मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ समाधीस्थ  ज्ञानदेव… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ समाधीस्थ  ज्ञानदेव… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आळंदी सोडून चालली ती,

चार सान गोजिरी  मुले !

काट्याकुट्यांच्या मार्गामध्ये,

अडखळत होती त्यांची पाऊले!….१

   आळंदीकरांनी  हिणविले तयांना,

‘.   ‘संन्याशाची मुले’ म्हणूनी!

      व्याकुळलेली मने घेऊनी,

     चालली लेकरे हतबल होऊनी!..२

निवृत्तीचा स्वभाव संयत,

ज्ञानाची त्या होती साथ!

सोपान मुक्ता पाठी त्यांच्या,

 चालू लागले अवघड वाट!…३

  पैठण क्षेत्री गेली भावंडे,

  मिळेल काही न्याय म्हणूनी!

 मोठे पण त्यांचे नाही आले,

  शास्त्री पंडित यांच्याही ध्यानी!..३

दुःखी होऊनी परत निघाली,

घेऊन आली शुद्धिपत्रास !

आता तरी मिळेल का हो,

 करण्या आम्हा आळंदीत वास!..४

पैठण,नेवासे वाट चालता,

 केले काही चमत्कार जनी!

कळून येता त्यांची महती,

 अवाक् झाली सारीच मनी!…५

आळंदीला परतून येता,

 ज्ञाना म्हणे कार्य ते झाले!

गुरु निवृत्तीची आज्ञा होता,

 समाधी घेण्या सिद्ध जाहले!..६

तिथे पाहिली जागा सत्वर,

 खोल विवर शोधिले त्यांनी!

ज्ञानदेव त्या विवरी शिरता,

 शिळा ठेवली निवृत्तीनाथांनी!…७

योगेश्वर रूप ते ज्ञानदेव,

आळंदीस समाधीस्थ झाले!

अजून त्याची साक्ष देत हा,

 सोन्याचा पिंपळ त्यावरी झुले !…८

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈