निर्माण होतात.कविता मनाची पकड घेते. कविता भावते.

अशीच एक भावलेली कविता.,ज्यावर आज मी माझे विचार मांडणार आहे.

ही कविता आहे शुभदा कुलकर्णी ,पुणे यांच्या भावफुले या काव्यसंग्रहातील. डॉ अमृता ह. मराठे यांनी अभ्यासपूर्ण,सविस्तर प्रस्तावना लिहिली आहे. अमृताताईंनी म्हटल्याप्रमाणे वैयक्तिक, कौटुंबिक,सामाजिक, वैचारिक, निसर्गविषयक, सणांसंबंधी अशा विविध विषयांवरील कवितांनी समृध्द असा हा काव्यसंग्रह आहे.सर्वच कविता मनाला भिडणाऱ्या आहेत.

पण मी ही कविता निवडली कारण ती वाचतांना मला वाटले की मी जणु माझेच प्रतिबिंब आरशात पहात आहे.

विषय तसा साधाच, — सामान्य संसारी स्त्रीचा. ती स्वीकारत असलेल्या  वेगवेगळ्या भुमिका,.

त्या वठवतांना ,कालानुरूप बदलतांना,मनाला जाणवणारी थोडीफार खंत उदास करते.

खरंच ,हे कारण असेल का?

हा संभ्रमही मनात निर्माण होतो. शुभदाताईंनीकवितेला दिलेले नावही साधे पण सार्थ आहे.

खरंच कां?

कवितेच्या आधी व्यक्त केलेल्या मनोगतात त्या म्हणतात, “वय उतारा लागलं ,cहे स्विकारलं की ,सगळं सोपं होत.—थोडा मनःस्ताप—पण आनंदाचे नविन मार्ग शोधावे—“

पहिल्या ४ कडव्यात नेहमीच्या चाकोरीबद्ध पध्दतीने स्वीकारलेल्या भुमिका,अन् त्यामुळे येणारा काहीसा खेदजनक अनुभव मांडला आहे.

स्त्री –घराचा केंद्रबिंदू –सर्वेसर्वा-.-गृहस्वामिनी,–ही तिला आवडणारी भुमिका .पण कळतनकळत ती या भूमिकेतून बाहेर पडते .अन् तिला काय वाटते ते शुभदाताईंनी १ ल्या कडव्यात सांगितले आहे.

“बघता बघता हे काय झालं?

गृहसम्राज्ञीच पद माझ्या हातुन गेलं– कळलं नाही माझं मला,असं कसं झालं?

खरंच का माझं वय उताराला लागलं?””

पुर्ण घराची राणी राहिली नाही तरी ,स्वयंपाक —तिचा हुकमाचा एक्का तरी हातात आहे असे वाटते. त्याच्या वापर करुन खेळात बाजी मारता येईल असे तिला वाटते.. पण तिथला अनुभव–? छान शब्दांत मांडला आहे या दुसऱ्या कडव्यात–

 “”आपणही काही चवीढवीचं,

करावंसं वाटलं,

कसं कोण जाणे ,भांडं हातातुन निसटलं,

आवाज कानी आदळला—

कोण आत कडमडलं?

तेल तर सांडलच–अन्

पाठी धुपाटणं आलं–

खरंच का वय माझं उताराला लागलं?”

ठीक आहे.,काम होत नसेल आता.शरीर,भले थकले तरी मन जवानीत रमु पहाते.  . आयुष्यभराचा जोडीदार तरी आपल्या भावना समजुन घेणार ही अपेक्षा असते.आणि तेही रास्तच आहे. पण?

त्याबाबत काय होते ते सांगणारे पुढचे कडवे —

“”फुलांच्या ठेल्याजवळ घुटमळले

मी जरा,

हळुच स्वारींना म्हटलं–‘घ्या ना गडे गजरा’

डोळे मोठे करीतच हे वदले,’जरा वयाचा विचार करा’

माझी मीच गोरीमोरी,भोवताली पाहिलं—

खरंच का वय माझं उताराला लागलं?”

नातवंडे —- दुधावरची साय.अन् आजी म्हणुन मनात मायाममतेचा पुर भरुन येतो.त्याची ऊधळण नातवंडावर करावी असे वाटणे स्वाभाविक आहे.पण त्याही बाबतीत

काय होऊ शकते हे ४  थ्या कडव्यात सांगितले आहे.

“”हौसेनं नातवंडांचं करायला गेले ,

तर सुनबाईंनं मान हलवत नाक की

हो मुरडलं—

नात म्हणाली, ‘आजी नको मधे मधे येऊ,

तुझं तु बघ आपलं-‘-

तुम्हीच सांगा आता,माझं काय चुकलं?

खरंच का वय माझं उताराला लागलं?”

कोणीही समजुन घेत नाहीत ,मनासारखे होतच नाही मग निराशा येणारच. पण,शुभदाताईंनी शेवटच्या ५ व्या कडव्यात एकदम यु टर्न घेतला.

“”हसतच हे म्हणाले,

‘बाईसाहेब, संपली तुमची सद्दी,

स्वखुषीने सोडलीत ना,

तुम्ही तुमची गादी?

बाहेर पडा यातुन जरा,पुसा डोळे,

चेहरा करा हसरा,

साहित्य-साधनेसारखा मित्र नसे दुसरा

            मलाही सारं पटलं–

 प्रसन्नपणे हसतच,कुठे कसं विसावायचं

माझं मी ठरवलं, —माझं मी ठरवलं

बदलत्या काळाप्रमाणे, वाढत्या वयामुळे जुन्या मार्गावरून चालणे शक्य होणार नाही. तिथे नाकारले गेलो तरी त्याची खंत न करता, नविन मार्गावरून नेणारा कोणीतरी जोडीदार भेटतो. आणि वाढत्या वयातही नव्या मार्गक्रमणाचा आनंद मिळवता येतो.

खरंच, किती सकारात्मक विचार शुभदाताईंनी आपल्या कवितेतुन मांडला आहे.

मला वाटते,काही तरुण मैत्रिणी अपवाद आहेत.पण बर्‍याच ज्येष्ठ मैत्रिणींच्या दृष्टीने  आपला साहित्यसमुह म्हणजे  असाच भेटलेला जोडीदार .आणि आपणही त्याच्या हातात हात घालुन साहित्यसेवेच्या या मार्गावरून आनंदाने विहार करीत आहोत,.

कारण आपले ब्रीदवाक्य

” लिहा आणि लिहित्या व्हा”

हेच आहे.

माझ्या एका मैत्रिणीनेच लिहीलेली ही कविता  मला आवडली, म्हणुनच तुमच्यासाठी  निवडली.

धन्यवाद.

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈