मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #219 ☆ जोखड आहे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 219 ?

जोखड आहे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

जीवन सोपे झालेले पण जगणे अवघड आहे

गायीचा मुडदा पडतो ती होता भाकड आहे

पैशाच्या मोहापायी मज भवती जमले सारे

पण श्वास थांबला नाही दाखवली रोकड आहे

सण आनंदाचा होता उत्साही होते सारे

मी ईद मुबारक म्हणता घाबरला बोकड आहे

खाणीत कोळशाच्या मी अन् तो आहे सोन्याच्या 

मी गुहेत अंधाराच्या का खेळत धुलवड आहे

जीवनदाते जेथे त्या जागेला किंमत येते

श्रावण बाळाच्या हाती सोन्याची कावड आहे

झाडावर जागा होती पिल्लाला रुचली नाही

त्या जुनाट घरट्याचीही झालेली पडझड आहे

शेतात राबतो आहे डोईवर कपास त्याच्या

बैलाच्या खांद्यावरती अजूनही जोखड आहे

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈